Monday, November 7, 2022

गुलाबी ...

स्त्री तुझे रूप अनेक प्रमाणे स्त्री तुझे मूड अनेक म्हणायला हरकत नाही. 
दसरा .. दिवाळी ..ईद .. नाताळ ह्या सणांतील स्त्रीयांच्या मूड ची  कहाणीच निराळी. गेल्या महिन्याभरातील दोन महतवाचे अनुभव सांगते. मजेशीर आहे पण नैसर्गिक आहे हे. अगदी मी देखील कित्येकदा ह्या सणांमुळे मुडस्वींग मध्ये गुंफली जाते. मग आम्हा चित्रकारांच्या भाषेत सांगायचे तर प्रायमरी रंग .. प्राथमीक रंग श्रेणी आठवते. 
 ईद जवळ आली अन् मला माझ्याच एका जुन्या चित्रासारखे दुसर्या एका चित्राची ऑर्डर आली. क्लायंट साधारण साठीची असावी.  साधारण रचना सारखी. थोडे बदल हवे होते. ह्या नव्या चित्रात क्लायंटला गुलाबी अधीक हवा होता. माझी इच्छा नव्हती तो गुलाबी वाढवण्याची पण नाईलाजास्तव एक पारदर्शक  गुलाबी सर्वत्र पसरवला. डोंगरभर पसरलेला हलका गुलाबी. ईद झाली अन् क्लायंटचा मेसेज आला की नको तो गुलाबी चांगला नाही दिसत. मी समजावले होते तेव्हा समजली नाही. आता सण संपला तशी ती  रोजच्या जगण्यात परतली होती. चित्र छान माझ्या मनासारखे पुर्ण झाले. 

आता नुकतंच दिवाळी आली तशी एक ऑर्डर आली. क्लायंट साधारण पस्तीस .. चाळीशीची असावी. तिचे घर रंगवण्याचे काम सुरू होणार होते. माझे एक अपुर्ण  चित्र आवडले अन् ते पुर्ण करेपरियंत थांबायला तयार झाली.त्यात फ्रेश गुलाबी छटा वाढवून  देण्याची मला विनंती केली. मी तिला सांगितले होते की अधीक गुलाबी चांगला दिसणार नाही पण ती ऐकेना. 

दिवाळी सुरू असताना तिला तो वाढीव गुलाबी आवडला पण सण संपला आणि आता तोच गुलाबी आवडेनासा झाला. ते सर्व गुलाबी कमी .. जवळ जवळ नाहीसे करावे लागले. काय म्हणावे स्त्रीयांच्या मूड स्वींगला .. पण हे नैसर्गीक आहे. आपण सण म्हणून सर्वत्र जी काही सजावट करतो ते रंग नंतर नकोसे वाटतात नै. कपड्यांचे ही तेच आहे. हल्ली लग्नसराईत व सणानिमीत्त विकत घेतलेले चमचमणारे कित्येक कपडे, पोशाख निव्वळ जागा अडवून वर्षांनोवर्षे कपाटात पडून राहतात. आणि लाल गुलाबी ची जागाही मनात .. घरात खास ठरलेली असते ... 
          ........ Bhavna.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0fXvPxH5HKNVvf9Q7a7sxhFfVgcpTtWF3HEUH38gyQf2hM6bHvmPQZdcJMFZ1vzjzl&id=1654252434&sfnsn=wiwspwa

Thursday, November 3, 2022

टिकली बीकली ...

सध्या टिकली .. बिंदी विषय किती गाजतो आहे .. 
कोणीतरी कोणातरी स्त्री रिपोर्टरने कपाळावर टिकली नाही लावली म्हणून मुलाखत द्यायला नाकारले म्हणे .. 
असो .. सध्या ह्या बदलत्या जगात टिकली लावायची का नाही आणि लावायची  हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे मला वाटते. टिकली हिंदू धर्माचे प्रतिक म्हणून मी अधूनमधून आवर्जून लावते. मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. पण इतर धर्माचे पोषाख आणि त्यांचे कधी साधे तर कधी निव्वळ नक्षीदार सजणेही पहायला  खूप आवडतात मला. कपाळावर कुंकू काही स्त्रीयांना किती सुंदर दिसतं काय सांगू ..

माझी आई मी लहान असताना म्हणायची की मला कुंकू खूप शोभून दिसते. लहानपणापासून टिकली घरात लावलेली सवय नसल्यामुळे हा  क्रेझ आजही टिकून आहे. कपाळावर आपल्या भुवयांच्या मध्यभागी ओंकार कल्पना करायला शिकले आणि हे कुंकू प्रकरण अधीक आवडू लागले. पण त्या सोबत टिकली ह्या एका रबरी पोताला लावलेल्या कसल्यातरी खळाविषयी प्रश्न पडत असे. कित्येक वेळा तो खळ, चिकटवण्याचा पदार्थ इतका बळकट असतो की टिकली दोन तीन दिवस सहज रित्या जागा न बदलता कपाळाला चिटून राहते. अशा टिकली चे म्हणणे तरी काय ?  

मला हे चिकटलेले आणि ते निघून चिकटपणाचे डागाळलेले कपाळ नाही आवडत म्हणून सकाळी एकदा कुंकू लावायची सवयही लावली. हल्लीचे कुंकू फुलटू रासायनीक असल्याने कपाळावर तो लाल डाग चार चार दिवस तसाच राही. एक दिवशी घरातील सगळ्या कुंकूवाच्या डब्या रिकाम्या केल्या.   मग देवळात जाऊन नैसर्गिक रित्या बनवलेले कुंकू आणून वापरायला सुरूवात केली. ते डबीतील कुंकू महिन्याभरात लाल ऐवजी मरून रंगाचे होत असे. तो ही रंग छानच दिसतो... हे माझ्या विचारातील बदल घडले ते साधारण 2007 नंतर .. त्यापुर्वी ट्रेनमधील खडे असलेली दोन दोन रूपयांच्या पाकीटांपासून आणि क्वालिटी प्रमाणे चककाकणार्या वाढीव किमतीच्या अशा ते लग्नानंतर कोणीतरी सुचवले म्हणून टिकलीच्या साइजप्रमाणे वीस रूपये महागडे फेमस शिल्पा बिंदीही वापरली. ती बिंदी पातळ वेलवेटी पोत असलेले कपाळाच्या त्वचेला त्रास न देऊनही तीन दिवस टिकणारी बिंदी म्हणून नावाजली जात असे. किती मजेशीर आहे नै .. हे बिंदी पुराण ! 

स्त्री असण्याची जाण व नवरा असतीत्वात असण्याचा पुरावा .. म्हणून कुंकू/ टिकली की कपाळ ... नशीब .... हुषारी ... दैवत्व .. ह्याचे प्रतिक म्हणून कुंकू /टिकली. काहीही असो .. 
पण मी घराबाहेर जाताना नियमीत कपाळावर काहीतरी लालसर गोल टिक्का लावू लागले ते  2007 मध्ये मला पॅरीसमध्ये भेटलेल्या एका स्वीडन येथील म्हातारी बाई मुळे.

पॅरीस येथील सिटी इंटरनॅशनल दे आर्ट ह्या रेसिडेन्सीची इमारत एक डी आकारातील चौकोणच जणू .. साधारण दीडशे खोल्या असलेली ही इमारत जगातील कलाकारासाठी खुली असते. भारत वगळता इतर काही देशांतील कित्येक श्रीमंत कला रसिकांनी येथे गुंतवणूक करून त्या त्या देशातील विविध क्षेत्रातील कलावंतांसाठी तीन महिने ते वर्षभर फुकट रहाण्याची सोयही येथे होत असे. मला फ्रांस एमबसी द्वारे ही जागा अनुभवायला मिळाली. इकोल दे बोजा येथील ग्रौथालयही एक महिनाभर हाताळायला मिळाला. 

पॅरीसला येवून एक आठवडा झाला होता. एकटीच रहाणार असल्याने 'जैसा देस वैसा भेस ' अवलंबला म्हणजे आपणही त्याच शहरातील वाटू. कॅजूअल डेनीम व ग्रे .. बेज रंगातील रोजच्या वापरातील कपडे. त्यावर टिकली लावत नसे.  अनोळखी शहरात उगाच हा घाटीपणा कशाला हवा ! पण त्यामुळे मी धीकच पाववाली टाईप्स दिसत असे. 

त्या संध्याकाळी रेसीडंसीतील बेसमेंटमध्ये गायनाचा कॉनसर्ट होता. काही वेगळं म्हणून मी लालभडक कुर्ता घातलेला. म्हणून त्यावर शोभेसा कपाळावर टिक्काही लावला. स्टेजवर दोन जापानी नाजूक सुंदर मुली निळसर फिरोझा ऑरगॅन्झा लांब फ्रॉक मध्ये पियानोची सोबत घेऊन गात होत्या. खूप सुंदर वातावरण तयार झाले होते. जवळजवळ सर्वच हॉल भरला होता. काही वेळात एक जोडपं त्या अंधारात बसायला वाट शोधू लागलं. मी माझा पाय सावरून घेतला पण ती म्हातारी नेमकी धडपडली. सावरत मला सॉरी म्हणाली. मी मनातल्या मनात ' असूदेत गं ... मला लहानगीला कशाला सॉरी बोलतेस ' विचार करत होते तोवर तिचे लक्ष माझ्या चेहर्याकडे गेले अन् " ओह .. आय स्ट्ॅम्प्ड युवर फीट .. यू आर इंडीयन .. सो सॉरी " बोलत पायाच पडायला आली. मी कसेबसे तिचे हात धरले. 
दोन दिवसांनी ती रस्त्यात भेटली. आता माझे कपाळ पाहून मला ओळखले ..
" ओह .. यू इंडीयन गर्ल .. सो सॉरी .. आय स्ट्ॅम्पड मूल्य फीट " 
मी पुन्हा तिला गप केले. 
मुळात मला तेथे जी काही भारतीय आणि अभारतीय माणसे सोबत असे .. बर्याचदा आपण किती कमी आहोत ते बोलून दाखवत असत. पण ही बया वेगळी होती. ती साधारण साठीची पाणीदार डोळे, चेहर्यावर खूप सुरकुत्या असलेली  सुंदर बाई. अधूनमधून आम्ही लांबूनच एकमेकांना रस्त्यात हात करत असू. 

माझे एकल चित्र प्रदर्शन त्याच इमारतीत लागले तेव्हा तर माझी चित्र पाहून ती चित्रांच्या प्रेमात पडली. तेव्हा तिला कळले की मी चित्रकार आहे अन् पुन्हा जणू मला तिची लाथ लागल्याचे दु:ख व्यक्त केले. 

ती माझे चित्र पहायला त्या गॅलरीत रोज येत असे. तिने माझ्या टेबलावरच्या डायरीत तिचे नाव मार्गारेट लिहीले अन् तेव्हा नावासकट तिचे डोळेही माझ्या मनात कोरले गेले. मार्गारेट स्वीडनची व तिने पुर्वी भारतात काही वर्ष योगासन व ध्यानसाधना , रेकी वगैरेंचा अभ्यास केल्याचे समजले.  येथे आपली .. आपल्या देशाची महानता  बाहेरची व्यक्ती आपल्या एका छोट्याशा गोष्टीतून जाणीव करून देते. त्यानंतर मी  खोलीबाहेर .. घराबाहेर पडताना सहसा कपाळावर  टिक्का लावत असे .. भारतीय स्त्री कलाकार म्हणून जगभर मिरवताना ही छोटीशी गोष्ट पण आपले व्यक्तिमत्व घडवणारी .. कशी विसरून चालेल !
 कधी रंगाचा .. कधी कुंकूवाचा .. कधी फिकटशा गंधाचा एक छोटासा टिक्का मग पुरेसा असतो... 
              ........ Bhavna Sonawane.November3. 2022.