Friday, October 20, 2023

कढी आणि राणी ..

नुकतंच मला सातक्षातकार झाला की मी दह्याची कढी चांगली बनवते ... 
किचन मध्ये खूप वेळ घालवायला आवडत नसला तरी कढी शांतपणे आणि फक्त एके फक्त त्याकडेच लक्ष देऊन करते कारण पुर्वी कढी बनता बनता अचानक फुटायची ... तो मात्र  एक तापच होतो नै. 
म्हणजे दूध फाटते .. नासते .. तसे कढी फुटते ! 

आता कित्येक वर्ष कढी छान होतेय ... त्याचे श्रेय मात्र दही व बेसन मिश्रण करायला घेतले की एक मजेशीर गोष्टीच्या आठवणला जाते. 

आपल्या आईच्या हातच्या चवीची किंवा नेहमीच्या स्वयपाक करणार्या हातांची आपल्याला इतकी  सवय झालेली असते की तीच एखादी डिश दुसर्याच्या हातून बिघडलेली खावी अन् तोंड वाकडे करून घरी परतावे अन् तेव्हा घरच्या चवीचे महत्व जाणावे ! 
 लहानपणी  एकदा सुट्टीच्या दिवशी एकत्र खेळता खेळता  शेजारच्या नम्रता व अमीत  कडे  मी आणि माझा भाऊ योगेश आपले ताट घेऊन एकत्र जेवायला गेलो . 

मां ने त्या दिवशी दह्याची कढी बनवली होती. जे बनवलय ते निमूटपणे खायचे हा घरचा नियम. 
नेमके त्यांच्या घरीही दह्याची कढीच होती. आपापल्या ताटातले जेवताना  एकमेकांना चविला कढी शेअर केली . 
अगदी घट्ट ... पिठूळ आणि कच्चवट होती ती. 
मला नाही आवडली. 
कदाचित तेव्हा पहिल्यांदाच जाणवले की हाताची चव काय असते पण एकाच वेळेस एकाच गोष्टीच्या दोन वेगवेगळ्या चवी कशा काय ? 
मां संध्याकाळी नोकरीवरून परतली तेव्हा लगेच हा किस्सा सांगितला. मां म्हणाली की कढी बनवणे खरंतर कंटाळवाणं काम आहे. फोडणी दिली की पळी सतत हलवावी लागते त्यामुळे सहसा बायका एकच  उकळी आली की गॅस बंद करतात मग कढईचई चव कच्चवट लागते तसेच कधी कधी बेसन पीठाचा अंदाजही कारणीभूत ठरतो. 
सोबतच मां नी मला खास कढी साठी एक गोष्ट सांगितली ती अशी होती. 

एक राजा असतो ... त्याच्या तीन सुंदर राण्या असतात. 
राण्या भोळ्या पण बोलायला बोबड्या असतात. 
एक दिवशी त्यांच्याकडे दुसर्या राज्याचे राजे पाहुणे म्हणून येणार असतात. 
हा राजा आपल्या राण्यांना बजावतो की काहीही झाले तरी आपले तोंड बंद ठेवायचे . काहीही बोलायचे नाही. 

पाहुणा राजा जेवायला बसतो. 
राण्या अगदी भले मोठे पक्वानांनी सजवलेले चांदिचे ताट समोर ठेवतात. त्या राजाला एका वाटीत वाढलेली कढी भलतीच आवडते. 
अगदी आनंदाने जेवतो आणि कढीचे खूप कौतूक करतो ... 
आता राण्या खूष होतात. 

राजा : आहाहा ... मी अशी इतकी छान कढी पुर्वी कधीही  खालली नाही ! अगदी पोट भरले पण मन काही भरत नाही ... 
राण्या खुदकन हसतात. 
पहिली राणी : ही गोय पयीने अगदी गोयगोय हयवायची ... 
दुसरी राणी : कयी गोय कयला हेवटी थोइ सायर घाययी की झायं... 
तिसरी राणी : अये अये ... तुम्हाया सांगिययय नै ...तोंड बंय्य ठेयायय ..  बोयायचं नायी हं.. 
मग हसू येते अन् कढी करता करता त्या राण्यांच्या बोबडेपणात कढीला तीन उकळी येईस्तोवर पळी रमते आपण मात्र शांतपणे मनातल्या मनात हसत असतो ... 

खरंच असंख्य वेळा कढी केली अन् ती गोष्ट अजून काही संपेना ... कढी गॅसवर चढली की ढवळता ढवळता त्या राण्या माझ्या कानाजवळ त्यांच्या बोबड्या आवाजात रेसिपी पुटपुटत असतात.

 ...... भावना सोनवणे. 21. Oct. 2023.