हो.. खरंतर ट्रिकी आहे ते ..
एकदा फ्लो सुटला की सुटला ..
पाणि किती .. रंग किती .. याचे प्रमाण अचूक ठेवावे लागते.
माघार घेता येत नाही.
नैसर्गीक फील आणायचा असेल तर जलरंगांशिवाय पर्याय नाहीच !
तैलरंगांचेही एक विशिष्ट कॅरेक्टर असतं. तर अक्रेलीक स्वतःला विविध पद्धतीने मांडू शकतो.
क्षणात जलरंगाप्रमाणे पारदर्शक वागू शकतो तर क्षणात तैलरंगाप्रमाणे जाड थरांमध्ये स्वतःला लपेटू शकतो.
मी बाई खूप वेगळा .. मी बाई खूप अवघड आहे हं .. असे हे रंग एकमेकावर वरचढ करत असतील का कधी...
उगाच आपण काहीतरी भलतंच भन्नाट असल्याचा कुणी आव आणायचा कशाला ...
प्रत्येक रंग माध्यमाची एक खास वैशिष्ट्य आहे ते कलाकाराने जाणणे आवश्यक आहे.
पाऊस जवळ आला की हमखास कॉलेजचे सुरूवातिचे दिवस आठवतात. नवे रंग .. नवे पोत .. नवं नवं अगदी ..
फाऊंडेशन वर्ग आठवला की जलरंगातील एक कलींगड आठवतं .. कसेकाय जमले माहीत नाही पण मला त्यासाठी मला खास क्षिस मिळालेले.
आमच्या फाऊंडेशन बॅचचा वर्ग तर छानच होता. माझे ऍडमिशन उशीराने झालेले. जुलै जवळजवळ संपलेला. इंडीयन आर्ट इन्स्टीट्यूट मध्ये वीसेक दिवस नियमीत जात होते .. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथे नंबर लागला होता.
ऑगस्ट मधली कानेरी गुंफा येथील मॉन्सून पीकनीक नुकतीच पार पडलेली. त्यामुळे वर्गातील खूप सारे मित्र मैत्रिणी झालेले.
हे जे शब्द आहेत नै ..
वॉटरकलर खूप औघड आहे .. हे पहिल्याच दिवशी कोणीतरी कानात पुटपुटतं ... आणि हृदयात धडकी भरते. असे काहीही नसावे ..
कारण मी ज्याच्या कडून वॉटरकलरची माझ्या पुर्वी मर्यादीत अशी टेकनीक शिकले ते अगदी एक मिनीटातच ..
पाच सप्टेंबर .. शिक्षणक दीन होता. वर्गात अनेक मुलंमुली शिक्षक झालेले. नवीनच ओळखी ..
त्या दिवशी कोणीतरी वॉटरकलर शिकवणार होते. टोमॅटो आणायला सांगितलेला.
बापरे .. किती अवघड चकचकीत पोत ! म्हणत मी त्याकडेच बघत बसलेले. आज वर्गात धमाल असणार होती .. आजूबाजूला एक दिवसीय शिक्षक फिरत होते.
मी अगदीच घाबरत कार्टरीज पेपरवर रंग खेळायला सुरूवात केली होती. एका कोणीतरी माझ्या हातातून ब्रश घेतला .
अरे .. क्या देख रही है ... ये तो सबसे इझी है . रूक तेरेको टेकनीक बताता हुं म्हणत अगदी दहा सेकंदामध्ये लाल केशरी पिवळा एकत्रीत फ्लो सोडला.
अगदी बारिकसा हाइलाइटही सोडला त्यात.
अब रूक ... इसको अचछी तरह सुखने दें... हात नै लगानेका.
दहा मिनीटांनी त्यावरच दोन चार छोटेमोठे ठिपके ठेवले.. की झाले पाणीदार टोमॅटो तयार ..
वर्ष सरत आले तसे वार्षिक चित्र प्रदर्शनावेळेस निसर्सगचित्रणासाठी सरांनी कलिंगड मागवलेले. अगदी तेच शब्नद आठवून कलींगडाचे रंगकाम केले. त्यात तीनचार बिया तर अफलातून झालेल्या.
शेजारचा एक मित्र पुटपुटला ... बास बास .. आता फक्त खालचा हिरवा एक सहज पातळ लेयर दे .. रिफ्रॅक्श दिसू देत .. आणि थांबव.
अगदी अर्ध्या तासात पुर्ण झाले.
पारदर्शक कलिंगडाचा गुलाबी आणि बियांचे खडबडीत पोत असे एकंदर छान जमलेले.
कधी पाच पाच वर्ष न जमणारी तर कधी पाच मिनीटात आकार घेणारी सोबत रसिकांची पाठीवरची थाप ..कलाकाराला अजून काय हवे !
चाळीस पैकी दहा बारा निवडलेल्या फोडींचा , चित्रांचा .. कलिंगड स्पेशल डिस्प्ले ठरला. माझे काम नंतर निवडले गेले होते. बाजुच्या डिस्प्ले मध्ये लावलेले.
ते ही चुकून कोणीतरी उलटे चिकटवले ...
अबे मार खानेका है क्या .. भावना मारेगी .. असे कोणीतरी कोणालातरी किंचाळल्याचे लांबून ऐकायला आले .. तेव्हा पुन्हा सरळ करून लावले गेले.
माझ्या बद्दलचा हा नेहमीचा दरारा होता .. पोरं घाबरत नसली तरी उगाचच घाबरत असल्याचे दाखवत.
आता कसले माझे काम बघणार कोणी... बक्षिस तर लांबची बात !
एकतर दुसर्या डिस्प्ले सोबत लावलय .. आता कागदही चुरगळला .. म्हणत मी ही निराश झालेले.
पण काय तो चमत्कार .. बक्षिस मीच पटकावले.
मस्तच
ReplyDelete