खूप दिवसांनी मनात रेंगाळलेल्या एका चित्राच्या चित्रकारावर लिहीते आहे. या चित्रकाराची अनेक चित्रे मी पाहिली आहेत. अगदी सहज वाटणारी निलेशची चित्रे खूप गूढ जाणवतात. तो इतर वेळेस अगदी हसत खेळत इतरांना हसवत नाचत फिरताना पाहिलंय. जगत मित्र .. जगत पुत्र .. जगत भैया अशी मी त्याची चेष्टाही करत असते. निलेशची चित्रे मन अडकवून ठेवतात. त्याच्या प्रत्येक चित्रात काहीतरी बोलके असते. वैचारीक पण तरीही सहज .. जडपणा न जाणवणारी अशी ही चित्र. सुरूवातीला एकदोन चित्रांवर चर्चाही केली. मला जे समजत होते तसा विचार नसून भलताच विचार आहे त्या ठरावीक चित्रात हे ऐकून फक्त चित्र म्हणून त्या गूढपणातच काहीतरी शोधत राहते.
कित्येक चित्रात चेहरे असतात. ते वास्तववादी असले तरी त्वचेवरचा तरळ गुळगुळीत पोत न घेता एक हाडामासाचे शरीर म्हणून ट्रीटमेंट केलेली असते जणू नस आणि नस .. रक्ताचा थेंब आणि थेंब त्या आकारातून डोकिवताहेत.
एवढे करूनही चित्रातील सहजता कायम असते.
मला वाटले म्हणून मी असे केले हे घोषवाक्य कुठेही नसते. अगदी चरित्रातील पॉझिटीव .. निगेटीव स्पेसचे एकमेकांचे मापदंड ठामपणे सांभाळलेले दिसते.
काही वर्षांपुर्वी निलेशच्या एकल चित्र प्रदर्शनाला गेले होते. ती सगळी चित्र .. त्यातील स्त्रीयांचे चेहरे, सर्व एका पद्धति ची चित्र तरी रचना आणि चेहर्या ची ठेवणं वेगवेगळी. त्याने मॉडेलचे चेहरे रचनांमध्ये रूपांतर केले होते. म्हणून प्रत्येक चेहरा वेगळा जाणवत होता आणि तितकेच चित्रही बोलके होते.
नुकतेच एक चित्र नजरेस पडले. खरी मोनालिसा मला आवडत नाही पण ही बुरखाधारी मोनालिसा मात्र आवडली. हे काश्मीरला तयार केलेले आर्ट कॅम्पमधील चित्र आहे. यात वेळखाऊ बारीक काम केले नसले तरी कन्सेप्ट भन्नाट आहे. काश्मीरमध्ये कित्तेक वर्षांपासून जो काही सामाजिक संघर्ष झाला आहे त्याची झुळूक आपल्याला नाही. आपण फक्त ऐकतो पण ते खर्या अर्थाने समजून घेणे शक्य नाही. तेथील स्त्रीयांचा संघर्ष विविध पातळीवरचा आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
काशमीर येथील या आर्ट कॅम्प वेळेस शाळा व कॉलेज येथे मुलींच्या चित्रकलेच्या कार्यशाळा घेतल्या
व त्यावेळेस कित्येक मुलींची भावनिक व सामाजिक स्तरावरील खुंटलेली प्रगती व वर्षोनवर्षे होणारी मनाची घालमेल व संघर्षांविषयीही समजून घेण्यात आले असे निलेश सांगतो.
ही मोनालिसा देखील अशाच एका स्त्रीचे प्रतीक आहे. अगदी तरल असे चित्र. कुठेही वेडेवाकडे आकार किंवा रेशा भडक भपकेपणा नसलेले असे खूप महत्वाचा मुद्दा मांडणारे हे चित्र आहे. अशा आर्ट कॅम्प निमीत्ताने कलाकाराला अनेक सामाजिक संघर्षांचा अभ्यास करणे जरूरिचे असते. मी चित्रकार ... मला वाटेल ते मी रंगवतो .. मला वाटेल तसे त्यावर निबंध लिहीतो ही मानसिकता अनेक समकालीन म्हणवून घेणाऱ्या तरूण चित्रकारांची मानसिकता दिसते. अशा वेळेस निलेश सारख्या कलाकारांचे कौतूक वाटते.
कित्येक वेळा सोप्पे वाटणारे असे चित्र तर साधे दिसते .. सहज सुचलेले आणि भपकेपणाही नसलेले पण त्या मागे खूप अभ्यास .. कलाकाराला आयुष्यात खूप कठीण काळाला सामोरे जावे लागले आहे असे अनेक कलाकारांबाबत स्पष्ट होते.
निलेश वेदेचे बालपणही असेच असावे संघर्षांनी व्यापलेले. रेखा व रंगकला शिकता शिकता उपयोजित कला कडे वळसा घेऊन पुढे टेक्सटाइल मध्ये शिक्षण पुर्ण केले. परिस्थिती , नोकरी, प्रवास , अभ्यास सोबत लहान वयातच समाजाचा बदलता चेहराही नजरेस आला आणि हळू हळू ते चेहरे आणि हावाभाव कॅनव्हास व्यापू लागले. त्याची कापडाची जाण एक एक धागा होऊन कॅनव्हासवर रंगांच्या रेषा द्वारे पसरत जाते हे निश्चित आणि म्हणूनच चित्रासमोर उभे राहिले की त्या चेहर्यातून आपल्या मनात लपलेली गूढ भावना नव्याने उमजू लागते. विषय वजनदार असले तरी चित्राला जडपणा आलेला नसतो हे महत्वाचे.
येत्या ८ ते १४ ऑक्टोबर २०२४ जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे निलेश वेदे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे तेव्हा आपल्याला त्यांची नवी चित्रे पाहता येतील.... जरूर या.
प्रदर्शनाकरिता आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा निलेश.
No comments:
Post a Comment