Saturday, February 15, 2020

Ornaments for the Tree ..article by Rahul Thorat
















।। लघुलेख ।।
राहुल धोंडीराम थोरात

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2823835007675569&id=100001472932746

'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' आणि चिपको आंदोलन

काळाघोडा फेस्टिव्हल हे मुंबईतील एक आगळेवेगळे फेस्टिव्हल दरवर्षी एक कलात्मक रंगीन मेजवानी घेऊन येतो। या वर्षीच्या काळाघोडा फेस्टिव्हल मध्ये 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' हे एक विशेष प्रायोगिक इंस्टोलेशन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। प्रतिभावंत आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रकार भावना सोनवणे यांनी 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या प्रायोगिक  इंस्टोलेशनची निर्मिती केली आहे। काळाघोडा फेस्टिव्हलच्या यंदाच्या 'थ्रेड- धागा' या थीमला जोडणारी अनोखी प्रयोगशील संकल्पना आहे। निसर्ग आणि मानव यांना संत तुकाराम यांच्या अभंगाने जोडण्याचा, कनेक्ट करण्याचा भावना सोनवणे यांचा प्रयत्न यशस्वी दिसतो। सिम्प्लिसिटी, सौंदर्यपूर्ण भाव आणि परिणामकारक सकरात्मक विचार मांडणी हे या इंस्टोलेशन चे वैशिष्ट्य आहे।

'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री'  इंस्टोलेशन मुळे 1970 साली भारतात झालेल्या 'चिपको' या झाडांच्या बचावासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची आठवण येते। तसेच राजस्थानातील बिष्णोई समाजातील वृक्ष संवर्धनासाठी लढणाऱ्या प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या स्त्रीयांच्या आंदोलनाची आठवण होते।या आंदोलनाची आतंरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती। म्हणूनच 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' हे इंस्टोलेशन महत्वाचे ठरते। आपल्याकडे सामाजिक बदल हे चळवळीतून होतात। त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी देशपातळीवर चळवळ आवश्यक आहे। आणि अशा कलाकृती चळवळीला पोषक ठरतात। निसर्ग आणि मानव यांची मैत्री ही अनादी काळापासून आहे। पृथ्वीवर मानवी जीवन सुरू झाले तेव्हा पासून ही मैत्री बहरत आली आहे। डार्विनच्या सिद्धांतानुसार मानवी मेंदू हा उत्क्रांतीच्या प्रकियेत डेव्हलप होत गेला तसा निसर्ग आणि मानव यातील मैत्रीभाव यात अंतर पडू लागले। आणि आता तर तंत्रज्ञानाच्या युगात निसर्ग आणि मानव यातील मैत्रीचे नाते जवळपास संपले आहे। प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला संपविण्याचे कसब मानवाने मिळविले आहे। आणि निसर्गाची अपरिमित हानी रोज होत आहे। परंतु यामुळे मानवी अस्तित्व च धोक्यात आले आहे म्हणून पुन्हा एकदा मानव निसर्गाकडे एक मित्र म्हणून बघू लागला आहे। आता त्याला निसर्गाची गरज भासू लागली आहे।

भारतीय संत साहित्यात निसर्गाला अध्यात्माशी जोडून मानवी जीवनाचा मूळ उद्देश अतिशय समर्पक आणि सुलभ अशा भाषेत 'अभंग' स्वरूपात मांडणी करून माणसाला निसर्गप्रति संतांनी अधिक संवेदनशील बनविले आहे। संत तुकाराम महाराजांनी या संबंधी बहुमोल कार्य केले आहे। आणि आजही आपण संत तुकाराम यांचे अभंग आपल्या आचरणात आणि जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करतो। चित्रकार कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक यांना संत तुकाराम यांचे अभंग आकर्षित करतात।

'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या इंस्टोलेशन निर्मिती संदर्भात चित्रकार भावना सोनवणे यांच्याशी मुलाखत घेतांना त्या म्हणाल्या, इंस्टोलेशन हा कला प्रकार विचारप्रसारणासाठी प्रभावी माध्यम आहे। परंतु कलाकाराने या माध्यमात काम करतांना सजग असणे आवश्यक आहे। कल्पना स्वातंत्र्य आहे म्हणून स्वैराचार करू नये। आपल्या विषयाशी संबंधित आकार, रंगसंगती आणि प्रॉप्स वापरले पाहिजे। तसेच कलाकाराकडे निर्मितीचे कसब ही असायला हवे। तरच तुमची कलाकृती ही दर्जेदार होते। प्रेक्षकांवर छाप सोडते। विचार करायला भाग पडते। 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या इंस्टोलेशन निर्मिती मध्ये कापड, पत्रा, अलूमिनिअम पत्रा, दोरा, तार या साहित्याचा वापर करण्यात आला आहे। दहा बाय बारा फूट आकाराचे हे काम आहे। हे इंस्टोलेशन जमिनीवर नसून झाडावर हँग करण्यात आले आहे। आणि तेही झाडाला कुठलाही त्रास न देता, झाड कुठेही न कापता अत्यंत संवेदनशील पणे हे इंस्टोलेशन उभारले गेले आहे। संत तुकाराम महाराज यांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' हा अभंग मोडीलिपी मध्ये सादर केला आहे। ह्या अभंगातील शब्द जणू झाडांसाठी चे दागिने आहेत अशी कल्पना आहे। 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या इंस्टोलेशन ची दखल 'व्होग' या आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतली आहे। विविध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली आहे।

चित्रकार भावना सोनवणे यांनी पॅरिस मध्ये एका आर्ट रेसिडेन्सीत स्कॉलरशिप मिळवून चार महिने कलानिर्मिती केली आहे। या काळात पॅरिस मधील विविध आर्ट म्युझिअम त्यांनी अगदी जवळून पाहिली आहेत आणि अभ्यासली आहेत। यात लूर म्युझिअम, इकोल दे बोझा आणि पोमपीडिव्ह म्युझिअम या जागतिक कीर्तीच्या म्युझिअम चा समावेश आहे। भावना यांचा जन्म हा सोलापूरचा आणि बालपण हे मुंबईत गेलं आहे। आईवडील पेशाने प्रोफेसर आहेत। वडिलांची इच्छा होती की भावना यांनी डॉक्टर व्हावे। परंतू भावना यांची मूळ आवड ही चित्रकलेची होती। चित्रकलेचे शिक्षण त्यांनी रहेजा स्कुल ऑफ आर्ट आणि सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधून पूर्ण केले आहे। चित्रनिर्मिती करीत असतानाच सोबत बदलापूर आर्ट गॅलरीचे कामकाज पहातात। विवीध राष्ट्रीय आर्ट रेसिडेन्सी मधून सक्रीय सहभाग घेत असतात।

भावना या एक प्रयोगशील कलावंत आहेत। सिरॅमिक, ब्राँझ, कॉपर आणि ज्वेलरी डिझाईन आदी कलेचे विविध प्रकार समर्थपणे हाताळतात। भावना यांचे एकूण व्यक्तिमत्त्व हे सकारात्मक आहे। याची छाप त्यांच्या कलाकृतीतून पाहायला मिळते। भावना सोनवणे यांच्या कलाकृतीत आपल्याला निसर्गाची विविध रूपे दिसतात। निसर्गाला आपल्या विविध माध्यमातील कलाकृतीतून आपल्या समोर मांडून आपल्याला निसर्गाप्रती अधिक संवेदनशील बनवतात। निसर्गाप्रती आपले सर्वांची काय जबाबदारी आहे याची जाणीव करून देतात।

No comments:

Post a Comment