Monday, January 29, 2024

मोनालिसा 2024

काही तासांपूर्वी पॅरीस येथील लुव्र म्युझियम मध्ये जगप्रसिद्ध मोनालिसा पोर्ट्रेट वर सरकार विरोधात अन्नधान्यासाठी बंड म्हणून riposte alimentaire (food counterattack) काही महिला कार्यकर्त्यांनी भोपळ्याचे सॉस फेकले असे कळले. 

किती हा पांचटपणा ‌‌ .. 
त्या बिचाऱ्या मोनालिसा ने ह्यांचे काय बिघडवलय ? 
किंबहुना तिचा आणि अन्नाचा काय संबंध ? 
ती कित्येक वर्ष त्या बुलेटप्रूफ काचेच्या फ्रेम मध्ये वातानुकूलित भव्य हॉल मध्ये एकटी राहते. दिवसा हजारों पर्यटक येतात तेथे .. कित्येक तिलाच पहायला लुव्र संग्रहालयात येतात . 
1190 मध्ये बांधण्यात आलेला हा अतिशय भव्य किल्ला कित्येक वर्ष  नेपोलियन संग्रहालय म्हणून ओळखला जात होता. येथे दर वर्षी साधारण ८० लाख पर्यटक भेट देतात. हजारों चित्र, शिल्प , आर्टिफॅक्ट, ऐतिहासिक कलाकृतींचे नमुने तेथे आहेत. नेपोलियनच्या काळापासुन लुटलेला .. मागवलेला ..जमा झालेला फार मोठा खजिना तेथे जपून ठेवला आहे. 
मोनालिसा हे सोळाव्या शतकातील लियोनार्दो दा विंची चे प्रसिद्ध तैलरंगातिल चित्र त्याच खजिन्याचा एक भाग. 

बरं ... 
आपल्याला अन्न चांगल्या दर्जाचे मिळत नाही म्हणून अध्यात मध्यात नसलेल्या बुलेटप्रूफ काचेत रमलेल्या  कलाकृतीवर हल्ला झाला म्हणून निषेध नोंदवावा की अशा कार्यकर्त्यांवर हसावे .. काही कळत नाही. आपल्या देशातील कार्यकर्ते बरे ... काही बिनसले की लगेच विरोधी पार्टीच्या नेत्यांचा कापडी पुतळा बनवतात आणि तो धो धो धोपटतात. 

एकतर कलाकार हे अल्प संतुष्ट. आजचा लियोनार्दो दा विंची ... समाजात वावरण्यासाठी किती धडपडत असतो तुम्हाला माहिती आहे का ? 
चित्रशिल्प विक्रीची गोष्ट आहे हे समाजाला शिकवण्यापासून सुरूवात करावी लागते. त्यात मूळ चित्र बाजुला ठेवून प्रिंट विकत घेणारच ढीगभर असतात. आतातर अशा प्रसंगाने कलाकारांच्या अस्तित्वावरच हल्ला केला जातोय की ... 

त्या  Riposte Alimentaire (Food Counteratack) नावाच्या गटाने या स्टंटची जबाबदारी स्वीकारलीय खरी .. पण कार्यकर्त्यांना पेन्सिल चालवायला येत असतील तर असे चित्रावर भोपळ्याचे सॉस टाकत फिरकलेच नसते मुळी ... 
मजेशिरच आहे हे ... 
रस्त्यावर टोमॅटो टाकावा ... बटाटा टाकावा ... 
फार फार तर शिजवलेले काही टाकायचे तर बेकलेला पाव टाकावा ... कारण भाकरी त्यांच्या देशात बनत नसते.

जगभरातच हवामान खराब होतय .. सगळाच ताण डोईजड होतोय ... हवामान बदलामुळे शेतीवर सर्वात अधिक प्रहार होत असतो हे खरे आहे. भारतात जसे शेतकरी कुटूंबातील नवयुवक नोकरीच्या शोधात शहर गाठतात तसेच इतर कित्येक देशात सुरू आहे. पॅरीस हे देखील त्यातीलच एक. जवळपासची गावं .. शेतं .. रिकामीच असतात. सगळच महाग ...हॉटेलिंग महाग ..  फळभाज्याही महागच.  पण त्या Riposte Alimentaire (Food Counteratack) कार्यकर्त्यानी अती केलंय हे. 
विषय कुठून कुठे फिरवताय ... 

मोनालिसा सोळाव्या शतकातील फ्रेंच चित्रकार  लियोनार्दो दा विंची यांचे चित्र. या चित्राबाबत अनेक गूढ कथा रचल्या गेल्या आहेत. किंबहुना या
कथांमुळे ती जगभर अतिशय लोकप्रिय झाली असावी. एकदा ती म्युझियम मधून  चोरीलाही गेली . काही वर्षांनी सापडली. कित्येक वेळा तिच्यावर हल्ले झाले. 
तिच्यावर म्हणजे मोनालिसा नामच चित्रावर हं .. आम्हा कलाकारांना कलाकृती नावानेच संबंधांची सवय असते. 
कधी ऍसिड , कधी केक , आता भोपळ्याचे सॉस. 
वर तेथील कर्मचाऱ्यांनी चित्रावर काच असल्याने चित्राला धक्का पोहोचला नाही असे कबूल केले. 
म्हणजे थरभर मेकअप केलेल्या  मॉडेलवर सॉस टाकावा अन् नंतर मॉडेल शाबूत आहे असे म्हणत तोंडावरचा सॉस पुसून घ्यावा .. तसे काहीसे ! 

हे असे कसे चालेल ?  पॅरीस हे जगभरातील सर्वात महत्वाचे कलेचे प्रेरणा स्थान आहे. तेथे आज मधोमध वाहणारी सिएंन नदीच्या किनार्यावर चालत  दर पंधरा मिनिटांवर एक म्युझियम  किंवा कला दालन आहे. 
हजारों पर्यटक दर आठवड्याला तेथे येतात ते तेथील महत्वाचा कला संग्रह बघायला. म्हणजे ह्या शहराचा टॅक्स बर्यापैकी टुरीझम , पर्यटनावर जमा होतो. कला जगतात पॅरिसचा खूप मोठा वाटा आहेच आणि राहणार.  तसेच कलाकार व साहित्यिक वर्गामुळे पॅरीस प्रसिध्द आहे व राहणार हे नक्की. 

तेथील सरकारही नवयुवकांना घरबसल्या स्टायपेंड देते असे ऐकून आहे. ह्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना जे काही मिळतंय त्यात पॅरीस पर्यटन खात्याच्या वाटा आहेच की ...  काही वर्षांपुर्वी म्हणे कोणीतरी भल्या माणसाने तेथील घर नसणार्यांना स्वतः:च्या खर्चाने टेंट दिले होते .. तो ही असाच सरकार विरोधातील चळवळीचा भाग होता. जर सरकार बेजवाबदार असेल तर नक्कीच  विरोधात आवाज उठवावा पण विचार करून ठोस पाऊल घ्यावे नै .. पण ज्या जगप्रसिद्ध मोनालिसाच्या चित्राला करोडो लोक पहायला स्वतः: लाखोंनी कमावलेला पैसा खर्च करून येतात .. तीच्यावर असा हल्ला म्हणजे अतीच आहे ... 

मलातर असे वाटते की आता त्या कार्यकर्त्यांना शिक्षा मिळणार असेल तर एखाद्या शेतावर नांगर चालवायला शिकवा.दोनचार वर्ष शेती करू देत त्यांना ... भारतातच पाठवा ना त्यांना ... येथे शेतातच शुध्द हवा पाणी आणि भाज्याही मिळतील त्यांना. पण फुकट स्टायपेंड मिळणार नाही हे मात्र खरं. आजचा युवक स्मार्ट आहे हे आपण म्हणतो पण कुठला राग कुठे काढायचा हेच जर त्यांना कळत नसेल तर काय उपयोग ! 

अशा वर्तणूकीवर जागतिक स्तरावर आक्षेप घेतला जावा. मोनालिसा काय, कुठल्याही कलाकृती वर अशा प्रकारचे वर्तन चुकीचे आहे.

       ...... भावना सोनवणे.

Sunday, January 21, 2024

राम ...

राधा प्रेम शिकवते
शिकवते मीरा भक्ती
सरस्वती दाखवते दिशा शिक्षणाची
लक्ष्मी सांगते महत्व पैशाचे वेळोवेळी  
 
विठ्ठल काळा तरी... 
विठ्ठल नाम निखळ पाणी .. 
वाहत जावं  त्यातच...
आणि सोप्पं करावं जगणं कृष्ण कृष्ण करत

वेळ निभावून नेतं स्मरण विष्णूचं
शंकर मात्र हवा हवासा अकांड तांडव 
ब्रम्ह सृष्टीचा जन्मदाता 
ब्रम्हचारी हनुमान आद्य देव शक्तिचा 

सगळेच कसे वेळोवेळी...
साथ निभावणारे 
सगळेच देव लाडके...
 
एक राम तो एक मर्यादा पुरूषोत्तम 
समजणं त्याला मात्र सोप्पं नाही 
जितकं जवळ कराल ...
तितका तो समोर येइल...
आठवण करून देइल वेळोवेळी मर्यादेची

 धावाधाव करा कितीही जिवाची  
मी आणि माझं म्हणत साठवत रहा काहीबाही
जाताना मात्र सोडायचंय येथेच सगळं काही 
शेवटच्या टप्यावर फक्त राम नामच...
दुसरं नाही काही.
              .... Bhavna. 21st January 2024.