Monday, November 7, 2022

गुलाबी ...

स्त्री तुझे रूप अनेक प्रमाणे स्त्री तुझे मूड अनेक म्हणायला हरकत नाही. 
दसरा .. दिवाळी ..ईद .. नाताळ ह्या सणांतील स्त्रीयांच्या मूड ची  कहाणीच निराळी. गेल्या महिन्याभरातील दोन महतवाचे अनुभव सांगते. मजेशीर आहे पण नैसर्गिक आहे हे. अगदी मी देखील कित्येकदा ह्या सणांमुळे मुडस्वींग मध्ये गुंफली जाते. मग आम्हा चित्रकारांच्या भाषेत सांगायचे तर प्रायमरी रंग .. प्राथमीक रंग श्रेणी आठवते. 
 ईद जवळ आली अन् मला माझ्याच एका जुन्या चित्रासारखे दुसर्या एका चित्राची ऑर्डर आली. क्लायंट साधारण साठीची असावी.  साधारण रचना सारखी. थोडे बदल हवे होते. ह्या नव्या चित्रात क्लायंटला गुलाबी अधीक हवा होता. माझी इच्छा नव्हती तो गुलाबी वाढवण्याची पण नाईलाजास्तव एक पारदर्शक  गुलाबी सर्वत्र पसरवला. डोंगरभर पसरलेला हलका गुलाबी. ईद झाली अन् क्लायंटचा मेसेज आला की नको तो गुलाबी चांगला नाही दिसत. मी समजावले होते तेव्हा समजली नाही. आता सण संपला तशी ती  रोजच्या जगण्यात परतली होती. चित्र छान माझ्या मनासारखे पुर्ण झाले. 

आता नुकतंच दिवाळी आली तशी एक ऑर्डर आली. क्लायंट साधारण पस्तीस .. चाळीशीची असावी. तिचे घर रंगवण्याचे काम सुरू होणार होते. माझे एक अपुर्ण  चित्र आवडले अन् ते पुर्ण करेपरियंत थांबायला तयार झाली.त्यात फ्रेश गुलाबी छटा वाढवून  देण्याची मला विनंती केली. मी तिला सांगितले होते की अधीक गुलाबी चांगला दिसणार नाही पण ती ऐकेना. 

दिवाळी सुरू असताना तिला तो वाढीव गुलाबी आवडला पण सण संपला आणि आता तोच गुलाबी आवडेनासा झाला. ते सर्व गुलाबी कमी .. जवळ जवळ नाहीसे करावे लागले. काय म्हणावे स्त्रीयांच्या मूड स्वींगला .. पण हे नैसर्गीक आहे. आपण सण म्हणून सर्वत्र जी काही सजावट करतो ते रंग नंतर नकोसे वाटतात नै. कपड्यांचे ही तेच आहे. हल्ली लग्नसराईत व सणानिमीत्त विकत घेतलेले चमचमणारे कित्येक कपडे, पोशाख निव्वळ जागा अडवून वर्षांनोवर्षे कपाटात पडून राहतात. आणि लाल गुलाबी ची जागाही मनात .. घरात खास ठरलेली असते ... 
          ........ Bhavna.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0fXvPxH5HKNVvf9Q7a7sxhFfVgcpTtWF3HEUH38gyQf2hM6bHvmPQZdcJMFZ1vzjzl&id=1654252434&sfnsn=wiwspwa

Thursday, November 3, 2022

टिकली बीकली ...

सध्या टिकली .. बिंदी विषय किती गाजतो आहे .. 
कोणीतरी कोणातरी स्त्री रिपोर्टरने कपाळावर टिकली नाही लावली म्हणून मुलाखत द्यायला नाकारले म्हणे .. 
असो .. सध्या ह्या बदलत्या जगात टिकली लावायची का नाही आणि लावायची  हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे मला वाटते. टिकली हिंदू धर्माचे प्रतिक म्हणून मी अधूनमधून आवर्जून लावते. मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. पण इतर धर्माचे पोषाख आणि त्यांचे कधी साधे तर कधी निव्वळ नक्षीदार सजणेही पहायला  खूप आवडतात मला. कपाळावर कुंकू काही स्त्रीयांना किती सुंदर दिसतं काय सांगू ..

माझी आई मी लहान असताना म्हणायची की मला कुंकू खूप शोभून दिसते. लहानपणापासून टिकली घरात लावलेली सवय नसल्यामुळे हा  क्रेझ आजही टिकून आहे. कपाळावर आपल्या भुवयांच्या मध्यभागी ओंकार कल्पना करायला शिकले आणि हे कुंकू प्रकरण अधीक आवडू लागले. पण त्या सोबत टिकली ह्या एका रबरी पोताला लावलेल्या कसल्यातरी खळाविषयी प्रश्न पडत असे. कित्येक वेळा तो खळ, चिकटवण्याचा पदार्थ इतका बळकट असतो की टिकली दोन तीन दिवस सहज रित्या जागा न बदलता कपाळाला चिटून राहते. अशा टिकली चे म्हणणे तरी काय ?  

मला हे चिकटलेले आणि ते निघून चिकटपणाचे डागाळलेले कपाळ नाही आवडत म्हणून सकाळी एकदा कुंकू लावायची सवयही लावली. हल्लीचे कुंकू फुलटू रासायनीक असल्याने कपाळावर तो लाल डाग चार चार दिवस तसाच राही. एक दिवशी घरातील सगळ्या कुंकूवाच्या डब्या रिकाम्या केल्या.   मग देवळात जाऊन नैसर्गिक रित्या बनवलेले कुंकू आणून वापरायला सुरूवात केली. ते डबीतील कुंकू महिन्याभरात लाल ऐवजी मरून रंगाचे होत असे. तो ही रंग छानच दिसतो... हे माझ्या विचारातील बदल घडले ते साधारण 2007 नंतर .. त्यापुर्वी ट्रेनमधील खडे असलेली दोन दोन रूपयांच्या पाकीटांपासून आणि क्वालिटी प्रमाणे चककाकणार्या वाढीव किमतीच्या अशा ते लग्नानंतर कोणीतरी सुचवले म्हणून टिकलीच्या साइजप्रमाणे वीस रूपये महागडे फेमस शिल्पा बिंदीही वापरली. ती बिंदी पातळ वेलवेटी पोत असलेले कपाळाच्या त्वचेला त्रास न देऊनही तीन दिवस टिकणारी बिंदी म्हणून नावाजली जात असे. किती मजेशीर आहे नै .. हे बिंदी पुराण ! 

स्त्री असण्याची जाण व नवरा असतीत्वात असण्याचा पुरावा .. म्हणून कुंकू/ टिकली की कपाळ ... नशीब .... हुषारी ... दैवत्व .. ह्याचे प्रतिक म्हणून कुंकू /टिकली. काहीही असो .. 
पण मी घराबाहेर जाताना नियमीत कपाळावर काहीतरी लालसर गोल टिक्का लावू लागले ते  2007 मध्ये मला पॅरीसमध्ये भेटलेल्या एका स्वीडन येथील म्हातारी बाई मुळे.

पॅरीस येथील सिटी इंटरनॅशनल दे आर्ट ह्या रेसिडेन्सीची इमारत एक डी आकारातील चौकोणच जणू .. साधारण दीडशे खोल्या असलेली ही इमारत जगातील कलाकारासाठी खुली असते. भारत वगळता इतर काही देशांतील कित्येक श्रीमंत कला रसिकांनी येथे गुंतवणूक करून त्या त्या देशातील विविध क्षेत्रातील कलावंतांसाठी तीन महिने ते वर्षभर फुकट रहाण्याची सोयही येथे होत असे. मला फ्रांस एमबसी द्वारे ही जागा अनुभवायला मिळाली. इकोल दे बोजा येथील ग्रौथालयही एक महिनाभर हाताळायला मिळाला. 

पॅरीसला येवून एक आठवडा झाला होता. एकटीच रहाणार असल्याने 'जैसा देस वैसा भेस ' अवलंबला म्हणजे आपणही त्याच शहरातील वाटू. कॅजूअल डेनीम व ग्रे .. बेज रंगातील रोजच्या वापरातील कपडे. त्यावर टिकली लावत नसे.  अनोळखी शहरात उगाच हा घाटीपणा कशाला हवा ! पण त्यामुळे मी धीकच पाववाली टाईप्स दिसत असे. 

त्या संध्याकाळी रेसीडंसीतील बेसमेंटमध्ये गायनाचा कॉनसर्ट होता. काही वेगळं म्हणून मी लालभडक कुर्ता घातलेला. म्हणून त्यावर शोभेसा कपाळावर टिक्काही लावला. स्टेजवर दोन जापानी नाजूक सुंदर मुली निळसर फिरोझा ऑरगॅन्झा लांब फ्रॉक मध्ये पियानोची सोबत घेऊन गात होत्या. खूप सुंदर वातावरण तयार झाले होते. जवळजवळ सर्वच हॉल भरला होता. काही वेळात एक जोडपं त्या अंधारात बसायला वाट शोधू लागलं. मी माझा पाय सावरून घेतला पण ती म्हातारी नेमकी धडपडली. सावरत मला सॉरी म्हणाली. मी मनातल्या मनात ' असूदेत गं ... मला लहानगीला कशाला सॉरी बोलतेस ' विचार करत होते तोवर तिचे लक्ष माझ्या चेहर्याकडे गेले अन् " ओह .. आय स्ट्ॅम्प्ड युवर फीट .. यू आर इंडीयन .. सो सॉरी " बोलत पायाच पडायला आली. मी कसेबसे तिचे हात धरले. 
दोन दिवसांनी ती रस्त्यात भेटली. आता माझे कपाळ पाहून मला ओळखले ..
" ओह .. यू इंडीयन गर्ल .. सो सॉरी .. आय स्ट्ॅम्पड मूल्य फीट " 
मी पुन्हा तिला गप केले. 
मुळात मला तेथे जी काही भारतीय आणि अभारतीय माणसे सोबत असे .. बर्याचदा आपण किती कमी आहोत ते बोलून दाखवत असत. पण ही बया वेगळी होती. ती साधारण साठीची पाणीदार डोळे, चेहर्यावर खूप सुरकुत्या असलेली  सुंदर बाई. अधूनमधून आम्ही लांबूनच एकमेकांना रस्त्यात हात करत असू. 

माझे एकल चित्र प्रदर्शन त्याच इमारतीत लागले तेव्हा तर माझी चित्र पाहून ती चित्रांच्या प्रेमात पडली. तेव्हा तिला कळले की मी चित्रकार आहे अन् पुन्हा जणू मला तिची लाथ लागल्याचे दु:ख व्यक्त केले. 

ती माझे चित्र पहायला त्या गॅलरीत रोज येत असे. तिने माझ्या टेबलावरच्या डायरीत तिचे नाव मार्गारेट लिहीले अन् तेव्हा नावासकट तिचे डोळेही माझ्या मनात कोरले गेले. मार्गारेट स्वीडनची व तिने पुर्वी भारतात काही वर्ष योगासन व ध्यानसाधना , रेकी वगैरेंचा अभ्यास केल्याचे समजले.  येथे आपली .. आपल्या देशाची महानता  बाहेरची व्यक्ती आपल्या एका छोट्याशा गोष्टीतून जाणीव करून देते. त्यानंतर मी  खोलीबाहेर .. घराबाहेर पडताना सहसा कपाळावर  टिक्का लावत असे .. भारतीय स्त्री कलाकार म्हणून जगभर मिरवताना ही छोटीशी गोष्ट पण आपले व्यक्तिमत्व घडवणारी .. कशी विसरून चालेल !
 कधी रंगाचा .. कधी कुंकूवाचा .. कधी फिकटशा गंधाचा एक छोटासा टिक्का मग पुरेसा असतो... 
              ........ Bhavna Sonawane.November3. 2022.

Friday, October 14, 2022

सोन्याचे पांघरूण ...

पाऊस संपून वातावरण अगदी लख्ख दिसत असतं आणि  दसरा झाला की दिवाळीचे वेध लागतात .. 
तेव्हा हे असे सकाळचे ऊन डोकावू पाहते ... 
ह्या उन्हात नक्की काय दडलेले असते माहित नाही .. 
पण अगदी पुर्वीपासून मनाची हीच अवस्था असते .. 
ह्या सावली सारखी .. 
त्यात बालपणीचे दिवाळीच्या दिवसातले सकाळ ..संध्याकाळ .. 
अगदी फराळ आणि फटाक्यांनी भरलेल्या आठवणी सामावलेल्या असतात ... 
दर वर्षी हा विचार येतो पण चाळीस वर्ष लोटली हे ठामपणे कळायला की हे ऊन वेगळे आहे .. 
पुर्वी ह्या दिवसात परिक्षा असायच्या तरी हे ऊन मात्र आपल्या जवळ ओढत असे. 
परिक्षेचे दिवस सरले अन् कामाला सुरूवात झाली तशी ऊन आणि वेध काही बदलले नाही ... 
ह्या दिवसात नेमकी कामांची धावपळ असते अन् हे ऊन मात्र ठामपणे आपल्याला खूणावत असतं .. 
बास कर गं ..
कामे आयुष्यभर करायची आहेत ..
आकाशाने पांघरलेल्या ह्या सोन्यात चारआठ दिवस न्हाऊन नीघ जरा ..  
आणि मग घर सोडवत नाही .. 
जो .. जिथे असेल तेथे हा सोन्याचा उजेड पसरलेला असतो ... 
सोनेच जणू ... 
                  .......Bhavna 2022. October. 15.

Tuesday, August 16, 2022

चित्ररूप..

चित्ररूप ..

आकार तू
रंग तू
रेशा तू आणि बिंदू ही तूच !
हे सर्व जुळते अन् एक भावना घडते खरी ...

जगण्यात मागे सोडलेली साठवण 
सतत सोबत घेऊन चालत  .. 
त्या  बेरंगी पोतावर
 मी जुळवा जुळव करत असते खरी ...

ते एकत्रीत घडत जाणारं सुंदर
एक रूप समोर चितारत असतं .. 
तेव्हा पुर्वी अधूरी मी ..
माझ्यात काहीतरी हरवलेलं असतं ... 

तेव्हा मीपण अधुरं रहावं .. वर्षानुवर्षे 
आणि आता हे चित्ररूप पुर्ण व्हावं 
एक जगणंज कोणी अधुरं ठेवाव 
आणि निघून जावं
जणू नकळत ... 

तुझीच साठवण होऊन 
जन्मभर मला साथ द्यावं ...

                ...... Bhavna. August.2022

Sunday, August 7, 2022

जन्म आणि भोग ...

' जन्म आणि भोग ' ...
जन्म आहे तर त्यासोबत सुखदु:ख आलेच. कधी प्रवास सोपा तर कधी खडतर. 
भागवत गितेत जगण्याविषयी अशी काही उदाहरणं आहेत जी जगणं सुलभ करते. प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधीक प्रमाणात चढउतार असतात ते गीतेत म्हट्ल्या प्रमाणे ते त्यांच्या पुर्व कार्यांमुळेच. तसेच प्रत्येक पापाची परतफेड, काही देवाण घेवाणी त्याच जन्मात फेडायचे असते व उरले सुरले पुढच्या जन्मी भोगायला येते. गीतेवर श्रद्धा नसली तरी नुकसान काही नाही. कारण मग माणूस निश्चीत पुण्याई कडे वळू लागतो. आपल्या सोबत काही वाईट झाले तर मी काहीतरी पाप केले असावे म्हणून मला दुःख भोगावं लागतंय आणि हे प्रायश्चीत असून भोग लवकरच संपतील हे भोगणे सोपे करून जातात. पण तो भोगतोय .. भोगूदेत असं म्हणून एखाद्याचा अधीक छळ करणे हे क्रूरच. 

एखादी गोष्ट आपली म्हणून स्वीकारणं आणि दुसर्याची श्रीमंतीवर जळफळाट होणं .. हे देखील चूक. कारण तो त्याचे नशीब घेऊन आला आहे हे विसरू नये. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्या प्रमाणे एखादा सुखी इतर काही बाबतीत दु:की असतो पण ते आपल्याला दिसत नसते.

 फेसबूकवर आनंदीआनंद भीरभीरणारी माणसं त्यांच्या वैयक्तीक जगण्यात सुखी असतातच असे नाही. मग नकळतच त्यांच्या त्या जगण्यावर जळून आपण त्यांचे भोग आपल्याकडे ओढावून घेतो. तो त्याच्या नशीबाने सुखी आहे हे बोलून विचार सोडता आले पाहीजे. शाळेत खूप अभ्यास करतो तो पहिला येतो तसेच आहे जगण्याचे ही. आपल्या कडे सात जन्म ही संकल्पना खूप सुंदर पद्धतीने मांडलेली दिसते. मग अरे आपले आयुष्य संपले .. आता काही उरले नाही असे म्हणत जगणेच नाही. 

अगदी लहानपणी अभिनेत्री वहायचे स्वप्न पहायची. ते पुर्ण होणे शक्यच नव्हते. नंतर नृत्य शिकायचा प्रयत्न केला. सतत कोणी न कोणी .. काही न काही आडवे आले. शेवटचा आवडीचा एकच पर्याय, चित्रकला क्षेत्र निवडले. 

मी ह्या जन्मी भरभरून चित्र काढणार ... हे पुर्वीच ठरवले. कामाची गरज कायम होती त्यामुळे खंड पडला नाही. खूप काम करते. चित्रांशी निगडीत काहीतरी नवे प्रयोग करते. आतावेळच उरत नाही आणि डोक्यातील कॉम्पोझीनश काही संपत नाही. बास झाले ! आता पुढच्या जन्मी अभिनेत्री .. नृत्यांगना होईन आणि नव्याने जग गाजवेन ह्या विचाराने मन मागे वळत नाही. स्वप्न पहायला काय हरकत आहे.  हो आणि तेव्हा चित्र रचना आठवत नसली तरी हा जड झालेला मेंदू .. हे आठवत नसले तरी साठवणीतले असणार हे नक्की. पुण्याचं ते. 

एखादी व्यक्ती आपल्याला ओढ लावून जाते ते ही ठरलेलं. एखादी दुरूनही नकोशी होते. सतत प्रयत्न करूनही एखाद्याशी जोडलेले तार कित्येक वर्ष तुटत नाहीत. खूप धडपड करूनही कधी कधी दोन जीव एकमेकांसाठी झुरत राहतात.

मागचं काही राहीलय .. ती पुर्वी बांधलेली गाठ .. गुंतागुंत सुटत नाही तोवर ती साथ सोबत राहते. मग मैत्री का असेना. ते नातं काही ठराविक काळापरियंत टिकते. मग अगदी पाण्यात साखर विरगळावी तसे नाते आपापल्या जगण्यात विरघळून जाते. प्रत्येक मैत्रीत असे होते. सोबतचे कर्म ..तोवर आपली सोबत. जगण्याचे .. नात्यांचेही हेच आहे. 

एखादी व्यक्ती आपल्याला खूप सुख देते .. अगदी नाते नसूनही. तर एखादी घरचीच व्यक्ती सतत रडवते. एखाद्यावर जीव ओवाळासा वाटतो पण ती साथ टिकत नाही. म्हणतात ना .. खरं प्रेम सर्वांच्या नशीबात नसते ते खरंय ...तरी जे आपलं ते ओळखता आले पाहीजे. 

सतत नवननव्या भेटीगाठी होत असतात आणि कधीतरी अगदी जुनी ओळख असल्या सारखे अचंबीत करतात. त्यातील  आपली माणसं ओळखता आले पाहीजे. 

मध्यंतरी क्रीस्टल थेरपीचा सविस्तर अभ्यास करताना एंजलोथेरपीची तोंडओळख झाली. श्रद्धा, विश्वास, सकारात्मक विचार , ध्यानधारणा ह्यावर केला जाणारा हा अभ्यास सर्वांच्या अवतीभवती एंजल वावरत असतात ह्या विचारांवर विश्वास ठेवायला भाग पाडतात. सहावा इंद्रिय म्हणजे सिक्स सेंस जागृती हे वेगळ्या शब्दात ऐंजलच. एक मदतीचा हात मागितला की बरेच हात पुढे येतात हे देखील सतकर्मांवर आधारलेले असते. 
समाजाचे काही देणे असते. ते करत राहीले की जगण्यातील गुंता मोकळा होण्याच्या वाटेकडे निघतो. ह्याचा अर्थ कमवा व समाजासाठी गमवा असे मुळीच नाही. 

आम्ही कलाकार ... चित्रकार चित्र विक्रीसाठी आयुष्यभर धडपडतो. आम्हाला इतर नोकरदारांप्रमाणे महिन्यांचा पगार व आयुष्याला आधार पेंशन कधीच मिळत नाही. मग समाजाचे देणे म्हणून कित्येक कलाकार चॅरिटी शो मध्ये चित्र विक्रीची अर्धी रक्कम डोनेट करतात. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील कित्येक कलाकिरांनी छोट्या चित्रांची मोठी प्रदर्शने भरवून पुरग्रस्थांना लाखोंची मदतही केली. 

 माणूस मेला .. तो सुटतो .. मोकळा होतो. आपण रडतो .. आंदळाआपट करतो ... दु:ख व्यक्त करतो  ते त्याला जाताना दिसते म्हणतात. तो जीव अगदी बॅग भरून प्रवासाला निघावे असा तयारीत असतो आणि वळून न पहावे ह्या विचारात नव्याने सुरूवात करतो. किती सुंदर आहे नं ' मरण '. मग का घाबरावे ? का नाही सर्व भोग संपवून मरणाला कवटाळून निघून जावे....

आत्महत्या हा जीवन संपवण्याचा कधीच पर्याय नाही.कारण जीव जाण्याची वेळ नसताना स्वत:च्या शरिराला इजा करून श्वास थांबवणं म्हणजे आत्महत्या. तो तेथेच गेलेल्या ठिकाणी त्याची ठरलेली वेळ येइपरियंत घुटमळत राहतो. प्रत्येक दु:खाचे संघर्षाचे काही शेवट असतात आणि सकारात्मक जगण्याने ते मार्गही सोपे होत जातात. 

गीतेत एक भाग ' पुनर्जन्म ' Rebirth वर आधारलेला आहे. खूप सुंदर उदाहरण देऊन त्यात जन्म जन्माची व कर्माची बेरीज वजाबाकी मांडली आहे.

गिते मध्ये दिल्या प्रमाणे थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक प्राण्याला पुढचा जन्म निवडायची मुभा प्राप्त होते. एखादी गरीब व्यक्ती सतत कष्ट करून व इतरांकडून दुर्लक्षित असं संपूर्ण आयुष्य जगली असेल आणि मरताना इच्छा असेल की पुढचा जन्म अगदी ऐशोआरामात एखाद्या राजाप्रमाणे जगायला मिळावे.... 
तेथे देवही तथास्तू म्हणतो. पण त्याच्या पुर्व कर्माच्या आधारावर तो नवा जन्म मिळतो. कर्मच खास नसतील तर उदा.  राजघराण्यातील मांजरीचा जन्मही मिळू शकतो. जेथे काही काम न करता आयुष्यभर अगदी ऐशोआरामात लोळत पडून तो जीवन व्यतीत करतो. 
आहे की नै मजेशीर ... जे इतरांना दिलय तेच वेगळ्या रूपात फिरून आपल्या कडे येतं.  
 भागवत गीता मनुष्याला सकारात्मक जगण्याकडे वळवते हे नक्की. 

          ....... Bhavna Sonawane.8.August. 2022

........

Sunday, April 24, 2022

एक स्त्रीकलाकार ....


ही पोस्ट कला क्षेत्रातील अनेक स्त्रीयांना समर्पित आहे. 

कित्येक वर्षे काम करतेय ... कित्येक वर्ष सातत्याने काम करतेय. घरच्यांची साथ लागते .. ती वेळोवेळी मिळत राहीली. 
जगण्यातील एका वर्तुळाच्या टोकाला सगळं शुन्य ... त्या शुन्यातून सुरूवात केली. 
गिरक्या घेत आजवर येथे पोहोचले.... अजून अर्ध वर्तुळ शील्लक आहे. कलेमुळे माझ्या जगण्याला जीवंतपणा आहे. 

बारावी सायन्स पुरते मांबाबांसाठी शिकले. 
त्यानंतर चित्रकला पदवी स्व:च्या जिद्दीने आणि मेरीट मिळवले. डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन ही मेरीट मध्येच. महाराष्ट्रात चौथी तर मुलींमध्ये पहिलीच होते. ते चार पाच वर्ष शिक्षकांची शाबासकी भरभरून मिळाली. शिक्षकांनी मित्र मैत्रिणींनी जगणं संभाळून घेतल ...व लग्नानंतर अनिशने. 

शिक्षण होता होता लग्न ही केले. मेरीट मिळवता माझा मोठा लेक अथर्व जन्माला आला. अगदी मोजून मापून श्वास व अन्न शरीरात बसावं तसं जगणं सरत गेलं. बाळ झोपले की छोटे छोटे चित्र पुर्ण केले. पॉल क्ली म्हणाला होता नै ... " छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करायच्या ... मग जमा झाले की काहीतरी भव्य तयार होतं ... " 
हे शेवट परियंत लक्षात राहील. असे छोटे छोटे .. पन्नासेक चित्र बनवली.
अथर्व दोन वर्षांचा असताना आर्ट प्लाझाला शो केला आणि तेरा हजार रूपयांची चित्र विक्री झाली.

शिक्षण घेता घेता खूप कला दालनं एकटीने फिरायची. आठवड्यातून पाच दिवस लायब्ररीत आवडीच्या कलाकारांची पुसतकं चाळायची. नंतर कला शिक्षीका म्हणून करंदीकर कला अकादमी येथे रूजू झाले आणि खूप आनंद वाटू लागला. डिझाईन सोबत थियरी शिकवायलाही आवडायचे. पण तेथील काही गाऊंढळ विचारसरणीचे शिक्षक डोक्यात गेले अन् 2006 साली पुन्हा कधी शिक्षकी पुर्ण वेळ पेशेत यायचे नाही असा निर्णय घेऊन चित्रांमध्ये रमले. 

त्या दरम्यान दोन एकल शो झालेले आणि चित्र विक्रीही सुरू झाली. 
एकत्र कुटूंब एकत्र ठेवून स्टुडीओ वेगळा थाटता आला. चित्रांची मागणी वाढली. 

तेव्हा माझी नॅशनल .. स्टेट ... आर्ट सोसायट्यांना चित्र पाठवली की रीजेक्ट होत असत. रिजेक्ट झालं की डोळ्या समोर मुकूंद गावडे सर .. प्रतिभा वाघ मॅडम ...  शिरीश मिटबावकर सर ... भिसे सर ... जगताप सर यांचे कोतूकाच्या नजरेने पाहणारे चेहरे समोर दिसत असत.  अगदी गोंधळ होत असे. काय खरं ... काय खोटं ... तेव्हा समजेनासे होई. त्यामुळे चित्र पाठवायचे थांबले. इतकंच काय .. जहांगीर आर्ट गॅलरी ने आजवर दोन वेळा माझा अर्ज रिजेक्ट केला. मी मुंबईची असून आजवर एकही सोलो किंवा ग्रूप शो जहांगीर कला दालनात झाला नाही. रिजेक्शनची इतकी सवय झाली की पुढे गरजच वाटली नाही. 

 पाच वर्ष फक्त चित्र करत कंटाळा येवू लागला. बदलापूरहून ट्रेनने प्रवास करून सगळे शो पहायला जमायचे नाही. 

काही काळ युरोप मध्ये राहण्याची संधी मिळाली अन् माझ्या विचारांना नेमकी दिशा मिळाली. त्या काळात नवीदिल्ली व तामिळनाडूत अनेक शो हौऊ लागले. आर्थिक स्थैर्य लाभलं. स्व:ताचा स्टुडीओ व घरही झाले. प्रायवेट गॅलरी तर्फे युरोप मध्ये तीन महिने वास्तव्य व काही ठराविक कलाकारांसोबत कला अभ्यासानिमीत्त टूर. खूप कौतूक झाले.  हे देखील स्वप्नमय होते. जेथे जाईन तेथे लिंबूटिंबू होते. त्यामुळे भरभरून कौतूक होत असे आणि नवीन ओळखीच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह. भारताच्या बाहेर राहून बाहेर भारतीयांबद्दलचे प्रेम .. आदर जाणवला व तसेच काही खालच्या विचारसरणीचे भारतीय पुरूष बाहेर जाऊन किती किळसवाणं वागतात ... उगाचच एकट्या स्त्रीला बिचारी समजतात ... ते ही दिसले. 
तेव्हा कलाकारांना भेटायचा कंटाळा येऊ लागला. भारतात परतल्यावर माझीच बददलेली विचारसरणी ... मी स्वत:चा अभ्यास करू लागले. मग माझ्या शैली विषयी चांगल्यावाईट गोष्टी स्वीकारत राहीले. हृया काळात कलाकार मित्रमैत्रिणी नव्हे पण गॅलरी क्युरेटर कडून खूप काही शिकले. 

हळू हळू माती हाताळायला शिकले .... मेटल काम शिकू... सराव करू लागले. फर्नेस घेतल्या. जेव्हा माझ्या सोबतीचे कलाकार कला क्षेत्रात मैत्री वाढवत होते तेव्हा मी काहीतरी नवीन घडवण्याच्या प्रयत्नात धडपडत होते. फेसबूकवर माझ्या वॉलवर आनंदीआनंद दरवळत होता. माझ्या बद्दलची  कुजबूज अशी होती की ... भावनाला सगळे रेडीमेड मिळाले आहे. असो ... 
आम्ही येथे पसारा वाढवत होतो.  आता एवढा पसारा वाढला की पसार्यात जगणे आलेच की. जेथे जशी होते ... त्यात सुख होते ... आहे .. आणि राहणार. आणि कला निर्मिती सारखे दुसरे सुख नाही. 

बरं ... हे पसारे करता .. आवरता ... एकदा ते कलाकारांमध्ये वावरणंच विसरले. नॅशनल .. स्टेट .. आर्ट सोसायट्याला चित्र पाठवायला विसरले.... पंधरा वर्षं अशीच सरली. आता गेल्या बावीस वर्षांत नवं नवं करत पुन्हा जुन्या कडे जावं वाटतं ...पण माझीच ती शैली मागे राहीलय असं जाणवतं तरी काम करायची प्रेरणा देत राहतं .... 

आता लक्षात येते की आता तो कलाकारांमधील वावर .. त्यांची हांजी करणं टाळले अन् मला इतर कलाकार ओळखेना ... 
मला पुरस्कार नाहीत .. कारण पुरस्कार गोळा करायची गरज वाटली नाही. 
पण अवतीभवती पाहता लक्षात येतंय की कलाकारांना जग ओळखतय ते पुरसकारांवरून. 
खरंच ... भेटीगाठी आणि त्यातून जन्मलेले किंवा विकत घेतलेले पुरस्कार एवढे महत्वाचे आहेत का ??? 
शुन्यातून अनेक स्त्रीया जग निर्माण करत असतात ... आदराने त्यांच्या बाजूने उभे राहीले की काही लोक इतरांच्या कानात कुजबूजतात ... खरंच किती किळसवाणं आहे हे सर्व.... 
मला कित्येक वेळा बायोडेटा वाचा आणि मग बोला हे समोरच्या माणसाला सांगावे लागते. हे मजेशीर वाटले तरी आता वेळ आली की ठणकावून सांगायला शिकले आहे.
 स्त्री-पुरूष समान दर्जा वगैरे सब झूठ है. कित्येक भलतेच पुरूष आजही स्त्रीयांच्या कपड्यांवर  .. त्यांच्या ब्युटी पार्लर खर्चावर चारचौघात चर्चा करताना दिसतात. शेवटी त्यांचे सलून ते आमचे ब्युटी पार्लर .... काय फरक आहे ! अरे सुंदर आणि वयाने लहान दिसणं .. नटणं .. आमचा अधीकार आहे. मग त्या सुंदरतेवर शंका का घ्यावी ... 
सोपं नसतं ... असं आपलं जग शुन्यातून उभं करणं ..... 
 ........ Bhavna Sonawane. 25. April.2022

Wednesday, March 30, 2022

गुंफण ...

कधी कधी उभ्या आडव्या रेषा उमटत उमटत खूप किचकट जाळी तयार होते ..
त्यापुढे एकमेकांत गुंफलेले आकार रंगासाठी मोकळे होणे अशक्य होते ...
तरी एक एक आकार गाठीतून सुटा होऊन लागतो आणि एकत्रीत .. तरी स्वतंत्र श्वास घेऊ लागतो .. 
पण हे घडणं कधी कधी इतकं किचकट होतं की चित्र पुर्ण होता होता नकोसे होते. 
जणु आपणच गुदमरतोय त्यात .
मग चिडून ते चित्र नजरेच्या पल्याड राहते ...
चार सहा महिन्याने पुन्हा त्यावर हात फिरवायला सुरूवात होते ...
तरी मन भरेना .. आणि शांतता लाभेना. 
पुन्हा दोन महिने ते नजरे आड जात ... 
कधीतरी आठवले की नव्याने रंगांची भर पडते ...
असे घडत घडत एकदाचे तिथेच थांबते ...
पण लांब गेल्यावर त्या चात्राची खरी मजा कळते .. आणि आपल्यालाच मोहात पाडते. 
असे काहीसे आपल्या जिवनाचेही होत असते नै !! 
              .... 30 March 2021. Bhavna

https://m.facebook.com/photo.php?fbid=10207319836468204&id=1654252434&set=a.1359836610005