Friday, December 13, 2019

एका मित्राला लिहीलेले पत्र



' गेली वीस वर्ष चित्र थांबली आहेत म्हणून सतत रडणार्या मित्राला लिहीलेले पत्र '

सतत रडत असतोस.

नोकरी ..घर ..बायको ..मुलं ... सर्वच कसं छान आहे तरी चित्र काही जमेनात.

चित्र शिकला आहेस. गोल्ड मेडल मिळवल आहेस ..एक वर्ष मेरीट मिळवलयस ...

पण कित्येक वर्ष चित्र जमत नाहीय .... पुरेसा वेळ नाही हे कारण देतोस ..हे अगदीच खोटय ...
जो वेळ आहे त्या वेळेतही मेंदूसोबत भुसा भरून ठेवला आहेस.

देवावर तुझा विश्वास नाही ..नसूदे ..कदाचीत विश्वास असता तर एकाग्रता समजवायला सोपी झाली असती ....पण असो...

पं जसराज ..किशोरी अमोणकर ..पं. भीमसेन जोशी ...जगजीत सिंग ... शंकर महादेवन ... वगैरे ऐक. सुफी काही ऐक . संपुर्ण स्टुडीओत ते नाद घुमू देत. हो पण हा अनुभव एकट्यानेच घे ...

मी ब्लॕंन्क झाले की ह्यांची  कृष्ण ..मिरा ...विष्णु ...विठ्ठल स्तोत्र ...भजन ..स्तुती ऐकते.

त्याकरीता स्टुडीओत चांगला स्पीकर असतो ... हल्ली मी स्टुडीओत आहे हे शेजारच्यांना त्या भजनांवरून समजतं ..
एक पंचहात्तरीला आलेली म्हातारीही दाराबाहेरच्या जीन्यात मी दार उघडायची वाट पाहत दुपार संध्याकाळ घुटमळताना दिसते.
मी अजून आत बोलावले नाही तिला कधी .. मला भिती आहे .. तीही माझ्याप्रमाणे कधी स्वप्नमय व्हायची ....

तर.. सतत ऐकत रहा ...तासन्तास ..जे आवडेल ते ..
समोर पेपर ..कलर ... कॕनव्हास .. फक्त मांडून ठेव...पाहत रहा ... तेथेच लोळत पड ..

काम करायला घेऊ नकोस पण त्या पांढर्या शुभ्र चौकोनी आकारावर एक ..अनेक स्वप्न पहा ... तेथेच झोप थोडावेळ ..एक छान डुलकी घे ...
पुनः तो आकार न्याहळत बस ..तासन्तास ..

तरी काम करू नकोस.

असे काही दिवस कर ...हळूहळू  इतर विचार बाहेर पडतील ...
हळूहळू अनावश्यक स्वप्नही चाळणीतून मोकळी होतील  आणि तुला तुझी खरी स्वप्न ..विचार सतत तेथे दिसत राहतील. ती काही काळ सोबत देतील अशी असतील.

आता ती स्वप्न सोबत ठेव . ती तेवढीच पुरेसे आहे ..एक अख्खी सिरीज घडवण्याकरीता... कदाचीत पंचवार्शीक काय ते ..असतं नै ...त्याप्रमाणेही टिकतील ...
किंवा कदाचीत आयुष्यभर पुरेल ...असंही काही असेल त्यात.

माझी स्वप्न मात्र साधीच असतात ... तरी माझ्या चंचल मनाप्रमाणे सिझनल असतात हं ... मग तो कॕनव्हास सिझन प्रमाणे बदलला तरी पुढच्या सिझनला वळून नव्यासोबत जुनाही पुर्णत्व अनुभवतो ...

जेथे जेव्हा ऊन असतं तिथे ऊन्हाळा हवा ...पावसात जणू ओलंचिंब व्हावं ..नाचत रहावं एखाद्या मोराप्रमाणे.. थंडीत गारगार वातावरणात एखादं लाल भडक परकर पोळकं नेसून लहानगं होऊन धावत सुटावं त्या धुक्यात डोंगरावर ...

लक्षात असू देत ..ही माझी स्वप्न आहेत ..तू तुझी पहा ..उगाच स्वतःची स्वप्न समजून उचलगिरी करू नकोस हं ..

हे आकार असतात स्वप्नात ...अंतरमनात ..

पण तुझ्या कॕनव्हासवर उतरताना ते आकार बांधून ठेऊ नकोस.

 मात्र  ते रंग उतरतील ..ते भाव उतरतील ...तो कानाला सतत ऐकू येणारा एकच नाद असेल कदाचीत ...तेथे आकार नसूनही संपुर्ण चित्र कोणालातरी खोलवर त्याच्याच आंतरमनात घेऊन जाइल ...कदाचीत.

हे सतत करत रहा ..
तासन्तास ..दिवसेन्दीवस ..वर्षोन्वर्षे .. मग थांबणे शक्य होणार नाही मधली वीस वर्षे जणू जगायची राहिली होती तीही एकत्रीत जगशील .... आयुष्य नक्की वाढेल.

आणि हे असे सोपे काही जमणार नसेल तर फक्त नोकरी सांभाळ ... आयुष्यभर झीज ... चित्रांचा विचार सोड.

         ......©Bhavna Sonawane.dec. 2019.

Tuesday, December 10, 2019

सराव आणि वर्ष

आधी साधा कार्ट्रीज कागद ..आधी कटरने टोक केलेली  पेनसील ..त्यानंतर कागदांचे विविध पोताप्रमाणे प्रकार ..सराव ...
कला अनुसरून वेगवेगळ्या विषयांचा भडिमार ...
सोबतीला विविध रंग व रंगलेपन माध्यमं ... 
आणि हे सतत रोजचे साधारण पाचसात तास ...
कसंतरी सरणारं पहिलं वर्ष ...

तरी पुढेही पेन्सील घासूनघासून केलेला सराव ..
वर सराव कमी पडत असल्यामुळे शिक्षकांची बोलणी ..
 तीनएक वर्ष हीच विद्यार्थी दशा ...

नंतर कधीतरी कॕनव्हास .... कॕनव्हास म्हणजे थोडसं प्रोफेशनलीझम पाळण्याइतपत आपली लायकी होत चालल्याचे समाधान.
तेव्हा अधूनमधून शिक्षकानी थोपटलेली पाठ ..

तरी ..आपण अजून चित्रकार नाही हं ...
एकदाचे शिक्षण संपले.
आणि आजही कुठेतरी कलेचा विद्यार्थी म्हणून कलेची अर्धवट जाणवत राहणारी उपासना ...
आता सराव आहेच पण भितीनेही ती पेनसील पुनः हाती घ्यायला भाग पाडतो मी ..

आजही मी अपुर्ण ..
ते अपुर्णत्व नव निर्मिती करायला भाग पाडत.

आणि अशा वेळेस
 कोणीतरी युट्यूब विद्यारथी भारीच शॉर्टकट मारून आपल्याला जेव्हा कलेचे लेसन देतो ...
तेव्हा समोरच्याचे म्हण्णे नुसते ऐकत रहावे ..

मज्जा येते नै !!
                     ...... Bhavna Sonawane.

Monday, November 11, 2019

ती कापलेली फांदी

त्या स्वच्छंदी झाडाला समजावलं
त्याची फांदी कापली
अन्
झाडानेही आकसून घेतलं स्वत:ला ..

हो ..इतरांनाही जगू द्या म्हणत...
तेथील विस्तार काही काळ थांबवत
स्वत:ची वाढ न खुंटता ..

माणूस मात्र मी मी म्हणत ...
विस्तारत चाल्लाय ..
प्रगतीच्या नावावर !
              bhavna.november.2019.

Saturday, October 5, 2019

आरे ..Aarey

सांग देवा कसंकाय विसरायचं ...

जगण्यातील बरेच आनंदी ...

आरेतील सावलींनी व्यापलेले हे क्षण....
कोपर्यातील एक उरलीसुरली आठवण ..

त्या डांबरी रसत्यांवरील वीसपंचवीस चा स्पीड ..
सुरूवातिची विजय सुपर ...
तर् नंतरची पद्मिनी फियाट ...
बस हेच काय ते अंधूक अंधूक ...

आणि त्या पसरलेल्या  सावलीमय रसत्यावर
कधी सांडलेली शुभ्र कामिनी
तर् कधी पिवळा केशरी गुल्मोहर !
                           .....bhavna.2019.5sept.

Wednesday, September 18, 2019

Thursday, August 8, 2019

जीवन

नखा एवढा जीव माझा ...
त्याच्या गरजा त्या किती !
जीवन आहे तोवर मौज ...
मरणोत्तर माती !!!
      ....bhavna. 2013.

Saturday, July 6, 2019

पाऊस आणि गोकर्ण


उन्हाळ्यात खूप खूप बिया आल्या 
काही काढल्या
काही मातीत स्वतः पडून रुजू झाल्या
तरी वेलीवर काही उरल्याच

पाऊस सुरू झाला
तशी कुजायला सुरूवात झाली
पण बियांची देखील जीद्द न्यारी

 मिळेलपाणी जोवर
 तशाच अवस्थेत तोवर
नव्याने झुलत रहायचे म्हणताहेत

एवढे धीट ...
एक एक सुटं कर ..
नी रूजायला जागा कर
आता मलाच खुणावताहेत !
          ...... bhavna.