Sunday, May 21, 2023

स्वागत थोरात ..

एकदा स्वागत सरांना विचारले होते .. सर तुमचे शिक्षण किती ? 
मी ? ... अगं मी खूप कमी शिकलोय. .. तू हसशील .. 
म्हणजे किती ? 
ते तूच ठरव किती असेल ... 
मग ह्या अंध मुलांसाठी कधीपासून काम करताय ? 
खूप वर्ष झाले आता .. अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर बालचित्रवाणीसाठी एका माहीतीपटाचे लेखन मी केले होते...
... हळू हळू लक्षात आले की त्यांची आकलन क्षमता भन्नाट असते पण जगात वावरताना अनेक अडथळे असतात. त्यातून मला ह्यांच्यासाठी काही न काही धडपड करायची दिशा मिळत गेली. मला आजही माहीत नाही ते किती शिकलेत. 
पण त्यांच्या आधाराने कित्येक मुलामुलींना आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कित्येक खूप शिकले आहेत व खूप प्रगती केली आहे.

पर्वा ठाण्याला त्यांच्या मोबिलिटी वर्कशॉप मध्ये काही वेळा करिता गेले होते. येथे काठी प्रशिक्षण देण्यात येते. स्वागत सर व टीम प्रत्येकाला रसत्यावरून चालायला , पार करायला, खड्डे चुकवायला इ. गोष्टी शिकवतात. मी तेथे गेले तेव्हा एका खेळात अंध मुलांना आकार व सुवासाने भाजी व फळं ओळखायला शिकवण्यात त्यांची संपुर्ण टीम बिझी होती. त्यानंतर मुलांना गणिताचे आकडे लक्षात रहावेत म्हणून एक खेळ .. 

असे खेळा खेळातून ते त्या अंध मुलांकडून नाटकही करून घेतात म्हणे !  अपुर्व मेघदूत आणि तीन पैशांचा तमाशा मी पाहिलेत. ही दोन्ही नाटकं पाहताना त्यातील कलाकारांना आपल्यासारखे आकार .. रंग .. पाहता येत नाहीत हे आपण विसरतो इतके सहज हे कलाकार स्टेजवर वावरत असतात. 
किती बारकाईने मुलामुली अनेक गोष्टी शिकत घडत जातात हे लक्षात येते. त्यातूनच शेकडो अंध मुलांच्या मनात आत्मविश्र्वासही निर्माण झाला आहे .. कित्येक पदवी मिळवून आज चांगल्या पदावर नोकरी संभाळत आहेत. अनेकांची लग्नही झाली आहेत. 
 हॅट्स ऑफ टू स्वागत थोरात आणि सोबत काम करणारी त्यांची संपुर्ण टीम ..
      ...... Bhavna.