Monday, September 11, 2023

अवजारांची दसरा दिवाळी अंघोळ

Latepost Dasara ... 
गेल्या वर्षीचा पावसाळा जरा लांबलाच अन् दसरा आला ... वर्ष सरतोय तरी हा व्हिडीओ समोर येतो अन् आठवणींना उजाळा देत आनंद देऊन जातो. दिवाळीला सुवासित तेल उठणं लावून लेकरांना अंघोळ घालावी तशी वर्षातून एकदा लोखंड धातूच्या अवजारांचा तेलाने अंघोळ घालावी अन् आळसावलेली कटर प्लायर हतोड्या कामासाठी सज्ज व्हावेत....‌
2002 ला पाच वर्षाचा चित्रकला अभ्यासक्रम पुर्ण झाला .. दोन वर्ष शिक्षिकेची नोकरीही सांभाळली अन् हळूहळू चित्रप्रदर्शनांची  सुरूवातही झाली. पक्कड हातोडी वगैरेंची ओढ पुर्वीपासूनच होती. छोटे छोटे कोर्सेस करत मेटल इनॅमलींग ( मीनाकारी) साठी फर्नेस घेतल्या. माझ्या मेटलच्या ट्रेनरने अवजारे मिळवण्याचे ठिकाण शेवट पर्यंत सांगितले नाही. कामासाठी छोटीशी स्वच्छ जागा तयार झाली. अधूनमधून काम करत राहिले. त्या दरम्यान अनिश तामिळनाडूत एका लोकल कलाकाराकडून मंदिरासाठी तयार केले जाणारे तांबं धातूतील मेटल रेपोझी शिकला होता पण शिक्षक तामिळ असल्यामुळे पारंपारीक नावांची व पद्धती समजण्याची अडचणही झाली. ह्यातील बरीचशी अवजारे तामिळनाडूतील कांचीपुरम जवळील एका गावातून मिळवली. मदत करणार्या तिथल्या मित्राने हे टूल बनवणार्या कामगारांना दारू पाजून अवजारे मिळवली होती. 

सुरूवातिला जुगाड करत काही व्यावसायीक स्वरूपाची कामे हाताळली. त्या काळात ना नफा ना तोटा तत्वाने खाऊनपिऊन अगदी सोबतचे हेल्परचा चांगला फायदा करून अशी कामे पार पाडली. एक एक काम दोनतीन महिने रात्रंदिवस एक करून धम्माल केली . 

कधीतरी आठवण आली की ह्या माध्यमात खेळते. एकवीस वर्ष लोटली . पधवीधर चित्रकार म्हणून वावरताना इतर माध्यमं हाताळणे म्हणजे ' चेरी ऑन द टॉप ' असते हे अनिश आणि मी नेहमीच अनुभवत आलो आहे. पाच वर्षांत दृष्य कलाकार म्हणून बरीच परिमाणं हाताळली जातात त्यामुळे इतर माध्यमं एकदा पद्धत कळाली की सहज आणि अगदी व्यावसायीक दृष्टीकोनातून हाताळणे सोपे जाते. 
म्हणतात ना ... 
आधी कविता समजायला शिका ... मग वाद्य आणि गायनाचा सराव सुरू करा ... त्यातून अभिनय जमू लागला की नृत्य अंगिकारा .... 
तसेच आधी पेन्सिल .. मग पेसटल .. जलरंग .. तैलरंग व इतर .

सरावाने मुर्त .. अमुर्त... रियालिझम .. ऍबस्टरॅक्ट यातील फरक रसिकाला कळतो. निसर्ग मुर्त सोबत अमुर्त ची ही झलक देत असतो. ज्याचा नझरेचा सरावच नाही त्याला अमुर्त असे काही कधीच कळत नाही. 

 चित्र म्हणजे टू डायमेंशनल .. द्विमीत डिझाइन समजायला लागले की थ्री डायमेंशनल .. त्रिमीत हळू हळू जमू लागते.  तरी बरेच शिकायचे उरलेले असते पण पाऊल खुणा पाहिल्यावर असे दिसते की जे घडलंय ते ही खूप सुंदर आणि नाविण्यपुर्ण आहे. तरी धडपडावे अन् नवे काही शोधत रहावे कारण आपण कलाकार आयुष्यभर एक अभ्यासक असतो ! 
       ......... Bhavna Sonawane . September 2023.