Wednesday, March 2, 2022

गंध गिरीशिखरांचा ..

हस्ताक्षर दिना निमीत्त ...
 
" गंध गिरीशिखरांचा "
2012 पासून मनात गिरीशिखरे हा विषय मनात घोळत होता ... नुक्तच मुंबई ते लेहलदाख बाईक टूर पुर्ण करून आलो होतो. कलाकार, डॉक्टर, इंजीनियर, आर्किटेक्ट, फोटोग्राफर असे विविध क्षेत्रातील मित्रमैत्रिणींचा बाईकर ग्रूप सोबत होता. अनिश बाईकर, मी व अथर्व अर्थात पिलीयन. 
खूप सार्या आठवणी व अनुभव सोबत घेऊन परतलो. पॅनगॉंग लेक वरून परतताना चांगला पासवर लॅन्ड स्लाइड झालेल्या बर्फातही अडकलो. अगदी धम्माल टूर झाली. कार मधून फिरण्यापेक्षा ऊन, वारा, गारा व पाऊस थंडी झेलत बाईकवर प्रवास करण्यात एक वेगळा अनुभव आहे. लोक थंड ठिकाणी सुंदर स्वेटर कानटोपी घालू फिरतात तेव्हा आपण बाईकर थंडीने गारठून फुटलेली थोबाड घेऊन बाईकींगचे टिपीकल जॅकेट घालून बिनधास्त मार्केटभर वावरायला शिकतो.  

फक्त नॅशनल हायवे वरूचा हा प्रवास. 26 तारखेला मुंबईहून सुरू केलेला प्रवास व नऊव्या दिवशी लेहला पोहोचलो.  दर्म्यान लक्षात आले की रोजचा दिवस एक वेगळा प्रांत .. व वेगळे वातावरण तसाच वेगळं चॅलेंज. 
भिवंडी, कपाडगंज, भिलवरा, नॉयडा, दिल्ली, चंदीगड, ऊधमपूर, सोनमर्ग, कारगील, लेह, पॅंगॉंग लेक .. ह्या रसत्यावरची लांबवर दिसणारी डोंगरे , गिरीशिखरे चालत्या बाईकमागे बसल्या बसल्या त्या स्पीडनेच कॅमेर्यात बंधिस्त केली. साधारण अडीच हजार फोटो असावेत .. 

रोजची सकाळ व प्रवासाची सुरूवात लांबवर दिसणारे एक शिखर .. दिवसभर जणू तो डोंगर डोंगर करत सुसाट बाईक रसत्याने धावत असे. सुर्य मावळावा तसे लक्षात येइ की आपण सकाळी ज्या शिखराचा पाठलाग करतोय, आता संध्याकाळी आपण त्यावरच उभे आहोत. 

असे एक एक शिखर गाठत पोहोचलो एकदाचे लेह ला .. 

जवाहर टनेल पार केले आणि हेल्मेटवर टपाटप गारा पडू लागल्या व घाटावर गोठलेले धबधबे दिसू लागले ..  अगदी पांढरेशुभ्र बर्फ झालेले धबधबे सुरूवातीला मजेशीर वाटले खरे .. 
नंतर पुढे डोंगरावरचे पाणी खाली येता येता गोठले की काय असेही वाटू लागले. जाऊ तेथे रंग वेगळे. द्रासला डोकावणारा टायगर हील .. भारतीय पाकिस्तान इतिहासाची झलक देतो. नदीच्या पाण्याचे, डोंगरांचे, झाडांचे सगळ्यात ठरवून घडवलेली विवीधता.  कारगीलला तर आहाहा .. प्रत्येक डोंगर वेगळ्या रंगात .. काय सांगू .. पण हो .. त्या रसत्याला भितीही तितकीच की ! 
कारगीलहून तीस किलोमीटर मुलबेखवर आणि पुढे अगदी प्रेमात पडावे असे डोंगरांचे आकार. लामायुरूला संन्यास घेऊन रहायला जावं असं काही भन्नाट. तेथे जगातील सर्वात जुन्या बौद्ध मॉनेस्ट्री (मठ) आहे. ते भव्य डोंगर व त्यातील नैसर्गीक गुंफा खालून मुंग्यांचे वारूळाची आठवण करतात... किती सुंदर 
आहेत ते... 

परतलंयावर ही गिरीशिखरे मी माझ्या चित्रांमध्ये रेखाटायला सुरूवात केली. 
मग मोठमोठे कॅनव्हास व माझे कॉम्पोझीशन. लॅन्डस्केप पण भावनाचे .. भावनाच्या पद्धतिचे .. भावनात्मक गंध असलेले. 
दोनतीन वर्षात विविध गिरीशिखरे रेखाटली. 
त्या प्रवासादर्म्यान त्या त्या ठराविक राज्य व वातावरणाला साजेस गाणं आठवायचं .. मग तो संपुर्ण दिवस ते गाण मनातून सोबत असायचं ...

 चित्तोरगडचा किल्ला लांबून दिसावा आणि डोळ्यासमोरून वहीदा रेहमान एखाद्या ट्रकवर चढून  "कांटोंसे चीर के ये आंचल " गाणे गात गडाच्या कठड्यावरून पायात घुंगरू बांधून नाचत जावी... 

जसजसे काश्मीरचे बर्फातले डोंगर दिसू लागले , मला सिलसिला सिनेमातील गाणी आठवू लागली आणि माझ्या चित्रांमध्येही काही ओळी माझ्या कवितांसकट हस्तलेखन स्वरूपात ब्रशने चित्रात उतरू लागली. 
ही चित्रांमध्ये लेखनाची सुरूवात . त्या दर्मयान मी मोडीलिपी शिकत होते.  सुरूवातिचे कॅनव्हास मराठी हिंदी इंग्रजी असले तरी नंतरचे मोडी लिपीत आहत. कारण मी काय लिहीले आहे ते रहस्य ठेवता येते, पण विचारांचा गंध मात्र दरवळर राहतो. तसेच मोडीलिपीचा सरावही सहज होतो.  

 ते तसे काम करताना तेव्हा जाणवले नाही पण महिनाभर एका कॅनव्हासवर लिहीत राहीले आणि हळूहळू संपुर्ण संच तयार होऊ लागला. वाढीव काही आठवणीतील  डोंगरही घेतले , शिवनेरी आणि ट्रेन मधून दिसणारा मुम्ब्रा येथील देवीचा डोंगर. माझ्या स्टुडीओतील खोलीतून दिसणारा हाजी मलंग देखील चार बाय चार फुटावर रेखाटला. तेव्हा माझी लेक स्कारलेट जन्माला येणार ही बातमी व तिच्या जन्मानंतरचा संयममुळे हे बारीक लेखन शक्य झाले असावे.

  ही गिरीशिखरे आणि त्यावर केलेले लेखन दोन एकल प्रदर्शनात खूप गाजली. 
खाली दिलेले एक चित्र कदाचित सोनमार्ग येथील मार्गाचे आहे. दुसर्या चित्रात सिंधू नदीचा गंध पकडायचा प्रयत्न केला आहे. 
सहा बाय चार फुटांचे ह्या दोन्ही कॅनव्हासवर सिलसिला चित्रपट दोन महिने दरवळत होता ... कदाचित आजही दरवळतोय ! 
     ....... BhavnaSonawane.

No comments:

Post a Comment