Tuesday, May 26, 2026

दगडधोंडे

देवानं सोबतीला असे दगडधोंडे दिले की बास.. 
आणखी काहीच नको. 
यातूनच एक जगणं निर्माण व्हावं ... 

वेड असतंय हे .. 
उगाच नाही लोक ऐतिहासिक दगडांच्या भींतींवर स्वतःचे नाव कोरण्यात वेळ घालवत .. 

माणूस लिहू लागला ते चुकलं खरं 
माणूस स्वतःचे नाव लिहायला शिकला ते चुकलं खरं  
आता कामाने नावाने जग एकमेकांना ओळखतात ! 

शिकला नसता तर कदाचित प्रत्येक इतिहास चित्ररूपात नव्याने कोरला गेला असता
एकएक दगडावर .. 
तेव्हा प्रत्येक धोंड्याने एकत्रीत नवा इतिहास रचला असता. 
माणूस शिकला नसता तर .. 

असो .. 
जगताना दगडधोंड्यांची सोबत महत्वाची. 
ते जगण्याला स्वप्न देतात 
नव्याने ! 
        ..... Bhavna. 

उधार एक मॅजीक है .. मै आपको दुंगा आप गायब हो जाओगे !

उधार एक मॅजीक है .. 
मै आपको दुंगा आप गायब हो जाओगे !  
खारघर मधील एका नामांकित युनिवर्सिटीच्या भरगच्च कॅन्टीन मधील हा फोटो आहे. येथे चहा पंधरा आणि कॉफी वीस रूपयाला मिळते. आम्ही उधार देत नाही असे सांगणारे अनेक पाट्या ह्या खिडकीत दिसल्या आणि मला पै आठवला. 

पै .. बस एवढंच नाव माहित आहे . पै मुळचा कानडी किंवा मंगलोरी असावा आणि मी जेथे चित्रकलेचे सात वर्ष धडे गिरवले ते एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट, बांद्रा येथील कॅन्टीनचा मालक.

 पंचवीस वर्षांपुर्वीचा काळ. तेथे अशी पाटी कधीही पाहिली नाही. बाहेर तीन रूपयाचा असला तरी येथे एक रूपयाचा चहा मिळायचा. पंधरा रूपये राइल प्लेट. वडापाव, समोसा, ब्रेड बोंडा, ऑमलेट पाव इ ठराविक मेनू असायचा. बान्द्रा स्टेशन वरून कॉलेजला चालत जायला दहा ते बारा मिनीटं लागायची. हातान रंगाचे सामान आणि बर्याचदा पोर्टफोलियो असायचा. मग कॉलेज कॅन्टीन गाठायचं आणि सुसकारा टाकायचा. पै ने इतरांपासून लपवून कोपर्यात माझ्यासाठी एक लिंबू सरबताचा ग्लास ठेवलेला असायचा. कॉलेजचे सकाळचे वर्ग सुटून दुपारचे वर्ग भरायची वेळ झाली की कॅनटीन गजबजायचे. म्हणायचा .. तुमची पोरं ह्या कॉलेजला शिकायला येतील तेव्हा पण येथे मीच असेन. ते ही खरं वाटायचं .. कारण पै होता म्हणून अनेकांचे उपासमार टळले. कॉलेज जितकं मोठं तेवढीच कॅन्टीन मध्ये मुलांची रेलचेल असते आणि असायला हवी. तेथे स्वस्ताई हवी. प्रत्येक मुलाला परवडेल असे खाणे हवे. तसं पै च कॅन्टीन. 

आमचे शिक्षकही असे होते की अधूनमधून वर्गाला चहा पाजायचे. कधी वडापावची ट्रीट ही द्यायचे. एखादा विद्यार्थी उपाशी असेल तर कॅन्टीन मधून खायला मागवणार्या शिक्षिका पाहील्या ते कला महाविद्यालयातच. मग त्यांनाही आमच्या ट्रीट परवडायला हव्यात की .. 

एक आठवण..  
मी नुकताच तैलरेगांच्या मोठ्या ट्यूबचा स्टॉक विकत घेतला होता. तैलरंग तसे महाग असतात. एक दिवशी ती भरलेली पिशवी बाकावर विसरून घरी गेले. एरवी बाकातील लॉकर मध्ये ठेवायचे. दुसर्या दिवशी वर्गात आल्यावर आठवले. खूप शोधाशोध केली तरी सापडेना. शिरीश मिटबावकर सर वर्गात आले. नवे रंग ? किती खर्च केलास? सर .. साडेचार हजार गेले ..आता परत कुठून घेऊ?  
मिटबावकर सरांना ती पिशवी संध्याकाळीच सापडली होती आणि ती जपून कपाटात ठेवली होती. एका अटीवर रंग परत मिळतील म्हणाले .. संपुर्ण वर्गाला आज तू फुकट चहा पागायचास... म्हणजे तू परत कधी रंग असे हरवणार नाहीस. सकाळीच शंभराची नोट बाबांकडून हातात आली होती त्यामुळे पुर्ण वर्ग म्हणजे तीस रूपयात माझे काम होणार म्हणून मी पण खूष ! खरंच त्या दिवशी जाणवले की पै चे कॅनटीन खूप परवडायचे. 

संध्याकाळी उशीराच शबनमच्या झोळीत किलोभर नाणी आणि नोटा घेऊन अगदी साध्या पहरावातला पै विरार लोकलने घरी परतायचा. 
सकाळी पुन्हा वाळेत हजर रहायचा. कॅनटीनमध्ये दोनतीन मुले देखील कामाला असायची. अनेकांनी पै कडून उधारीवर वडापाव आणि राइसप्लेट खालले आहेत. पै आठवण करून द्यायचा. अनेकांनी उधारी दिली पण काहिंनी कॉलेज संपले तरी उधारी द्यायची विसरून गेले. मित्र एकत्र जमले की कोणी म्हणायचे माझी शंभर ची उधारी द्यायची बाकी .. तर कोणाची तीनशे बाकी होती. 
पुढे ते कॉलेज बंद झाले तेव्हा पै ने काही वर्षे विरार ला ज्यूस सेंटर चालवले. 

आजचा काळ वेगळा आहे. महागाइ वाढली आहे म्हणून कॉलेज कॅन्टीनच्या खिडक्यांवर अशा पाट्या शोभत नसल्या तरी नाइलाजास्तव लावली जात असावीत. पण पै असता तर पाटीविणा सगळं निभवून नेलं असतं !! 
         ..... Bhavna Sonawane. 2026.

Tuesday, September 30, 2025

सुर्य

अरे सुर्या ... 
आज खिडकीतून कितीही डोकावत राहिलास तरी 
तू थांबशील यावर विश्वास ठेवणं आता कठीण झालय ... 
चढाओढ इन्द्राशी करतोस तू 
आणि भोग लागतात मात्र जमीनीला ... 
आकाश एकमेकांचे डाव पाहत उभा राही
वायूही साथ तुमच्या खेळात करी
 प्राणी नी मनुष्य तुम्हीच निर्मिले तरी
 विनाशाची एवढी घाई का करी 
         ...... Bhavna.1/10/2025.

Thursday, April 17, 2025

सोलापूर, काळा मसाला आणि आठवणींची साठवण .

खूप वर्षांनी अक्कलकोट व तुळजापुरला जाण्याचा योग आला. स्वामी समर्थ मंदीर, मठ , खंडोबा मंदीर व तुळजा भवानी मंदीर,  एका दिवसात दर्शन छान झाले.  

त्या आधी सोलापूरलाही थांबता आले. एरवी कामाच्या व्यापात काहीतरी काम काढूनच इतर शहरातील नातेवाईकांकडे जाण्याची संधी मिळते. सोलापुरात सिद्धेश्वर मंदीर, हुतात्मा बाग, नवी पेठ, गड्डा, हातमागाच्या सोलापुरी चादरी, साड्या म्हणजे प्रेमच ! 


सोलापूर म्हटले की पहिले आठवतं तो सोलापूरचा काळा मसाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काळा मसाला मिळतो. अगदी उत्त्म लागतो. आग्री मसाला, कोल्हापुरी काळा मसाला, कांदा लसूण काळा मसाला व काळा मसाला जैन पद्धतिचा , बिना कांदा लसणाचा असे अनेक प्रकारचे मसाले आपल्याकडे बाजारात उपलब्ध आहेत.  पण सोलापुरी मसाला भल्ताच भन्नाट. हो खाण्याची सवय नसलेल्यांनी मात्र जपूनच वापरावा हं.  जगातील अनेक व्यसनांप्रमाणे प्रमाणे हा सोलापुरी काळा मसाला देखील एक सवय नसून व्यसनच आहे असे मी नेहमी म्हणते कारण ज्यांना रोजच्या जेवणात चिमूटभर का होईना हा मसाल्यात बनवलेली भाजी  खायची सवय असते त्यांनाच ती चव माहीत व त्याशिवाय जेवणही जात नसत. 

माझे लग्न झाले आणि अनिश सोबत बदलापूरला रहायला आले तेव्हा दोन चार दिवस जेवण बरे लागले पण पुढचा महिनाभर तरी जेवण नीट जाईना. मला वाटले तोंडाची चव गेली असावी. अधीक लक्ष द्यायला वेळ नव्हता कारण कला महाविद्यालयाचे वार्षिक सबमीशन सुरू होते. बदलापूर-बांद्रा रोजचा ट्रेन प्रवास व घरी परतल्यावर इतर कामांमधूनच वेळ काढून थिसीस ची तयारी यात पहाट होत असे. सुट्टी लागली आणि  एक दिवस कळाले की मंजू मावशीच्या घरी जवळूनच शेअर रिक्षा जाते. 

 दुपारी फिरत फिरत मावशीकडे गेले असता मावशीने जेवायला बसवले. म्हणाली, माझे जेवण बाकी आहे तू पण जेव. टोमॅटोची आमटी केली आहे, सुकी मेथी बनवते. चपात्या व भात तयार आहे. 

टोमॅटोची आमटी हे सोलापूरकरांचे ठरलेले गृहीत हं. म्हणजे एक सोलापूरकर दुसर्या सोलापूरकराला टोमॅटोच्या आमटीवर एखादे अमिशही दाखवू शकतो. काही नाही ओ... आपण फोडणीचे वरण बनवतो की नै .. तसंच. तुरीची डाळीची उत्तम लागते. पर्याय नसेल तरच वेगळी डाळ वापरावी. डाळ कमी घ्यावी. कुकरमधून शिट्ट्या काढून ठेवावी पण ढवळू नये. काही जण त्यात खोबरं वगैरे घालतात .. तसेही करू नये... आमटीची चव जाते.  चमचाभरच तेलात अगदी जिरे, मोहरी, हळद, हिंग, कडिपत्ता लाल तिखट, भरपूर बारीक चिरलेला लसून आणि चार पाच बारीक चिरून असे सढळ हाताने टोमॅटो घालावे. झाकण लावून मस्त शिजवावे. त्या टोमॅटोचा रंग त्या तिखटाने गडद होतो अन् अगदी सुंदर चकाकी येते. मऊ झाले की त्यात शिजवलेली डाळ घालावी. हलकी ढवळावी पण डाळ घोटून नये.शेवटी चवीपुरते मीठ व असेल तर कोथिंबीर घालावी. झालीच आमटी तयार. ह्या टोमॅटोच्या आमटीला वरण बोलून आमटीचा अपमान मात्र करू नये. 

तर मी आणि मावशी जेवायला बसलो. हळूच शेंगदाण्याची खलबत्त्यात कुटलेली चटणी समोर आली. बरेच महिने झाले, सोलापूरचा मसाला खाललाच नाही. आहे का थोडा ? 
हो .. आहे की. मी बनवलाय आणि तुझ्या मोठ्या मामींनी देखील सोलापूरहून पाठवलाय बघ .. सांगत मावशीनी एक छोटाशी काचेची बरणी पुढे सरकवली. 

आहाहा .. एका प्रिय वाद्याची  तार छेडावी अन् ती धून मेंदूत पोहोचून मेंदूचे जे घडावे तसे काहीसे झाले. अगदी व्यसनच आहे की हे ! चांगले की वाईट हे प्रत्येकानं आपापलं ठरवावे हं ... 

माझा जन्म सोलापूरचा. मी जन्मानंतर तीन वर्ष सोलापूरातच होते.
ह्या सोलापूरच्या अनेक आठवणी आहेत. जुनाच वाडा,  दोन मोठ्या खोल्या व स्वयंपाकाची खोली व मोठे छत असलेले कळ्या पाषाणातील घर आणि घरासमोर एक पिठाची गिरणी. त्यातच मधुमामांनी आणलेल्या पहिल्या नव्या खडूपेटीने मी  सुरूवातिचे रंगांचे धडे गिरवले.

..  शकुंतला ... किती सुंदर नाव आहे नं हे .. ती सकू आजी.
राजेश खन्नाच्या बावरची चित्रपटातील ज्या भादूरी सारखी कामसू नलू मावशीचे लग्न अजून ठरायचे होते. मधूमामाही तसे लहानच होते. कॉलेजमध्ये शिकत असावेत. त्यानंतर काही काळातच त्यांनी इलेक्ट्रिकलचे दुकान टाकले. त्या दुकानाला रश्मी नाव दिले. रश्मी हे माझे आधी ठरलेले नाव. नंतर आजोबांचे भगवंत या नावावरून बाबांनी भावना ठेवायला लावले. 
तरी कित्येक वर्ष माझ्या लिखाणातील माझे पात्र रश्मीच सांभाळते. 

माझ्या आजोळातील भावंडांपैकी सर्वांत मोठी नाजूक गोरीपान पर्करपोळ्यातली प्रभादीदी आजही आठवते. पतीताई, राजू दादा, मंगेश दादा इ. सगळे शाळेत जात असत. सर्वात  मोठे केशव मामा व मामी यांना मी इतरांचे अनुकरण करत आजी दादा म्हणू लागले. यांच्या मागे मागे दिवसभर बागडत असे. मां- बाबा तेव्हा नोकरी निमीत्त मुंबईत राहत. अधूनमधून भेट होत असे.  

नितीन दादा तेव्हा पुण्यात होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची भावंडाची अख्खी गॅंग धरून पंचवीसतीस जण एकत्र भेटत असू. त्यांच्याही अनेक आठवणी आहेत. नितीन दादाही तेव्हा येत आणि गच्चीवर अनेक जंगलगोष्टी, कुत्री,मांजरी,बेडकं इ. साजेसे बॅकग्राऊंड आवाज व ऍक्टींग करत गोष्टी रचून सांगत असे आणि सकाळी विसरत असे. नितीन दादा आजही कोणाच्या लग्नात भेटला की आवर्जून आमच्या हातावर तो अंडी देणारी कोंबडी, बदक, बेडूक हत्ती,ससे इ. मेहंदीच्या कोनाने रेखाटतो. मेहंदीचे असे आगळेवेगळे संस्कार लहानपणिच झाल्यामुळे आयुष्यात कधीही डिझायनर मेंदीचीसाठी माझ्या मनात जागा झाली नाही. पुढे माझ्या लग्नात मला कोणी नावे ठेवू नये म्हणून पैसे देऊन नक्षीदार मेहेंदी काढून घेतली होती. नहीं तो .. आज वॉज ऑलवेज हॅपी वीथ द डक ऍंड एलिफंट्स ! 
 
खूप वर्षांनी सोलापूरला पतीताई व प्रभादीदी. सोबत दोन दिवस घालवले. नितीन दादाच्या स्टुडीओला व्हिजीट देता आली. आज तो सोलापूरात व बाहेरही शिल्पकलेत उत्तमरित्या कार्यरत आहे. 

अनेक बालपणीच्या या आठवणी एका काचेच्या बरणीत भरलेल्या काळ्या मसाल्याच्या रूपात स्वयंपाक खोलीच्या कोपर्यात नेहमी रेंगाळत आणि अधूनमधून डोकावत  असतात. 

 खूप गप्पा .. खूप व्यक्तिमत्व आणि त्यावर आधारलेल्या आठवणींची साठवणी. आता माणसे थकत चालली तरी आठवणी कायम असतात नै !

Bhavna Sonawane. 2025.