Thursday, April 17, 2025

सोलापूर, काळा मसाला आणि आठवणींची साठवण .

खूप वर्षांनी अक्कलकोट व तुळजापुरला जाण्याचा योग आला. स्वामी समर्थ मंदीर, मठ , खंडोबा मंदीर व तुळजा भवानी मंदीर,  एका दिवसात दर्शन छान झाले.  

त्या आधी सोलापूरलाही थांबता आले. एरवी कामाच्या व्यापात काहीतरी काम काढूनच इतर शहरातील नातेवाईकांकडे जाण्याची संधी मिळते. सोलापुरात सिद्धेश्वर मंदीर, हुतात्मा बाग, नवी पेठ, गड्डा, हातमागाच्या सोलापुरी चादरी, साड्या म्हणजे प्रेमच ! 


सोलापूर म्हटले की पहिले आठवतं तो सोलापूरचा काळा मसाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काळा मसाला मिळतो. अगदी उत्त्म लागतो. आग्री मसाला, कोल्हापुरी काळा मसाला, कांदा लसूण काळा मसाला व काळा मसाला जैन पद्धतिचा , बिना कांदा लसणाचा असे अनेक प्रकारचे मसाले आपल्याकडे बाजारात उपलब्ध आहेत.  पण सोलापुरी मसाला भल्ताच भन्नाट. हो खाण्याची सवय नसलेल्यांनी मात्र जपूनच वापरावा हं.  जगातील अनेक व्यसनांप्रमाणे प्रमाणे हा सोलापुरी काळा मसाला देखील एक सवय नसून व्यसनच आहे असे मी नेहमी म्हणते कारण ज्यांना रोजच्या जेवणात चिमूटभर का होईना हा मसाल्यात बनवलेली भाजी  खायची सवय असते त्यांनाच ती चव माहीत व त्याशिवाय जेवणही जात नसत. 

माझे लग्न झाले आणि अनिश सोबत बदलापूरला रहायला आले तेव्हा दोन चार दिवस जेवण बरे लागले पण पुढचा महिनाभर तरी जेवण नीट जाईना. मला वाटले तोंडाची चव गेली असावी. अधीक लक्ष द्यायला वेळ नव्हता कारण कला महाविद्यालयाचे वार्षिक सबमीशन सुरू होते. बदलापूर-बांद्रा रोजचा ट्रेन प्रवास व घरी परतल्यावर इतर कामांमधूनच वेळ काढून थिसीस ची तयारी यात पहाट होत असे. सुट्टी लागली आणि  एक दिवस कळाले की मंजू मावशीच्या घरी जवळूनच शेअर रिक्षा जाते. 

 दुपारी फिरत फिरत मावशीकडे गेले असता मावशीने जेवायला बसवले. म्हणाली, माझे जेवण बाकी आहे तू पण जेव. टोमॅटोची आमटी केली आहे, सुकी मेथी बनवते. चपात्या व भात तयार आहे. 

टोमॅटोची आमटी हे सोलापूरकरांचे ठरलेले गृहीत हं. म्हणजे एक सोलापूरकर दुसर्या सोलापूरकराला टोमॅटोच्या आमटीवर एखादे अमिशही दाखवू शकतो. काही नाही ओ... आपण फोडणीचे वरण बनवतो की नै .. तसंच. तुरीची डाळीची उत्तम लागते. पर्याय नसेल तरच वेगळी डाळ वापरावी. डाळ कमी घ्यावी. कुकरमधून शिट्ट्या काढून ठेवावी पण ढवळू नये. काही जण त्यात खोबरं वगैरे घालतात .. तसेही करू नये... आमटीची चव जाते.  चमचाभरच तेलात अगदी जिरे, मोहरी, हळद, हिंग, कडिपत्ता लाल तिखट, भरपूर बारीक चिरलेला लसून आणि चार पाच बारीक चिरून असे सढळ हाताने टोमॅटो घालावे. झाकण लावून मस्त शिजवावे. त्या टोमॅटोचा रंग त्या तिखटाने गडद होतो अन् अगदी सुंदर चकाकी येते. मऊ झाले की त्यात शिजवलेली डाळ घालावी. हलकी ढवळावी पण डाळ घोटून नये.शेवटी चवीपुरते मीठ व असेल तर कोथिंबीर घालावी. झालीच आमटी तयार. ह्या टोमॅटोच्या आमटीला वरण बोलून आमटीचा अपमान मात्र करू नये. 

तर मी आणि मावशी जेवायला बसलो. हळूच शेंगदाण्याची खलबत्त्यात कुटलेली चटणी समोर आली. बरेच महिने झाले, सोलापूरचा मसाला खाललाच नाही. आहे का थोडा ? 
हो .. आहे की. मी बनवलाय आणि तुझ्या मोठ्या मामींनी देखील सोलापूरहून पाठवलाय बघ .. सांगत मावशीनी एक छोटाशी काचेची बरणी पुढे सरकवली. 

आहाहा .. एका प्रिय वाद्याची  तार छेडावी अन् ती धून मेंदूत पोहोचून मेंदूचे जे घडावे तसे काहीसे झाले. अगदी व्यसनच आहे की हे ! चांगले की वाईट हे प्रत्येकानं आपापलं ठरवावे हं ... 

माझा जन्म सोलापूरचा. मी जन्मानंतर तीन वर्ष सोलापूरातच होते.
ह्या सोलापूरच्या अनेक आठवणी आहेत. जुनाच वाडा,  दोन मोठ्या खोल्या व स्वयंपाकाची खोली व मोठे छत असलेले कळ्या पाषाणातील घर आणि घरासमोर एक पिठाची गिरणी. त्यातच मधुमामांनी आणलेल्या पहिल्या नव्या खडूपेटीने मी  सुरूवातिचे रंगांचे धडे गिरवले.

..  शकुंतला ... किती सुंदर नाव आहे नं हे .. ती सकू आजी.
राजेश खन्नाच्या बावरची चित्रपटातील ज्या भादूरी सारखी कामसू नलू मावशीचे लग्न अजून ठरायचे होते. मधूमामाही तसे लहानच होते. कॉलेजमध्ये शिकत असावेत. त्यानंतर काही काळातच त्यांनी इलेक्ट्रिकलचे दुकान टाकले. त्या दुकानाला रश्मी नाव दिले. रश्मी हे माझे आधी ठरलेले नाव. नंतर आजोबांचे भगवंत या नावावरून बाबांनी भावना ठेवायला लावले. 
तरी कित्येक वर्ष माझ्या लिखाणातील माझे पात्र रश्मीच सांभाळते. 

माझ्या आजोळातील भावंडांपैकी सर्वांत मोठी नाजूक गोरीपान पर्करपोळ्यातली प्रभादीदी आजही आठवते. पतीताई, राजू दादा, मंगेश दादा इ. सगळे शाळेत जात असत. सर्वात  मोठे केशव मामा व मामी यांना मी इतरांचे अनुकरण करत आजी दादा म्हणू लागले. यांच्या मागे मागे दिवसभर बागडत असे. मां- बाबा तेव्हा नोकरी निमीत्त मुंबईत राहत. अधूनमधून भेट होत असे.  

नितीन दादा तेव्हा पुण्यात होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची भावंडाची अख्खी गॅंग धरून पंचवीसतीस जण एकत्र भेटत असू. त्यांच्याही अनेक आठवणी आहेत. नितीन दादाही तेव्हा येत आणि गच्चीवर अनेक जंगलगोष्टी, कुत्री,मांजरी,बेडकं इ. साजेसे बॅकग्राऊंड आवाज व ऍक्टींग करत गोष्टी रचून सांगत असे आणि सकाळी विसरत असे. नितीन दादा आजही कोणाच्या लग्नात भेटला की आवर्जून आमच्या हातावर तो अंडी देणारी कोंबडी, बदक, बेडूक हत्ती,ससे इ. मेहंदीच्या कोनाने रेखाटतो. मेहंदीचे असे आगळेवेगळे संस्कार लहानपणिच झाल्यामुळे आयुष्यात कधीही डिझायनर मेंदीचीसाठी माझ्या मनात जागा झाली नाही. पुढे माझ्या लग्नात मला कोणी नावे ठेवू नये म्हणून पैसे देऊन नक्षीदार मेहेंदी काढून घेतली होती. नहीं तो .. आज वॉज ऑलवेज हॅपी वीथ द डक ऍंड एलिफंट्स ! 
 
खूप वर्षांनी सोलापूरला पतीताई व प्रभादीदी. सोबत दोन दिवस घालवले. नितीन दादाच्या स्टुडीओला व्हिजीट देता आली. आज तो सोलापूरात व बाहेरही शिल्पकलेत उत्तमरित्या कार्यरत आहे. 

अनेक बालपणीच्या या आठवणी एका काचेच्या बरणीत भरलेल्या काळ्या मसाल्याच्या रूपात स्वयंपाक खोलीच्या कोपर्यात नेहमी रेंगाळत आणि अधूनमधून डोकावत  असतात. 

 खूप गप्पा .. खूप व्यक्तिमत्व आणि त्यावर आधारलेल्या आठवणींची साठवणी. आता माणसे थकत चालली तरी आठवणी कायम असतात नै !

Bhavna Sonawane. 2025. 

Saturday, December 21, 2024

बुद्धीबळ2015 एकदाचं विकलं गेलं हं ...



तू चित्रे विकतेस का ? त्यातून तुझे भागते का ? हे काहिंना पडत असणारे  प्रश्न . 
 चित्रात शिकण्यासारखे काय असते .. ? समकालीन कलाकार म्हणजे नक्की काय ? चित्रशिल्पकार स्वतःची शैली का जोपासतात? इतरांची शैली कितीही आवडली तरी ती उचलत का नाही ? त्यात काय वावगं ... 
कलाकृतीची एवढी मोठी किंमत कशीकाय मोजावी लागते ? 
अरे बापरे ... चित्र विकत घ्यायची गोष्ट थोडीच आहे ... 
बरंय ... तुझं काम सोपं आहे ... 
 चित्रकार असली तरी खूप मिजास दाखवते ... 
असे नानाविध शंका लोकाच्या मनामध्ये घोळत असतात ..  

पण खरंच ते एखादं एक चित्र कित्येक वर्ष कोणीतरी आपल्यासाठी सांभाळत असतं.सोन्यासारख्या मोलाचं असतं .. त्या ठराविक चित्रामागे  काहीतरी कहाणी असते. 

मी सहसा माझी चित्र विकले गेले की येथे कोणाला कळवत नाही. का सांगायचे ? कारकुनाच्या हातात एक तारखेला पगार मिळाला की तो लगेच फेसबूक इन्ट्स्टा वर पोस्ट तो का ? तसेच आहे ते. 
पण या बुद्धीबळाची गोष्ट थोडी निराळी आहे म्हणून सांगाविशी वाटली. 

2015ला तयार केलेला हा बुद्धीबळ आज नऊ वर्षांनंतर विकला गेला. आजवर निदान चार वेळा तमिळनाडू व दिल्लीला प्रदर्शीत झालेली ही कलाकृती अखेर विकली गेली. 

एका बुद्धीबळ प्रदर्शनासाठी  तीन बाय तीन सागवानी लाकडात ही रचना केली होती. आधी पुस्तके शोधून त्यातील भारतातील आणि भारताबाहेरील विविध बुद्धीबळ खेळाचे प्रकार अभ्यासले .   
सोंगट्याही सागवानी  व मिनाकारी पद्धतीत तयार केलेल्या. राजा राणि.. उंट .. घोडा .. हत्ती .. प्यादा ..सगळेच प्रत्येकी वेगवेगळे होते. प्याद्यांचे सर्व चेहरे वेगळे .. कोणीच कोणासारखे नाही. खूप धमाल आलेली हे रेखाटताना. त्यातून मीनाकारी म्हटले की तांब धातूचा पत्रा .. त्याची सततची सफसफाई आणि थरावर थर व भट्टीचे काम. 750 ते 800 डिग्री सेलशीयस मध्ये एक एक पत्रा चार ते पाच वेळा भाजला गेला. असे एका सोंगटीचे चार बाजू .. म्हणजेच चार पत्रे. दोन बाजूला चेहरा .. तिसरी बाजू मोडीलिपीतील सोंगटी चे नाव व चौथी बाजू ही खास Swagat Thorat  यांच्या कडून मागवलेली ब्रेल लिपीतील टिपकेदार अक्षरांची माहिती. ती ठिपके खास एमबॉस येइल अशी बनवली. पण सोबतच ती कलात्मही वाटत होती. पुर्ण व्हायला एक ते दीड महिना घेतला या कलाकृतीने. 
सोंगट्या जपून ठेवण्यासाठी वेगळी आणि पार्टीशन असलेली सागवानी रंगवलेली पेटीही तयार केलेली व प्रत्येक सोंगटी साठी एक बटुआही शिवून घेतला. ती पेटी ह्या फोटोत नाही. काही कामे करताना फोटोला आपण महत्व देत नाही पण नंतर आठवणीत ते किती महत्वाचे होते हे लक्षात येते. 
स्वागत सरांना ही कलाकृती पहायची खूप इच्छा होती आणि ती तयार झाल्यावर ते कॅमेरा घेऊन आले. अगदी कौतूकाने बाजू नीट टिपत तासभर खूप फोटो काढले. त्यामुळे याचे नीट डॉक्यूमेंटेशनही झाले. मी मात्र एखाद्दोन फोटो काढून फोटोग्राफी गुंडाळली असती. 
यातील काही फोटोंवरून कामाचे स्वरूप लक्षात येइल .. 
या कलाकृती जपाव्या लागतात. त्या आज विकल्या जातील किंवा दहा वर्षांनी .. किंवा पन्नास वर्षांनी. किंवा विकल्याही जाणार नाहीत. सर्व कलाकृती सोन्याच्या भावात विकल्या जात नाहीत. पण आजुबाजुला कोणी कलाकार काम करत असेल तर आपल्याला त्याची कदर करता आली पाहिजे. 

मीनाकारी हा मुळचा पर्शिया येथून आलेला हा दागिना व चित्रप्रकार जवळ जवळ नष्ट होत आहे. तरी खूप कमी कलाकार या खास पद्धतीत काम करतात. मी ही त्यातील एक.  

ही कलाकृती तयार करताना तसेच काम पुर्ण झाल्यावरही खूप वेळखाऊ प्रयोग वाटला पण नऊ वर्षांनी त्या मेहनतिचे फळ मिळाले यात आनंद आहे....

Thursday, September 19, 2024

निलेश वेदे यांची चित्र

खूप दिवसांनी मनात रेंगाळलेल्या एका चित्राच्या चित्रकारावर लिहीते आहे. या चित्रकाराची अनेक चित्रे मी पाहिली आहेत. अगदी सहज वाटणारी निलेशची चित्रे खूप गूढ जाणवतात. तो इतर वेळेस अगदी हसत खेळत इतरांना हसवत नाचत फिरताना पाहिलंय. जगत मित्र .. जगत पुत्र .. जगत भैया अशी मी त्याची चेष्टाही करत असते. निलेशची चित्रे मन अडकवून ठेवतात. त्याच्या प्रत्येक चित्रात काहीतरी बोलके असते. वैचारीक पण तरीही सहज .. जडपणा न जाणवणारी अशी ही चित्र. सुरूवातीला एकदोन चित्रांवर चर्चाही केली. मला जे समजत होते तसा विचार नसून भलताच विचार आहे त्या ठरावीक चित्रात हे ऐकून फक्त चित्र म्हणून त्या गूढपणातच काहीतरी शोधत राहते. 

कित्येक चित्रात चेहरे असतात. ते वास्तववादी असले तरी त्वचेवरचा तरळ गुळगुळीत पोत न घेता एक हाडामासाचे शरीर म्हणून ट्रीटमेंट केलेली असते जणू नस आणि नस .. रक्ताचा थेंब आणि थेंब त्या आकारातून डोकिवताहेत. 
एवढे करूनही चित्रातील सहजता कायम असते. 
 मला वाटले म्हणून मी असे केले हे घोषवाक्य कुठेही नसते.  अगदी चरित्रातील पॉझिटीव .. निगेटीव स्पेसचे एकमेकांचे मापदंड ठामपणे सांभाळलेले दिसते. 

काही वर्षांपुर्वी निलेशच्या एकल चित्र प्रदर्शनाला गेले होते.  ती सगळी चित्र .. त्यातील  स्त्रीयांचे चेहरे, सर्व एका पद्धति ची चित्र तरी रचना आणि चेहर्या ची ठेवणं वेगवेगळी. त्याने मॉडेलचे चेहरे रचनांमध्ये रूपांतर केले होते. म्हणून प्रत्येक चेहरा वेगळा जाणवत होता आणि तितकेच चित्रही बोलके होते. 

नुकतेच एक चित्र नजरेस पडले. खरी मोनालिसा मला आवडत नाही  पण ही बुरखाधारी मोनालिसा मात्र आवडली. हे काश्मीरला तयार केलेले आर्ट कॅम्पमधील चित्र आहे. यात वेळखाऊ बारीक काम केले नसले तरी कन्सेप्ट भन्नाट आहे. काश्मीरमध्ये कित्तेक वर्षांपासून जो काही सामाजिक संघर्ष झाला आहे त्याची झुळूक आपल्याला नाही. आपण फक्त ऐकतो पण ते खर्या अर्थाने समजून घेणे शक्य नाही. तेथील स्त्रीयांचा संघर्ष विविध पातळीवरचा आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. 

काशमीर येथील या आर्ट कॅम्प वेळेस शाळा व कॉलेज येथे मुलींच्या चित्रकलेच्या कार्यशाळा घेतल्या
व त्यावेळेस कित्येक मुलींची भावनिक व सामाजिक स्तरावरील खुंटलेली प्रगती व वर्षोनवर्षे होणारी मनाची घालमेल व संघर्षांविषयीही समजून घेण्यात आले असे निलेश सांगतो. 
ही मोनालिसा देखील अशाच एका स्त्रीचे प्रतीक आहे. अगदी तरल असे चित्र. कुठेही वेडेवाकडे आकार किंवा रेशा भडक भपकेपणा नसलेले असे खूप महत्वाचा मुद्दा मांडणारे हे चित्र आहे. अशा आर्ट कॅम्प निमीत्ताने कलाकाराला अनेक सामाजिक संघर्षांचा अभ्यास करणे जरूरिचे असते. मी चित्रकार ... मला वाटेल ते मी रंगवतो .. मला वाटेल तसे त्यावर निबंध लिहीतो ही मानसिकता अनेक समकालीन म्हणवून घेणाऱ्या तरूण चित्रकारांची मानसिकता दिसते. अशा वेळेस निलेश सारख्या कलाकारांचे कौतूक वाटते. 

कित्येक वेळा सोप्पे वाटणारे असे चित्र तर साधे दिसते .. सहज सुचलेले आणि भपकेपणाही नसलेले पण त्या मागे खूप अभ्यास .. कलाकाराला आयुष्यात खूप कठीण काळाला सामोरे जावे लागले आहे असे अनेक कलाकारांबाबत स्पष्ट होते. 

निलेश वेदेचे बालपणही असेच असावे संघर्षांनी व्यापलेले. रेखा व रंगकला शिकता शिकता उपयोजित कला कडे वळसा घेऊन पुढे टेक्सटाइल मध्ये शिक्षण पुर्ण केले.  परिस्थिती , नोकरी, प्रवास , अभ्यास सोबत लहान वयातच समाजाचा बदलता चेहराही नजरेस आला आणि हळू हळू ते चेहरे आणि हावाभाव कॅनव्हास व्यापू लागले.   त्याची कापडाची जाण एक एक धागा होऊन कॅनव्हासवर रंगांच्या रेषा द्वारे पसरत जाते हे निश्चित आणि म्हणूनच चित्रासमोर उभे राहिले की त्या चेहर्यातून आपल्या मनात लपलेली गूढ भावना नव्याने उमजू लागते. विषय वजनदार असले तरी चित्राला जडपणा आलेला नसतो हे महत्वाचे.

येत्या ८ ते १४ ऑक्टोबर २०२४  जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे  निलेश वेदे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे तेव्हा आपल्याला त्यांची नवी चित्रे पाहता येतील.... जरूर या. 
प्रदर्शनाकरिता आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा निलेश.

Bhavna Sonawane