खूप वर्षांनी अक्कलकोट व तुळजापुरला जाण्याचा योग आला. स्वामी समर्थ मंदीर, मठ , खंडोबा मंदीर व तुळजा भवानी मंदीर, एका दिवसात दर्शन छान झाले.
त्या आधी सोलापूरलाही थांबता आले. एरवी कामाच्या व्यापात काहीतरी काम काढूनच इतर शहरातील नातेवाईकांकडे जाण्याची संधी मिळते. सोलापुरात सिद्धेश्वर मंदीर, हुतात्मा बाग, नवी पेठ, गड्डा, हातमागाच्या सोलापुरी चादरी, साड्या म्हणजे प्रेमच !
सोलापूर म्हटले की पहिले आठवतं तो सोलापूरचा काळा मसाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काळा मसाला मिळतो. अगदी उत्त्म लागतो. आग्री मसाला, कोल्हापुरी काळा मसाला, कांदा लसूण काळा मसाला व काळा मसाला जैन पद्धतिचा , बिना कांदा लसणाचा असे अनेक प्रकारचे मसाले आपल्याकडे बाजारात उपलब्ध आहेत. पण सोलापुरी मसाला भल्ताच भन्नाट. हो खाण्याची सवय नसलेल्यांनी मात्र जपूनच वापरावा हं. जगातील अनेक व्यसनांप्रमाणे प्रमाणे हा सोलापुरी काळा मसाला देखील एक सवय नसून व्यसनच आहे असे मी नेहमी म्हणते कारण ज्यांना रोजच्या जेवणात चिमूटभर का होईना हा मसाल्यात बनवलेली भाजी खायची सवय असते त्यांनाच ती चव माहीत व त्याशिवाय जेवणही जात नसत.
माझे लग्न झाले आणि अनिश सोबत बदलापूरला रहायला आले तेव्हा दोन चार दिवस जेवण बरे लागले पण पुढचा महिनाभर तरी जेवण नीट जाईना. मला वाटले तोंडाची चव गेली असावी. अधीक लक्ष द्यायला वेळ नव्हता कारण कला महाविद्यालयाचे वार्षिक सबमीशन सुरू होते. बदलापूर-बांद्रा रोजचा ट्रेन प्रवास व घरी परतल्यावर इतर कामांमधूनच वेळ काढून थिसीस ची तयारी यात पहाट होत असे. सुट्टी लागली आणि एक दिवस कळाले की मंजू मावशीच्या घरी जवळूनच शेअर रिक्षा जाते.
दुपारी फिरत फिरत मावशीकडे गेले असता मावशीने जेवायला बसवले. म्हणाली, माझे जेवण बाकी आहे तू पण जेव. टोमॅटोची आमटी केली आहे, सुकी मेथी बनवते. चपात्या व भात तयार आहे.
टोमॅटोची आमटी हे सोलापूरकरांचे ठरलेले गृहीत हं. म्हणजे एक सोलापूरकर दुसर्या सोलापूरकराला टोमॅटोच्या आमटीवर एखादे अमिशही दाखवू शकतो. काही नाही ओ... आपण फोडणीचे वरण बनवतो की नै .. तसंच. तुरीची डाळीची उत्तम लागते. पर्याय नसेल तरच वेगळी डाळ वापरावी. डाळ कमी घ्यावी. कुकरमधून शिट्ट्या काढून ठेवावी पण ढवळू नये. काही जण त्यात खोबरं वगैरे घालतात .. तसेही करू नये... आमटीची चव जाते. चमचाभरच तेलात अगदी जिरे, मोहरी, हळद, हिंग, कडिपत्ता लाल तिखट, भरपूर बारीक चिरलेला लसून आणि चार पाच बारीक चिरून असे सढळ हाताने टोमॅटो घालावे. झाकण लावून मस्त शिजवावे. त्या टोमॅटोचा रंग त्या तिखटाने गडद होतो अन् अगदी सुंदर चकाकी येते. मऊ झाले की त्यात शिजवलेली डाळ घालावी. हलकी ढवळावी पण डाळ घोटून नये.शेवटी चवीपुरते मीठ व असेल तर कोथिंबीर घालावी. झालीच आमटी तयार. ह्या टोमॅटोच्या आमटीला वरण बोलून आमटीचा अपमान मात्र करू नये.
तर मी आणि मावशी जेवायला बसलो. हळूच शेंगदाण्याची खलबत्त्यात कुटलेली चटणी समोर आली. बरेच महिने झाले, सोलापूरचा मसाला खाललाच नाही. आहे का थोडा ?
हो .. आहे की. मी बनवलाय आणि तुझ्या मोठ्या मामींनी देखील सोलापूरहून पाठवलाय बघ .. सांगत मावशीनी एक छोटाशी काचेची बरणी पुढे सरकवली.
आहाहा .. एका प्रिय वाद्याची तार छेडावी अन् ती धून मेंदूत पोहोचून मेंदूचे जे घडावे तसे काहीसे झाले. अगदी व्यसनच आहे की हे ! चांगले की वाईट हे प्रत्येकानं आपापलं ठरवावे हं ...
माझा जन्म सोलापूरचा. मी जन्मानंतर तीन वर्ष सोलापूरातच होते.
ह्या सोलापूरच्या अनेक आठवणी आहेत. जुनाच वाडा, दोन मोठ्या खोल्या व स्वयंपाकाची खोली व मोठे छत असलेले कळ्या पाषाणातील घर आणि घरासमोर एक पिठाची गिरणी. त्यातच मधुमामांनी आणलेल्या पहिल्या नव्या खडूपेटीने मी सुरूवातिचे रंगांचे धडे गिरवले.
.. शकुंतला ... किती सुंदर नाव आहे नं हे .. ती सकू आजी.
राजेश खन्नाच्या बावरची चित्रपटातील ज्या भादूरी सारखी कामसू नलू मावशीचे लग्न अजून ठरायचे होते. मधूमामाही तसे लहानच होते. कॉलेजमध्ये शिकत असावेत. त्यानंतर काही काळातच त्यांनी इलेक्ट्रिकलचे दुकान टाकले. त्या दुकानाला रश्मी नाव दिले. रश्मी हे माझे आधी ठरलेले नाव. नंतर आजोबांचे भगवंत या नावावरून बाबांनी भावना ठेवायला लावले.
तरी कित्येक वर्ष माझ्या लिखाणातील माझे पात्र रश्मीच सांभाळते.
माझ्या आजोळातील भावंडांपैकी सर्वांत मोठी नाजूक गोरीपान पर्करपोळ्यातली प्रभादीदी आजही आठवते. पतीताई, राजू दादा, मंगेश दादा इ. सगळे शाळेत जात असत. सर्वात मोठे केशव मामा व मामी यांना मी इतरांचे अनुकरण करत आजी दादा म्हणू लागले. यांच्या मागे मागे दिवसभर बागडत असे. मां- बाबा तेव्हा नोकरी निमीत्त मुंबईत राहत. अधूनमधून भेट होत असे.
नितीन दादा तेव्हा पुण्यात होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची भावंडाची अख्खी गॅंग धरून पंचवीसतीस जण एकत्र भेटत असू. त्यांच्याही अनेक आठवणी आहेत. नितीन दादाही तेव्हा येत आणि गच्चीवर अनेक जंगलगोष्टी, कुत्री,मांजरी,बेडकं इ. साजेसे बॅकग्राऊंड आवाज व ऍक्टींग करत गोष्टी रचून सांगत असे आणि सकाळी विसरत असे. नितीन दादा आजही कोणाच्या लग्नात भेटला की आवर्जून आमच्या हातावर तो अंडी देणारी कोंबडी, बदक, बेडूक हत्ती,ससे इ. मेहंदीच्या कोनाने रेखाटतो. मेहंदीचे असे आगळेवेगळे संस्कार लहानपणिच झाल्यामुळे आयुष्यात कधीही डिझायनर मेंदीचीसाठी माझ्या मनात जागा झाली नाही. पुढे माझ्या लग्नात मला कोणी नावे ठेवू नये म्हणून पैसे देऊन नक्षीदार मेहेंदी काढून घेतली होती. नहीं तो .. आज वॉज ऑलवेज हॅपी वीथ द डक ऍंड एलिफंट्स !
खूप वर्षांनी सोलापूरला पतीताई व प्रभादीदी. सोबत दोन दिवस घालवले. नितीन दादाच्या स्टुडीओला व्हिजीट देता आली. आज तो सोलापूरात व बाहेरही शिल्पकलेत उत्तमरित्या कार्यरत आहे.
अनेक बालपणीच्या या आठवणी एका काचेच्या बरणीत भरलेल्या काळ्या मसाल्याच्या रूपात स्वयंपाक खोलीच्या कोपर्यात नेहमी रेंगाळत आणि अधूनमधून डोकावत असतात.
खूप गप्पा .. खूप व्यक्तिमत्व आणि त्यावर आधारलेल्या आठवणींची साठवणी. आता माणसे थकत चालली तरी आठवणी कायम असतात नै !
Bhavna Sonawane. 2025.
Khup chan tai.could relate to every word written.nostalgic memories.
ReplyDelete