Wednesday, March 30, 2022

गुंफण ...

कधी कधी उभ्या आडव्या रेषा उमटत उमटत खूप किचकट जाळी तयार होते ..
त्यापुढे एकमेकांत गुंफलेले आकार रंगासाठी मोकळे होणे अशक्य होते ...
तरी एक एक आकार गाठीतून सुटा होऊन लागतो आणि एकत्रीत .. तरी स्वतंत्र श्वास घेऊ लागतो .. 
पण हे घडणं कधी कधी इतकं किचकट होतं की चित्र पुर्ण होता होता नकोसे होते. 
जणु आपणच गुदमरतोय त्यात .
मग चिडून ते चित्र नजरेच्या पल्याड राहते ...
चार सहा महिन्याने पुन्हा त्यावर हात फिरवायला सुरूवात होते ...
तरी मन भरेना .. आणि शांतता लाभेना. 
पुन्हा दोन महिने ते नजरे आड जात ... 
कधीतरी आठवले की नव्याने रंगांची भर पडते ...
असे घडत घडत एकदाचे तिथेच थांबते ...
पण लांब गेल्यावर त्या चात्राची खरी मजा कळते .. आणि आपल्यालाच मोहात पाडते. 
असे काहीसे आपल्या जिवनाचेही होत असते नै !! 
              .... 30 March 2021. Bhavna

https://m.facebook.com/photo.php?fbid=10207319836468204&id=1654252434&set=a.1359836610005

व्हॅनगॉग ...


किती किती थापा मारते नै तू  ... 
सगळं कसं सुरळीत चाललंय ... 
मस्त मस्त हसणं ...
मस्त मस्त जगणं ...

खरं सांगू ... 
व्हॅनगॉगची उदासिनता आठवते अन् 
काविळी प्रमाणे रक्तात पसरणारा पिवळा माझं मलाच समजावतो ...
बघ मी आता पुन्हा तुझ्या कॅनव्हासवर उतरतोय ...
वाहू देत मला भरभरून ... वेगवेगळी वळणं घेत ... 

म्हणाला ... 
आता तरी आनंदाचे ढोंग कमी कर ... 
ढीगभर  दुष्काळात इवल्याशा रोपांचा किती आनंद तो साजरा करशील ... 

आणि किती किती सूख विकशील !!

Happy Birthday Vincent Van Gogh 

                  ......... Bhavna. March 30. 2021

Wednesday, March 2, 2022

Santaclaus and Malvani Fish Curry

😋Christmas Special ! 
स्कार्लेट : आई .. एक लेटर लिही सॅन्ताक्लॉजला .. क्रीसमसची लिस्ट लिही. मी सही करते. 

खूप सारी खेळणी ... 
3 डेरी मिल्क, 
5 लॉलीपॉप, 
2कॉटन कॅन्डी ,
3 फाइव स्टार , 
3 आईसक्रीम
अजून काय ... 🤔
तुला काही मागवायचे का ?? 

मी : अगं ... एकच काहीतरी सांग त्याला ... त्याच्या पोत्यात काय काय ठेवील .. 
स्कार्लेट : अगं .. खूप पैसे ... खूप खेळणी असतात त्याच्या कडे. 
मी : असतील ... पण तो एकच आहे अन् मुलं हजार ... कुठे कुठे धावेल तो ... 

स्कार्लेट : तरी सांग ... तूला काय पायजे .. 

मी: मला मालवणी फीश करी ... 

स्कार्लेट : ए .. सॅन्ताक्लॉजला मालवणी जेवण बनवता येत नाय 

😄😁😂

निसर्ग, चित्र, मी वगैरे .. स्पर्शज्ञान ब्रेल दिवाळी अंक 2021

स्पर्शज्ञान ब्रेल दिवाळी अंक 2021 मधील माझ्या बालपणीतील आठवणींवर छापून आलेला लेख येथे देते आहे. 

लहानपणी जोगेश्वरी व अंधेरी येथे खूप फिरणं झालं .. कधी घराच्या अगदी जवळच्या जंगल परिसरात तर कधी स्कुटर गाडीनेच गावांचा लांबचा पल्ला. नॅशनल पार्क व आरे कॉलॉनी येथील ड्राईव, आनंद अपार्टमेंट (अंधेरी) बिलडींगची पिक्नीक व पाण्याच्या टाकीवर बसून काढलेला आम्हा चौघांचा फोटो, सोलापूरचा गड्डा येथील फोटो स्टुडीओ , त्यात आमचं कुटूंब जोडून ठेवणारी महत्वाची साथीदार विजय सुपर स्कुटरचा फोटो नाही ..ते पुन्हा कधीतरी .. 

निसर्ग, चित्रं, मी वगैरे:

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. घरात छोट्याशा कुंडीत जगणारं इवलंसं रोपसुद्धा आपल्याला खूप सुख--समाधान देत आपल्या आयुष्याचा भाग बनलेलं असतं. निसर्गाच्या सान्निध्यातल्या एखाद्याच्या बालपणीच्या आठवणी त्याचं पुढील खडतर आयुष्य सुखकर बनवण्यास साथ देतात.
माझ्याकडेही लहानपणीच्या अशाच काही सुंदर आठवणी आहेत. स्कूटरवरून भटकण्याच्या. आमची ‘विजयसुपर’ आणि आम्ही चौघे--बाबा, माँ, मी व माझा लहान भाऊ अनिरुद्ध. मी पहिलीत शिकत होते. तेव्हा आम्ही राहायला होतो जोगेश्वरी, काळूराम दुबे चाळ, शामनगर इथे. मुंबईतली टिपिकल मराठी वस्ती. तिथे सकाळी सकाळी पाण्यावरून कोणी ना कोणी भांडत असायचं. मला ठळक आठवतं तो बटाट्याच्या भाजीचा विशिष्ट वास. जेवणाच्या वेळेला आजूबाजूच्या घरांतून हमखास यायचा. कुणाच्याही घरी नवा टी.व्ही., टेपरेकॉर्डर किंवा कोणतीही नवी वस्तू आली तरी आख्ख्या चाळीला कळत असे. शनिवार--रविवार संध्याकाळी चाळ शांत, सुनसान होत असे. कारण सगळी मंडळी एकत्र जमून दूरदर्शनवर चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असायची.
बाबा झुओलॉजीचे अध्यापक होते तर माँ फिजिक्सची अध्यापिका. सोमवार ते शनिवार ते दोघेही स्कूटरवरून सकाळी सकाळीच कॉलेजसाठी निघायचे. आजही आठवतं::: लिमलेटच्या गोळ्यांसाठी गाठायचो ते दुकान, हापशीवरून पाणी भरणारे, गल्लीत ये--जा करणारे बायका व पुरुष. शेजारच्या घरातला एक म्हातारा पाणी भरून रोज घर धुऊन काढायचा. मग पाणी वाया घालवतो म्हणून त्याला कुणी बोललं की भांडत बसायचा. बबलूताई आणि सरिताताई आमच्या मोलकरणीच्या मुली. त्या आल्या की शाळेत जाण्यासाठी आमची तयारी करून द्यायच्या. आम्हाला शाळेत सोडायला मात्र त्यांचा भाऊ सुरेश यायचा. तो तेव्हा सहावी--सातवीला शिकत असावा. घरापासून शाळेपर्यंत पायी चालत जायला लागायचं. साधारण पंधरा मिनिटं लागायची. रस्त्याने जाताना मध्ये एक नाला लागायचा. त्यावरून पायी चालण्याकरता कच्चा लाकडी पूल होता. पावसाच्या दिवसांत त्यावरून चालताना खूप भीती वाटत असे. दप्तर, रेनकोट सांभाळत चालताना त्या तुडुंब भरलेल्या नाल्यात पडलो तर काय होईल, असं वाटायचं. त्या पाण्याला घाण वास यायचा. आज कधी अशा प्रकारचा वास आला की आपोआप तो ब्रिज आणि त्यावरून दप्तर, रेनकोट सावरत चालणारी आमची छोटी जोडगोळी आठवते.
मी साधारण सात वर्षांची असताना आम्ही अंधेरी, लिंक रोड इथे ‘मॉडेल टाऊन’मध्ये राहायला गेलो. ही श्रीमंत लोकांची वस्ती होती. इथे एक स्वतंत्र बागही होती. पण इथे चाळीतल्यासारखं आमची काळजी घ्यायला कुणी रिकामं नव्हतं. चाळीतला मोकळेपणा नव्हता. कायम बंदिस्त, एकलकोंडेपणा जाणवायचा. सकाळी कसंबसं जेवण बनवून माँ--बाबा कामाला जायचे आणि त्यानंतर घर एकदम रिकामं, शांत वाटायचं. मी आणि पाच वर्षांचा अनिरुद्ध आम्ही दोघेच एकटे; बाहेरून कुलूप लावलेल्या फ्लॅटमध्ये दिवसभर भातुकली आणि चोर--पोलीस खेळत स्वत:ला रमवायचो. अनिरुद्ध लहान आणि खूप मस्तीखोर होता. त्यामुळे त्याला दिवसभर सांभाळताना मला अगदी नकोनकोसं होत असे. मग जितकं प्रेमाने खेळायचो, तितकंच एकमेकांशी भांडायचो. पुठ्ठ्यांची घरं बांधणं, त्यात बाहुल्या नाचवणं तर कधी चादरीचा पसारा बाहेर काढून घर बांधणं हे आमचे दोघांचेही आवडते खेळ. सोमवार ते शनिवार अशा पद्धतीने घरी खेळ आणि शाळा यांमध्ये दिवस निघून जायचे. पण रविवार उजाडला की सकाळी लवकर उठून, तयारी करून माँ--बाबांसोबत विजयसुपर स्कूटरवरून आरे कॉलनीत फिरायला जायचे वेध लागायचे.
महाकाली गुफांच्या रस्त्यावरून पुढे डोंगर, जंगल लागायचं. तिथे वारा वेगळा जाणवायचा. थंड आणि स्वच्छ! आजूबाजूला बरेच गायी--म्हशींचे गोठे होते. बरीचशी भैया लोकांची वस्ती होती. त्यांच्या बायकांच्या भडक रंगाच्या साड्या, डोक्यावर पदर आणि भांगेमध्ये भरलेलं अतिशय सुंदर लाल आणि केशरी रंगांमधील छटा असलेलं सिंदूर आकर्षक दिसायचं. मला त्यांची भाषाही मजेशीर वाटायची. 
त्या मंदिराच्या अगदी समोरच शिल्पकार शिरगावकरांचा स्टुडिओ होता. आजही आहे. खूप मोठमोठी शिल्पं त्या रस्त्यावरून जाताना दिसत असत. ‘महाकाली गुंफा’ हे खूप जुनं, प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं मुंबईतलं ठिकाण आहे. इथून डाव्या वळणाने आमची ‘विजयसुपर’ सुसाट धाव घ्यायची. माझे केस बॉयकट असायचे, बरेचदा मुलांसारखे टी--शर्ट आणि पॅन्ट घातलेली मी स्कूटरवर पुढे उभी राह्यचे. अनिरुद्ध व माँ क्रमाने बाबांच्या मागे बसायचे. त्यामुळे, तो वारा झेलायचे नशीब मला लाभायचे बरे! 
त्या गुफांच्या डाव्या वळणाला अगदी पाचव्या मिनिटाला कमाल अमरोहींचा ‘कमलिस्तान स्टुडिओ’ आहे. इथे असंख्य बॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्म्स तयार झाल्या आहेत. मीनाकुमारी व कमाल अमरोहींच्या जीवनाचा महत्त्वाचा इतिहासही त्या स्टुडिओला लाभला आहे. कित्येकदा माँकडून मनोरंजन क्षेत्रातले ते जुने किस्से, कहाण्या ऐकायला मिळायच्या. एखाद्या व्यक्तीचं जीवन आणि मृत्यू त्याच्या जोडीदाराच्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची कहाणी आहे. कधीतरी तिथे एखाद्या चित्रपटाचं शूटिंग पहायचा योगही येत असे. 
पुढे बऱ्याचदा रस्ता मोकळा असायचा. लांबवर दिसणाऱ्या डोंगरवाटा, घनदाट झाडी पाहताना आठवड्याचे सहा दिवस आपण शहरातल्या बंदिस्त वातावरणात शाळा आणि घर हा खेळ खेळत असतो याचा विसर पडलेला असायचा. वाटेत कुठे पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा पडलेला असायचा तर कधी त्या काळ्या रस्त्यावर मोहवून टाकणारी लालकेशरी गुलमोहराची निसर्गनिर्मित रांगोळी घातलेली असायची. कधी झाडांच्या फांद्या खालपर्यंत झुलत असायच्या आणि मग त्या फुलांनी बहरलेले गुच्छ तोडून घ्यायला आम्ही दोघे पळत सुटायचो. 
मला आठवतंय::: एका बसस्टॉपवर ‘मॉडर्न ब्रेड’च्या पाकिटाचं मोठं डिझाइन केलेलं होतं. म्हणजे बारा--पंधरा फूट लांबीचा लाकडाचा ब्रेडचा पुडा. तो बसटॉप लांबूनच दिसायचा आणि आपण ‘आरे कॉलनी’त आहोत हे लक्षात यायचं. 
त्यापुढे आरे कॉलनीतली छोटीशी बाग आणि मग नॅशनल पार्कला जोडरस्ता लागायचा. जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही घरी परतायला निघायचो. आइस्क्रीम किंवा फास्टफूडची सोय तेव्हा नव्हती. त्यामुळे पिकनिकची व्याख्या एवढीच होती. मग तिथूनच यू--टर्न घेतला जायचा. त्याआधी आम्ही गोळा केलेल्या फुलं—पानं--फांद्यांनी संपूर्ण स्कूटर सजवायचो. उरलेली फुलं दोघे ओंजळीत धरून ठेवायचो. घरी पोहोचलो की काही फुलं फुलदाणीत, तांब्यात, पेल्यात सजवून ठेवायचो. उरलेला दिवस ती फुलं न्याहाळण्यात जायचा. दुसऱ्या दिवशी फुलं कोमेजलेली असायची आणि त्याचा खूप त्रास व्हायचा. असं वाटायचं, रविवार संपला तरी चालेल पण ही फुलं कोमेजू नयेत. त्यांचा टवटवीतपणा जणू आपलं जगणं सुंदर बनवतो, तो हातातून निसटू नये असं वाटायचं. 
मी साधारण दहा वर्षांची असताना आम्ही महाकाली रोडवरच्या ‘आनंद अपार्टमेंट’मध्ये राहायला गेलो. चाळीतलं घर ते वन--बी.एच.के. असलेलं हे घर म्हणजे माझ्या माँ--बाबांचं मुंबईत स्वकमाईने घेतलेलं आणि लग्नानंतर बदललेलं सहावं घर होतं. या घराला दोन छोट्या बाल्कनी होत्या. आजही आहेत. अवतीभोवती सर्वत्र हिरवळ असलेला हा परिसर पावसाळ्यात खूप छान दिसत असे. बाल्कनीत लावण्यासाठी बाबा शोभेची छोटी छोटी रोपं निवडून आणायचे. आणि आम्ही दोघे त्यांचे असिस्टंट त्यांच्या मागे मागे झुडुपांत घुसून छान छान रोपं घेऊन यायचो. मला आठवतंय तिथे मातीत लाल--काळ्या बिया पडलेल्या असायच्या. अतिशय सुंदर दिसायच्या. गुंजेच्या झाडाची ओळख अशी तिथेच झाली. त्यापूर्वी इतकं सुंदर, नाजूक बी मी कधीही पाहिलं नव्हतं. गुंजांची पानं अगदी चिंचेच्या पानांसारखी दिसतात. चिंचेच्या पानांची चव आंबट तर गुंजांच्या पानांची चव मधुर. हे मला खूप नवल वाटायचं. आजही गुंजांच्या पानांची ती गोड चव माझ्या जिभेवर रेंगाळतेय. 
आज मागे वळून पाहताना लक्षात येतं की या निसर्गाने मला घडवलंय. माझ्या कलेने मला आज ज्या उंचीवर पोहोचवले आहे; त्यामध्ये निसर्गाचा वाटाही मोठा आहे. लहानपणापासून जर अशा रीतीने निसर्ग भरभरून पहायला--अनुभवायला मिळाला नसता, या आठवणी नसत्या तर कदाचित माझ्या चित्रांचे विषय वेगळे असते आणि न जाणो मी माझ्या चित्रांच्या प्रेमात किती असते?

*--भावना सोनवणे, बदलापूर.* 
(लेखिका आणि आंतरराष्ट्रिय ख्यातीच्या चित्रकार)

धन्यवाद स्पर्शज्ञान ब्रेल दिवाळी अंक 2021.
धन्यवाद स्वागत थोरात सर 
::::::::::::

गंध गिरीशिखरांचा ..

हस्ताक्षर दिना निमीत्त ...
 
" गंध गिरीशिखरांचा "
2012 पासून मनात गिरीशिखरे हा विषय मनात घोळत होता ... नुक्तच मुंबई ते लेहलदाख बाईक टूर पुर्ण करून आलो होतो. कलाकार, डॉक्टर, इंजीनियर, आर्किटेक्ट, फोटोग्राफर असे विविध क्षेत्रातील मित्रमैत्रिणींचा बाईकर ग्रूप सोबत होता. अनिश बाईकर, मी व अथर्व अर्थात पिलीयन. 
खूप सार्या आठवणी व अनुभव सोबत घेऊन परतलो. पॅनगॉंग लेक वरून परतताना चांगला पासवर लॅन्ड स्लाइड झालेल्या बर्फातही अडकलो. अगदी धम्माल टूर झाली. कार मधून फिरण्यापेक्षा ऊन, वारा, गारा व पाऊस थंडी झेलत बाईकवर प्रवास करण्यात एक वेगळा अनुभव आहे. लोक थंड ठिकाणी सुंदर स्वेटर कानटोपी घालू फिरतात तेव्हा आपण बाईकर थंडीने गारठून फुटलेली थोबाड घेऊन बाईकींगचे टिपीकल जॅकेट घालून बिनधास्त मार्केटभर वावरायला शिकतो.  

फक्त नॅशनल हायवे वरूचा हा प्रवास. 26 तारखेला मुंबईहून सुरू केलेला प्रवास व नऊव्या दिवशी लेहला पोहोचलो.  दर्म्यान लक्षात आले की रोजचा दिवस एक वेगळा प्रांत .. व वेगळे वातावरण तसाच वेगळं चॅलेंज. 
भिवंडी, कपाडगंज, भिलवरा, नॉयडा, दिल्ली, चंदीगड, ऊधमपूर, सोनमर्ग, कारगील, लेह, पॅंगॉंग लेक .. ह्या रसत्यावरची लांबवर दिसणारी डोंगरे , गिरीशिखरे चालत्या बाईकमागे बसल्या बसल्या त्या स्पीडनेच कॅमेर्यात बंधिस्त केली. साधारण अडीच हजार फोटो असावेत .. 

रोजची सकाळ व प्रवासाची सुरूवात लांबवर दिसणारे एक शिखर .. दिवसभर जणू तो डोंगर डोंगर करत सुसाट बाईक रसत्याने धावत असे. सुर्य मावळावा तसे लक्षात येइ की आपण सकाळी ज्या शिखराचा पाठलाग करतोय, आता संध्याकाळी आपण त्यावरच उभे आहोत. 

असे एक एक शिखर गाठत पोहोचलो एकदाचे लेह ला .. 

जवाहर टनेल पार केले आणि हेल्मेटवर टपाटप गारा पडू लागल्या व घाटावर गोठलेले धबधबे दिसू लागले ..  अगदी पांढरेशुभ्र बर्फ झालेले धबधबे सुरूवातीला मजेशीर वाटले खरे .. 
नंतर पुढे डोंगरावरचे पाणी खाली येता येता गोठले की काय असेही वाटू लागले. जाऊ तेथे रंग वेगळे. द्रासला डोकावणारा टायगर हील .. भारतीय पाकिस्तान इतिहासाची झलक देतो. नदीच्या पाण्याचे, डोंगरांचे, झाडांचे सगळ्यात ठरवून घडवलेली विवीधता.  कारगीलला तर आहाहा .. प्रत्येक डोंगर वेगळ्या रंगात .. काय सांगू .. पण हो .. त्या रसत्याला भितीही तितकीच की ! 
कारगीलहून तीस किलोमीटर मुलबेखवर आणि पुढे अगदी प्रेमात पडावे असे डोंगरांचे आकार. लामायुरूला संन्यास घेऊन रहायला जावं असं काही भन्नाट. तेथे जगातील सर्वात जुन्या बौद्ध मॉनेस्ट्री (मठ) आहे. ते भव्य डोंगर व त्यातील नैसर्गीक गुंफा खालून मुंग्यांचे वारूळाची आठवण करतात... किती सुंदर 
आहेत ते... 

परतलंयावर ही गिरीशिखरे मी माझ्या चित्रांमध्ये रेखाटायला सुरूवात केली. 
मग मोठमोठे कॅनव्हास व माझे कॉम्पोझीशन. लॅन्डस्केप पण भावनाचे .. भावनाच्या पद्धतिचे .. भावनात्मक गंध असलेले. 
दोनतीन वर्षात विविध गिरीशिखरे रेखाटली. 
त्या प्रवासादर्म्यान त्या त्या ठराविक राज्य व वातावरणाला साजेस गाणं आठवायचं .. मग तो संपुर्ण दिवस ते गाण मनातून सोबत असायचं ...

 चित्तोरगडचा किल्ला लांबून दिसावा आणि डोळ्यासमोरून वहीदा रेहमान एखाद्या ट्रकवर चढून  "कांटोंसे चीर के ये आंचल " गाणे गात गडाच्या कठड्यावरून पायात घुंगरू बांधून नाचत जावी... 

जसजसे काश्मीरचे बर्फातले डोंगर दिसू लागले , मला सिलसिला सिनेमातील गाणी आठवू लागली आणि माझ्या चित्रांमध्येही काही ओळी माझ्या कवितांसकट हस्तलेखन स्वरूपात ब्रशने चित्रात उतरू लागली. 
ही चित्रांमध्ये लेखनाची सुरूवात . त्या दर्मयान मी मोडीलिपी शिकत होते.  सुरूवातिचे कॅनव्हास मराठी हिंदी इंग्रजी असले तरी नंतरचे मोडी लिपीत आहत. कारण मी काय लिहीले आहे ते रहस्य ठेवता येते, पण विचारांचा गंध मात्र दरवळर राहतो. तसेच मोडीलिपीचा सरावही सहज होतो.  

 ते तसे काम करताना तेव्हा जाणवले नाही पण महिनाभर एका कॅनव्हासवर लिहीत राहीले आणि हळूहळू संपुर्ण संच तयार होऊ लागला. वाढीव काही आठवणीतील  डोंगरही घेतले , शिवनेरी आणि ट्रेन मधून दिसणारा मुम्ब्रा येथील देवीचा डोंगर. माझ्या स्टुडीओतील खोलीतून दिसणारा हाजी मलंग देखील चार बाय चार फुटावर रेखाटला. तेव्हा माझी लेक स्कारलेट जन्माला येणार ही बातमी व तिच्या जन्मानंतरचा संयममुळे हे बारीक लेखन शक्य झाले असावे.

  ही गिरीशिखरे आणि त्यावर केलेले लेखन दोन एकल प्रदर्शनात खूप गाजली. 
खाली दिलेले एक चित्र कदाचित सोनमार्ग येथील मार्गाचे आहे. दुसर्या चित्रात सिंधू नदीचा गंध पकडायचा प्रयत्न केला आहे. 
सहा बाय चार फुटांचे ह्या दोन्ही कॅनव्हासवर सिलसिला चित्रपट दोन महिने दरवळत होता ... कदाचित आजही दरवळतोय ! 
     ....... BhavnaSonawane.

IRA ...

हिच्या आवडीच्या कामांपैकी .....
*समोर दोरीवर वाळत असलेले बेडशीट खाली खेचून फाडणे ... 
*खास करून पाहुण्यांचे चपला बूट चावणे .. 
*ग्रील मधून हाताने पेपर सरकवून खेचून तुकडे करणे.... 
आजच कामवाली ची चप्पल शोधून ग्रीलमधून काढून चावून झाली व माझा मारही खाल्ला ...! 

काय सुख मिळतं तिला ..काय सांगू .... चेहरा अगदी तरतरीत होतो ... ते तुकडे तुकडे विखूरलेले असतात आणि भाव जणू खूप महत्वाचे काम केलेय ...
एकदा तर नुकतेच आलेले कुरीयर पार्सल तोंडी लागले .... 
पण तिला समजवायचे कसे कळत नाही.
खूप आवडीचे काम आहे ते ...
 आमचे सामान फाडाफाडी समजू शकते पण तिचे स्वत:चे अंथरून तरी तुकडे तुकडे करून नये ना ... ते ही एवढ्या गारठ्यात. आम्हाला थंडी वाजली की तिला कपडे घालायचे अन् तिने मात्र आजवर एकही टी-शर्ट अंगावर ठेवला नाही .. 

घरी कोणी आलं की हिला स्वत: माणसा सारखे ग्रील चे दार हाताने उघड बंद करायचे असते ... 
आणि जिद्दीने स्वत: दोन पायांवर .. हातांनी धरून दोन मिनीट मिठीत उभे रहायचे असते .. 
ही घरी आल्यापासून रस्त्यावर चालताफिरताना दिसणार्या कुत्र्यांचे चेहर्याचे हावभाव लक्षात येवू लागलेत. 
कुणी रस्त्यावरून शेपूट हलवत गाणं पुटपुटत डोलत चालणारं  मस्त कलंदर .. कुणी गॅंग लीडर तर कुणी पिल्लांचा रखवालदार तर कुणी सतत कसल्यातरी चिंतेत असलेला चेहरा ... 

हे नव्यानं कळण ... म्हणजे शिकणं ... 
जगात शिकण्यासारखं खूप काही आहे ... 
शिकण्याची ... बस मन समाधानी राखण्याची इच्छा हवी..... 
..... जे पेराल ते उगवेल ..... आणि ते आपलंच असेल हे नक्की ! 
                           ........ Bhavna Sonawane.

Tooth Fairy Tales 2.

Tooth Fairy Tales 2. 
❤️ Innoscent Souls ❤️

स्कारलेट : आई .. कालपासून दात तोडून पाकीटात ठेवलाय. टूथ फेरी आली नाही अजून 

मी : तुला माहितीय ना .. ती लेट येते नेहमी. 

स्कारलेट : ह्या वेळेस मी सिक्स हंडरेड रूपीज मागितलेत. 

मी : त्या पाव सेंटिमीटर दातांसाठी?? 

स्कारलेट : होय ! तर काय !! 

मी : तिने सोनं विकत घेतलेल परवडेल त्यापेक्षा 

स्कारलेट : सोन्याचा तिला काय उपयोग ?? 

मी : मग दातांचा काय उपयोग ?  

स्कारलेट : दात एक्सचेंज करते ती. मिल्क टीथ जमा करते आणि नवे दात देते. 

(दुसऱ्या दिवशी)
स्कारलेट : आई ... टू हंडरेड रूपीज ठेवलेत टूथ फेरीने पाकीटात. मी फिफ्टी रूपीज ठेवलेले तिच्यासाठी. 

मी : म्हणजे वन हंडरेड फिफटी तुझे. 
पण तिला तू का दिलेस पैसे? 

स्कारलेट : ती मी टूथ फेरीला टीप दिली !!
😀

ती की तो ...


नुकतीच अतिशय वाईट घटना कानावर पडली. 
मुलाची आई एक संवेदनशील चित्रकार आहे. ह्या दुःखातून बाहेर पडायला तिला न जाणे किती दिवस लागतील. 

 फरीदाबाद येथील एका प्रतिष्ठीत शाळेत दहावी वर्गात शिकणाऱ्या एका मुलाची शाळेतील इतर मुलांकडून सतत छेड काढली जात होती. कारण काय तर तो बोटांना नेलपेंट लावत असे. सतत त्या मुलाला काही विशिष्ठ शब्द वापरून हिणवले जाते होते.  त्या शालेय  मुलांची मजल त्या बिचाऱ्या मुलाला शारिरीक / लैंगीक इजा करण्या पर्यंत गेली. हे सर्व सहन न झाल्या मुळे त्या मुलाने पंधराव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. 

आई एक चित्रकार आहे व त्याला बालपणापासून एकटीनेच संभाळून लहानाचे मोठे केले. 

        मुळात तृतीय पंथी ही जमात... तसेच  समलिंगी... मग ती गे असो वा लेसबीयन .. हे समाजात वावरणाऱ्या लोकांपैकी काही अपवाद असतात. पण ती ही माणसंच की. शरीर रचना सारखीच... भावना ही सारख्याच. तरी काहीसे वेगळे. 

        प्रत्येक स्त्रीमध्ये कमी अधिक मात्रेत एक पुरुष लपलेला असतो. तसेच प्रत्येक पुरुषात कमी अधिक प्रमाणात स्त्री असते. 

हा खेळ testosteron estrogen चा असतो. पुरुषांमध्ये testosteron नीट प्रमाणात असतो तर स्त्रियांमध्ये estrogen अधिक प्रमाणात बनते. 

        एखादा पुरुष अधीक संवेदनशील असेल तर नक्कीच इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढीव असते तसेच साहजीकच नव्या जगातील ह्या स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोन अधीक प्रमाणात असते .. पण असेना... त्यात काही नुकसान नाही. 

        एखाद्या पुरुषाला भांडी घासायला आवडत असतील किंवा एखाद्या स्त्रिला पुरुषांच्या बरोबरीने काम करायला आवडत असेल तर त्यात काय बिघडले? 

        पुर्वी रूढी परंपरा यांना अतिशय महत्त्व देताना ह्या विषयी मनात अनेक प्रश्न असायचे. पण मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास करताना व हायवेवर टाळ्या वाजवत ही माणसं दिसायची व मनातील प्रश्न काहीसे कमी झाले. 

        तृतीय पंथियांना समाजात जी काही वागणूक दिली जाते त्यातून जिवंत राहण्यासाठी आपल्याला भितीदायक ठरणारे मार्ग ते अवलंबत असावेत. खरं सांगायचे तर ते सजून त्यांच्या झोपडी बाहेर पडतात ते एखाद्या स्त्रिला लाजवेल इतके सुंदर दिसतात. मग मुंबईच्या हाय क्लास एरियातील ह्या छक्यांना पहायचे... 

        कॉलेजला जाऊ लागले तेव्हा एखाद्या मुलामधील मुलीसारखं लाजणं... नाक मुरडणं दिसलं तेव्हा हसू यायचे. ते हसणे एखाद्या मस्तीखोर बाळाला पाहिल्यावर असणाऱ्या हसू प्रमाणेच असायचे. पण अशा गे मित्रात एखाद्या मुलीने मित्र शोधावा... जन्मभर मैत्री अटूट राहते. 

        पुढे परदेशी आर्ट रेसीडेंसीच्या काळास माझ्याच इमारतीत वरच्या मजल्यावर एक भारतीय मुलगी राहत होती. तिने मला लवकरच सांगितले की ती लेसबीयन आहे व तिला एक गर्लफ्रेंडही आहे. तरी आमच्या मैत्रीत काहीही फरक पडला नाही. माझ्यासाठी ती इतर मैत्रिणींप्रमाणेच होती...

        काही वर्षांपुर्वी माझ्या जुन्या स्टुडीओत टाळ्या वाजवत एक छक्का यायचा. सेठ किधर है... सेठ को बुलाओ सांगायचा. अनिश असेल तर त्याच्या हातून तो देईल ते पैसे घेऊन दुआ देऊन जायचा. तो आत नाही हे सांगितले तर मी जणू खोटं बोलतेय असे माझ्यावर डाफरत असे. अधूनमधून त्याची टोळी घेऊन यायचा आणि दाराबाहेर बसून चहा-पाण्याची मागणीही करायचा. घरच्यांनी पुर्वीपासून घाबरवलंय म्हणून कधी त्यांच्याशी बोलत बसले नाही. एकदा मी स्कुटीवर रस्त्यात उभी असता तो छक्का समोरून पैसे मागत गेला पण मला ओळख दाखवली नाही. 

        असेच काही वर्षांपुर्वी अगदी गोरा उंच मुलगा... शाळेतील गणवेशात ट्रेन मध्ये क्लीपा विकत असे. खूप बडबड असायची त्याची आणि हालचाल थोडीशी नाजूकच. काही महिने सरले आणि त्याच्या बोटांच्या वाढलेल्या नखांना रंगीत नेलपेंट दिसू लागले. आता तो अधीकच मटकत चालत असे. ते वर्ष सरलं तसे एकदा पुन्हा दिसला... तेव्हा एका फेरीवाली मैत्रिणीशी बोलताना मानेची हालचाल व अधूनमधून वाजणाऱ्या टाळ्या... 

        सहज पण किती सुटसुटीत जगतात ही माणसं... आपल्याच नादात. न लग्नाची गाठ... न पोरंबाळं पैदा करण्याची काळजी...

          ते तसे.. आपल्यापेक्षा निराळे म्हणून आपल्यातील काहींना वाईट वाटते... पण मला ते सर्वच आपल्यापेक्षा अधिक सुखी वाटत आले आहेत. 

        पण फरीदाबादची काल-परवाची ही घटना मनाला छेद करून गेली. शाळकरी पोरांना कसे काय कळतात हे लैंगिक छळ? कुठून शिकली असतील ती मुलं असं वागायला? 

बरं... शाळेने त्यांची पाठराखण करून ह्या बिचाऱ्या गरीब मुलाला असे छळायला नको होते. बिचाऱ्याला जीव गमवावा लागला. जीवन खरंच एवढे स्वस्त झाले आहे का? 

       .......Bhavna Sonawane. 26.February.2022