Thursday, July 27, 2023

असंख्य तुकडे चित्राचे ....

एका ,आठ बाय चौदा  आकारमानाच्या चित्राचे तुकड्यांनी काढलेले फोटो  आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शेकडो रचना ... 
तो प्रत्येक तुकडा एक वेगळे चित्र जणू ... 

1995 फाउंडेशन वर्गात शिक्षकांनी वर्षाच्या शेवटी घेतलेल्या दोन असाइनमेंट मध्ये कागदावर ' चित्र ' विषय हाताळला होता.  छोटीशी एक बाय एक इंच खिडकी करून कागदभर  खिडकी फिरवायची. प्रत्येक खिडकी एक वेगळे चित्र म्हणून तितकीच ताकदीची वाटायलायला हवी ...हा नियम ... 
आजही तोच नियम घेउन चित्र जगत असते .. मजा येते असे काम करायला.... ! 
एका मोठ्या चित्राचे डोळ्यांनी हजारो तुकडे पाडायचे .. सगळेच वेगवेगळे अनुभवायचे आणि सगळ्याच रचना वेगवेगळ्या आणि परिपुर्ण .. सर्व भावले की झाले चित्र पुर्ण.
 मग त्यात प्लेन रंगाचा ब्रश स्ट्रोकही सामावलेला असतो आणि सुखात नांदत असतो .. प्रत्येक बारीक आकारही डोळ्यातून सुटेनासा होतो. 
जणू त्यावर वर्षभर काम चालत रहावे ... !! 
 ...... Bhavna Sonawane. 2023. July 27.

Thursday, July 13, 2023

नऊवारी व लावणी ..

मी व सोसायटीतील इतर मुलं तिला मावशी म्हणत असू. कमला करगुटकर (अनघाची आई) ही माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ति. एकाच सोसायटीत राहत असल्यामुळे खूप धम्माल करायचो. अनघा पेक्षा ती माझी अधिक जवळची मैत्रिण झाली होती. इ. दहावीत शिकत असताना नाताळच्या सुट्टीत सर्व मुलांना घेऊन आम्ही जवळ जवळ तीस पस्तीस सोलो .. ग्रूप  .. इ. नृत्य , मंगळागौर  व स्कीट बसवले होते. अगदी नर्सरी च्या मुलांपासून ते कॉलेजला शिकणारी अनघा .. सर्वच होतो त्यात .  
एक लावणी तू कर असं म्हणताच काष्टा नेसावा लागणार म्हणून मी नाक मुरडलं होतं आणि मी किती चुकते आहे हे मावशीने सांगितले.  लावणी ह्या नृत्यशैलीचे महत्व व बारकावेही समजावून सांगितले. नऊवारी साडी सुटसुटीतपणे  नेसायला शिकवली. माझे सुरूवातिचे नाच मावशी व अनघा बसवत असे. फिल्मी गाणी निवडण्यापासून ते ड्रेसही आम्ही तिघी मॅनेज करत असू. एखादे गाणे निवडले की त्या गाण्यातील ठराविक नटीचे हावभाव व बॉडी लॅंगवेज नीट टिपून घ्यायचे हा प्रयत्न. मग नृत्य त्या शैलीत बसवायचे. घरात उपलब्ध असलेल्या कपड्यांपैकी तो ठराविक पोशाख तयार केला,मावशीचे सोन्चांयाचे पाणी चढवलेले चांदिचे दागिन्कीयाने सजले की स्टेज वरची राणी मीच जणू ! 

फोटोतील गुलाबी साडी अनघाच्या आजीची. ती खूप जुनी ठेवणीतली डाळिंबी  रंगाची इंदुरी साडी जी मी बर्याचदा नेसली... शेवटी विरली. 
लावणी व नऊवारी साडीवर तेव्हापासून माझे प्रेम जडले. पुढे कॉलेजला वर्गाची मंगळागौर व त्यासाठी नेसलेल्या साड्या, तो धम्माल दिवस .. ती स्पर्धा आणि जिंकलेले पहिले बक्षीस आजही आठवत.  आम्ही मुलींनी मिळून मुलांनाही एका गाण्यासाठी नऊवार साडी नेसायला मदत केली होती. 
कित्येक लावणी व त्यातही फ्युजन तयार करून कॉलेजच्या सोहळ्यात सादर केले. बक्षीसही जिंकली. त्याच दरम्यान भरतनाट्यम ही शिकायला घेतले. नंतर जगण्याच्या धडपडीत हे सर्वच विसरले ... 
     .... Bhavna. July 14.2023.