Thursday, June 29, 2023

चित्राविषयी काही ..

राग येत नाही पण हसू येतंय .. 
एखादा व्यक्ति हौस म्हणून एखादे गाणे गुणगुणणारा स्वत:ला  गायक म्हणवतो का ? 
फार तर फार  कराओकेची साथ घेऊन गायील. 
तसेच वरातीत नाचणारा स्वत:ला नर्तक चा टॅग लावून फिरत नाही नं ... 

पण हल्ली चार चित्र वेडीवाकडी नक्कल करता आली की  लगेच स्व: घोषीत चित्रकाराचा बायोडेटा  बनवून घेतात.  निव्वळ शाळेची इंटरमिडीयेट ग्रेड परिक्षा पास झालेलेही मी चित्रकार आहे असा दावा करतात. हल्ली कुठून कुठून फाइन आर्ट ची डिग्री सर्टिफिकेट जन्माला येइल काही सांगता येत नाही.   

कॉपीराइट हा प्रकार अस्तित्वात असल्याचे त्यांना माहित देखील नसते. एखाद्या आर्ट गॅलरी च्या चित्र प्रदर्शनासाठी  चित्रकार  निवडताना तर एक एक मजेशीर किस्से तयार होतात नै. 

ह्यात मी सेल्फ टॉट आर्टिस्ट बद्दल बोलत नाही.स्वत:मध्ये चित्रकलेची गुणं जाणून योग्य मार्गदर्शन, अभ्यास व नियमीत सराव करून त्यातील मोजकेच उत्तम कला सादर करतात व स्वत:ची शैली तयार करून त्यावर ठाम राहतात हा एक अपवाद आहेच 

कित्येक कलाकार पोटापाण्यासाठी आजकाल एक एक विषयाचे वर्कशॉप घेत आहेत. आता अशा वर्कशॉपचे पीक खूप घातक ठरू लागले आहे.  त्यात विद्यार्थी  काय शिकले .. काय व किती सराव केला .. खरंच बरोबर अभ्यास सुरू आहे का .. ह्याचे मुल्यमापन केले जात नाही. दोन चार दिवस सराव घेवून विषय संपवला जातो.  अगदी दहा वीस ची बॅच बाहेर पडावी तसे हे सर्टिफिकेट कलाकार मार्केट मध्ये व्यावसायीक चित्रकाराचा टॅग लावून फिरताना दिसत आहेत. आपण वापरत असलेले माध्यम किती अवघड आहे असेही ढोल पिटताना दिसतात. मुळात सर्वच माध्यम कितीही सोपे वाटले तरी तितके अवघडच.

पदवीधर चित्रकारांना अहंकार नसावा तेवढा अहंकार  खोटा बायोडेटा पुढे सरकवणारे दाखवतात.  चित्र कॉपी असल्याचे कबूल करत नाहीत.  वर मेरा इनस्टाग्राम अकाऊंट है .. मेरे पास चित्र के खरिददार भी है ... असे काहीसे उत्तर येते. 

हे वाढत चाललंय ... आणि वाढत राहणार .... 
कलाकृती छोटी असो वा मोठी ... स्वस्त असो वा महाग ... चित्र खरेदी करणार्यांनी नक्कीच कलाकारच तपासून पहायला पाहिजे म्हणजे कला क्षेत्रला योग्य न्याय मिळेल व कला रसिक दिशाहीन होणार नाही  !
               ........ Bhavna Sonawane