Thursday, January 28, 2021

एका पडलेल्या दाताची कहाणी 😂


ती : आई माझा फर्स्ट मिल्क दात तुटून बेसीन मधे पडलेला ना ..
हा बघ ... हा वाला आता मी उशीखाली ठेवणार. 
मग मला फेरी गिफ्ट देणार !!

मी : नको .. फेरी ला सांग पैसे दे. 
ती: नाही फेरी गिफ्ट देते आणि पैसे पण देते

मी : काही नाही .. पहिल्या दाताला गिफ्ट देते असेल. 
आता पुढच्या दातांची किंमत कमी होते नै ... 

ती: पैसे चालतील की 
ओके .. जे देइल ते देऊ दे. 

(रात्री झोपताना उशीखाली ठेवलेला दात सकाळी तसाच होता)
ती : ए आई ... फेरी मला विसरली 
मी: थांब जरा .... तिला कामात लक्षात राहिले नसेल. 
उशीरा येणार असेल.  

(दुपारी पंनास पन्नास च्या दोन नोटा उशीखाली सापडतात)

ती: आय ..आई  बघ .. फिफ्टी प्लस फिफ्टी ... हंड्रेड 
मी: अरे व्वा ...

ती: पण गडबड आहे. 
हे पैसे तुझे तर नाहीत? फेरी असे पैसे देत नाही. 
दात पण घेऊन जाते. 

मी: मला ते नाही माहीत ... आमच्या वेळेत फेरी तुटलेला दात कधीच विकत घ्यायची  नाही ... 

ती: अगं पण दात तसाच ठेवला तिने. 
मी: बरं ... ती विसरली असेल. नेइल. 
ती: नाही विसरत नाही. मी मातीत टाकते आता तो दात. 
मी: मग बर्याच पोरांचे दात जमा करून वजनाने दमली असेल. नाजूक असते नै ती...  उद्या नेईल. तू नको टाकू ... पैसे गायब झाले तर... 
ती: ओके .. पण तरी गडबड आहे. ही कामे ती रात्री करते. 
मी: अगं ... आपण कसे पैसे देउन तसेच घरी येतो अन् विसरलेली  भाजीची पिशवी सकाळी  आणतो .. तसं झालं असेल बघ. 
येईल येईल परत ... 
ती : बरं ..वाट बघते. 
मी: माझ्या रूट कॅनलची कॅप निघालीय ...ती सिरॅमिक कॅप घेईल का? 
ती: दे ... तिला खरा दात वाटेल. 
 मी: किती पैसे देइल? 
ती: मला हंड्रेड दिलेत ... तुझा दात मोठा आहे .. टू हंड्रेड देईल. 
मी: नक्की? 
ती: म्हण्जे काय .... देइल ती. 

(सकाळी ) 
ती: आई आई .. बघ माझा उशीखालचा तो दात गायब झाला ... 
फेरी घेऊन गेली दात. 
मी: मला सांग .. इतके दात जमा करून फेरी त्याचे करते काय ?? 
ती : दाताना जोडून तिचे घर बनवते.
मी : 🤔🤔🤔

Tuesday, December 1, 2020

कृष्णमीरा


 तुम्ही कधी पाहिला आहे का असा कृष्ण ...

 नेहमीच कसा सुंदर दिसणारा व  चेहर्यावर प्रेमळ मोहक हावभाव दर्शविणारा पाहीला आहे मी. तो वनात प्राणि पक्षींसोबत वृक्षाखीली एका खडकावर बसून सुमधूर बासुरी वादन वगैरे सगळेच ते ऐकण्यात मग्न कसे मोहून गेलेले असतात नै ... हे सर्व नेहमीचेच आहे पण एकटाच तो कृष्ण कपाळावर आट्या घेऊन विचारात रमलेला कधी कुणी चित्रीत केला असावा का? खास करून काय ही मीरा .. अशी कशी ही वेडी ... असे मनातल्या मनात म्हणत ओठांवरची बासुरी अल्गद बाजूला करत कपाळावर आट्या आणून तिरक्या नझरेने मिरेला पाहतोय जणू. तर मीरा आपली रमलीय ... त्याचेच गुण गाण्यात ... गावभर त्याच कृष्णाचा जप करत फिरत अगदी लयीत भजनात रमली आहे. ती पात्र जरी दैवी असले तरी ह्या अशा हावभावामुळे काल्पनिक न वाटता आपलेसे अधीक वाटत आहेत. 

काही चित्रकारांची  चित्रे काळाच्या ओघात भरकटणारी नसतात. आपल्या आजुबाजूला पसरत चाललेला भडकपणा .. भपकेपणामुळे त्या ठराविक  चित्र शैलीला काही फरक पडत नाही. खूप हळूवारपणे ते पात्र .. तो विचार कागदावर उतरलेला असतो की अगदी एक एक रेष, ठिपका, आकार एखाद्या फुलपाखराच्या पंखागत त्यावर फक्त रचले असावेत. मग इतक्या हळूवार नाजूकपणे कामात शोधूनही खोट सापडणे कठीण. अशीच काही चित्र बंगाल चित्र शैलीत साधारण स्वातंत्र काळात  निर्माण केली गेली.  अबनिंद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, मजूमदार, अबालाल रहमान हे तेव्हाचे चित्रकार. कागदावर पारदर्शक जलरंग विशिष्ठ पद्धतिने वापरला जाऊ लागला आणि बंगाल शैली उदयास आली. स्वातंत्रयानंतर माणसाचे माणुसपण बदलू लागले तसे कला क्षेत्राही बरेच बदल होऊ लागले. फॅशन बदलावी तशी कलेतही नवनवीन ट्रेंड दिसू लागले. जेवणातील  जसे जगणे बद्दल तसेच जीवन शैली प्रमाणे कलेमध्येही विविध बदल घडत असतात. कलेतील या बदलांना समकालीन किंवा कंटेम्पररी आर्ट म्हणून संबोधले जाते. लोकांना सगळीकडेच बदल हवा असतो मग तो बदल कलेतही दिसून येतो. फास्टफुडप्रमाणे कलाक्षेत्रातही ट्रेंड किंवा फॅशनप्रमाणे नवनव्या कलापकार उदयास येतात आणि संध्याकाळ व्हावी तशी लुप्त होतात. 

   मोनल कोहाड हे आजचे कलाकार पण यांची चित्र मला नेहमी बंगाल जलरंग वॉश टेक्निकची आठवण करून देतात.  स्वतंत्र पुर्व काळात बंगाल स्कुल मधील जलरंग पाहिलीकी बटबटीत जग नकोसे होऊन साधेपण्याने जगण्याची ओढ लागावी तशी त्यातील पारदर्शकता आपल्याला त्या प्रकाशात खेचून धरून ठेवते. तरल .. एकमेकांत मिसळलेले प्रत्येक रंगाचे ठराविक प्रमाण व त्या जाडसर मऊ ब्रशने पसरलेले पाणीदार फ्लो अगदी जणू स्वर्गच ... आणि त्यावर बारीक रेखांकनाने भरत चाललेली आकृती, पाने फुले नक्षी इत्यादी. 

मोनल कोहाड यांनी रेखाटलेली रामायण महाभारतातील प्रसंग खूप सहज मनात घर करू लागतात. मला बर्त्यायाचदा एखाद्या चित्रावरून एखाद्या प्रसंगाची, गोष्टीची आठवण होते आणि नव्याने त्या अध्यात्मिक विषयांचा अभ्यास करावासा वाटतो.  जर राम रेखाटला असेल तर हो असाच असावा ..इतका हुबेहूब असे काहीसे जाणिव करून देणारे चित्र. 

ती अल्लड राधा .. तो बासुरीत रमलेला कृष्ण कधी तर कधी अर्जुनाला उपदेश देणारा नाकडोळे अगदी नाजूक लोभस  तरी तितकाच धीट कृष्ण जणु संपुर्ण गीता ज्याच्या विचारात सामावली आहे. 

मध्यंतरी त्यांनी रेखाटलेली कित्येक पात्र पाहिली आणि ह्यापेक्षा खरेपणाने दुसरे काही असूच शकत नाही असा काहीसा माझा ठाम विश्वास बसू लागला.. तो राम असो वा कृष्ण .. ती मिरा असो की राधा... ते पात्र मनामध्ये घर करून जावे असे काहीतरी. 

माझे आवडते कृष्ण आणि ही मीरा .... त्यात हा कृष्णच घ्या ना .. त्याचे हे असे हावभाव कधी कुठे पाहिलेत का? थोडासा खडूसच म्हणायला हरकत नाही. त्या मिरेकडे त्याने नेहमीच  कानाडोळा केला हे काही खोटे नाही. ती मीराही वेडी .. त्याच्या प्रेमात तिने वैराग्य स्विकारले आणि तिला तिच्या जगण्याचा सार आपोआप गवसला. गावोगावी कृष्णाच्या ओव्या गात हींडत राहिली .. ना घराची चिंता ना भविष्याची काळजी. 

तेथे राधेसोबत कृष्णाला बालपणात सोबत असली आणि माणसाने पुजतानाही राधाच सोबत ठेवली तरी मिराही नारागसपणे एकल प्रवासात कृष्णामध्ये रमली. तिला जगाची चिंता नव्हती. कदाचित ती आपल्याला स्व शोधणं आणि स्व मध्ये रमणं हे अधीक शिकवते.

कृष्ण भक्तीत, त्याच्या प्रेमात रमलेली त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं तरी कसलाच अट्टाहास न करता ती भक्तिरसात न्हाऊन निघाली व त्यातूनच अवीट दोहे रचले गेले.... 

 मग तो कृष्ण , " काय ही वेडी मीरा म्हणत कपाळावर आट्या ओढून तिरक्या नजरेने तिला पाहतोय आणि मीरा मात्र हे माहीत असूनही त्याचेच नामस्मरण करत त्याच्या धुंदीत डोहे गात फिरतेय ... हे किती तंतोतंत रेखाटलय नै !

..............bhavna sonawane . December 2020. 



Sunday, October 11, 2020

Sunday, June 21, 2020

बेडूक फॅमिली

🐸🐸🐸🐸
काही दिवसांपुर्वी एक बेडूक रात्री दाराबाहेर बसायचा ..
म्हट्लं असूदेत तेवढाच एक राखणदार आपल्या घराला !

बरं ... दार उघडलं की शहाण्यासारखा टुनकण उड्या मारत पुढे सरकून परत दार लावून आपण आत कधी जातोय ह्याची वाट पहायचा ..

एक एक वाढत आता ही संख्या चार वर गेलीय ...
मी मगाशी गेट चेक करण्याकरीता ते पावसाने गच्च बसलेलं जड लाकडी दार कसंबसं उघडलं .
आज चौघेही गोंधलेल्या हालचालिनं त्यांना झालेला डिस्टरबन्स व्यक्त करत ,  जणू रात्री बेरात्री एखादा अचानक आलेल्या पाहुण्यागत .. डोळे चोळत माझं स्वागत करत होते ...
 हो , पण प्रत्येकाने आदराने दोनदोन उड्या मारल्या नी आपल्या जागेपासून लांब माझी दार लावून घ्यायची वाट पाहत उभे होते.

मी म्हट्लं त्यांना ..
नुस्तच बिनकामाचं बसून राहण्यापेक्शा फेंगशूइ च्या फ्रोॅग प्रमाणे निदान तोन्डामधे एकेएक नाणं तरी धरून बसा ... तेवढेच चार पैसे जास्तीचे येतील आपल्या घरात !!
पण ते माझं ऐकतील तर शप्पथ !!!
feeling kay karu ata 🐸
             .......bhavna.2020.

Wednesday, June 10, 2020

' The Floatong Homes ' ....my Paris Diaries.


तरंगणारी घरे ....
 कॉलेजला असताना मी पॉव क्ली जितका मिळेल तितका वाचायची... तरी शोधत रहायची. लायब्ररीत पॉल क्लीचे जुने पुस्तक होते आणि नंतर गावडे सरांनी वर्गासाठी बनवलेली एक खास लायब्ररी होती त्यातही एक पॉल क्लीच्या चित्रांचे छोटे पुस्तक होतेच.

पॅरीसच्या मी राहत असलेल्या इमारतीच्या बाहेर पडले की रसता क्रॉस करून सिएन नदी ... पों. मारी नावाचे ब्रीज. तेथेच फुटपाथवर कमी किमतीत मिळाले ते रेम्बरा, लियोनार्दो मायकलॅन्जिलो, एद्गर देगास, पॉल गॉगीन, व्हॅन गॉग याच्या फ्रेंच अवृत्या.

मी वेडी .. कित्येक दिवस तेथेही पॉल क्ली शोधत राहीले पण सापडेना. एकीकडे भारत ...तर उरलेला बाकी मोठा जग .... खंड गेले चुलीत म्हणत वावरणारी मी !
एखाद्या जर्मन चित्रकाराचे पुस्तक फ्रांस मध्ये सहज सापडणे कठीण हे गणितच कळले नव्हते मला.
पण क्लीची दोन ओरिजीनल छोटी चित्रे पॉम्पीड्यू म्यूझियम मध्ये पहायला मिळाली ते माझे भाग्य.

 त्या दर्मयान तेथे माझ्या एकल चित्रप्रदर्शनाची तयारी सुरू होती आणि  क्लीच्या विरहात घडलेले हे एक.
एके दिवशी प्रदर्शन पहायला आलेल्या गोस्वामी आडनाव असलेल्या चित्रकाराने मला ह्या चित्रावरून टोबणा मारला तेव्हा कुठे मी जागी झाले. त्यानंतर कित्येक वर्ष चित्रनिर्मीती करत असताना माझ्या चित्रातून क्ली डोकावत तर नाही नं ..ह्याची खात्री करू लागले.
हे चित्र आज कोणाकडे आहे मला माहीत नाही. पण ज्याच्याकडे असेल तो ही नकळत पॉल क्ली चा चाहता नक्की असेल .

त्या रेसिडेंसी मध्ये महिन्याभरात क्लीला शोधत आणखी काही अशीच चित्र हातून घडली. त्यात हे सर्वात खास हृदयात वसलेले.
                     Bhavna.june.2020.

Tuesday, June 9, 2020

मक्बूल फिदा हुसैन ..सही ..

मकबूल फिदा हुसैन ...
बस.. नाम ही काफी है !

दर दोनचार वर्षांनी मी नक्की ही सही कुठे जपून ठेवलीय हे विसरते.
आज पुन्हा आठवण झाली ..
नशीब सापडली.

१९९५ ला एल एस रहेजा, फाऊंडेशन वर्गात नुक्तेच पदार्पण केले होते.प्रकाश भिसे सर व मुकूंद गावडे सरांनी तेव्हा शनिवारी आमचे आऊटडोअर स्केचिंग सुरू केले होते. सुरूवातच असल्यामुळे कधी जहांगिर आर्ट गॅलरी ला तर कधी गेटवे आॉफ इंडीया, कधी नेहरू सेंटरला जमत असू. मला आठवतय, एकदा सुरूवातिच्या आऊटडोअर सेशन मध्ये सर आम्हाला अडोर हाऊसला घेऊन गेले. वर्गात आम्हाला हिस्टरी ऑफ आर्ट लेक्चर सुरू पण झाले नव्हते. पण भिसे सरांनी आम्हाला प्रोग्रेसीव आर्टीस्ट ग्रूप मधील चित्रकिरांबद्दल तेव्हा कल्पना दिली होती. तेव्हा अडोर हाऊसमध्ये आर्ट गॅलरी चे इंटेरियर, फर्निचर काम सुरू होते.

त्याच दर्मयान एकदा नेहरू सेंटरमधील जिन्याकडचे हुसेनजींचे मोठे चित्र चित्र दाखवत त्यांच्या गोष्टी सांगत असताना गावडे सर बोलले .. तो बघा ... आपला देव चाललाय ..
आणि आम्ही विद्यार्थी त्यांकडे धावत गेलो.
बरं .. मला हेच का ते हुसैन माहीत असण्याचे कारणच नाही.
कुणी एकाने पाया पडले ...आम्ही देखील पाया पडलो अन् सहीसाठी हात पुढे केला. मग इतर विद्यार्थ्यांनी पेन काढून हातावर त्यांच्या सह्या घेतल्या.
मला बॅगमध्ये छोटी फोननंबरची डायरी ठेवायची सवय होती . ती काढली अन् त्यातील पान पुढे केले.
फक्त कोणीतरी मोठा माणूस आहे हे एवढेच तेव्हा माहीत होते पण जसजसा कलेचा अभ्यास सुरू केला तसतसे त्यांची चित्र पाहण्याचा मोह कधीच टाळता आला नाही.
मग कधीतरी आपलेही यांच्यासोबत कधी चित्रप्रदर्शन व्हावे असेही कधीतरी वाटून गेले असता काही वर्षांपुर्वी बंगलोरला एका चॅरिटी शो ला हुसैनजी व अशा अनेक चित्रकारांसोबत माझेही चित्र झळकले.
ते एक चॅरिटी अॉक्शन असल्यामुळे माझ्या तेथे नमूद केलेल्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीत माझे चित्र विकले गेले हा आणखी एक आनंद.
ही सही त्यांच्या चित्रापेक्षा काही कमी नाही.
आणि आज हुसैनजींची पुण्यतिथी...
🌹🌹🌹

Saturday, June 6, 2020

चित्रकार शोभा घारे ..

ऑगस्ट महिना, नुक्ताच पाऊस सुरू झालेला. महेश्वर आर्ट कॅम्पचा पहिला दिवस. सर्वत्र हिरवळ आणि धुकं पसरलेलं.

 मी आणि प्रिया मुंबई हून उशीरा पोहोचलो होतो. पुढचे चार दिवस विवीध स्वभाव, विचारसरणीच्या स्त्री चित्रकारांमध्ये रहायचे होते. मग काय .. धम्माल !
कोणी खोडकर, कोणी शात संयमी,  कोणी मजेशीर, कोणी डोमीनेटींग...कोणी स्वता:च्या कामात तासंतास रमलेली..कोणी शिक्षिका, कोणी  अॉफीसर तर कोणाची ओळख फक्त चित्रकार. सगळे सगळे वेगळे आम्ही साधारण वीसजणी आणि सर्वांमध्ये एकच साम्य की आम्ही कलाकार.

दुपारी कामाला सुरूवात केली. कॅनव्हास इजेलवर लावला आणि रेखाटन केले.. बास. मग वर्गभर फिरत असल्यासारखे दोन फेर्या मारल्या.
हो .. आमच्यासोबत प्रतिभा वाघ मॅम पण असल्यामुळे ते चार दिवस सतत आमच्या एल.एस.रहेजाची आठवण .. ते अल्लड आयुष्य डोळ्यासमोर होते.

संध्याकाळी सिरीयसली काम करू लागले. माझ्या डाव्या बाजूला वर्षा खरटमल काम करत होती. मला काम करताना उगाचच बडबड करायची सवय आहे. मग तिला हाक मारून प्रतिसाद नाही ..त्यावरून आठवायचे की तिला ऐकूयेतच नाही..पण ह्या गुणामुळे ती सतत तिच्या कामात चिकाटीने रमलेली असते. त्या कॅंव्हासला काय देऊ अन् काय नको बघत एकटक तेथेच रमून तिचे सुंदर आयुष्य गिरवत असते. मग मी आपली गालातल्या गालात हसून प्रीयासोबत काही कुजबुजून परत आपल्या जागेवर यायची.
माझ्या समोरच्या भिंतीला लागून हॉटेलच्या स्वयपाक खोलीची खिडकी होती. सकाळसंध्याकाळ आमच्याकरीता आत काय मेनू शिजतोय ते ती खिडकीच सांगत असे.

माझ्या उजव्या हाताला एक चित्रकार स्टूलवर कॅनव्हास आडवा ठेवून शांतपणे काम करण्यात रमलेल्या असायच्या.
मी त्यांना ओळखत नसल्यामुळे त्यांचे कामाकडे सुरूवातीला लक्ष दिले नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी हळूच डोकावले तर अतिशय प्रेमळ काहीतरी त्यावर उमटत असलेले दिसले. माझ्या मनातिल निसर्ग त्यावर हळूवार वसला होता.
त्यांच्या स्वभावाप्रमाणे ... आपण आपले काम करत रहावे .. जगाच्या दिखाव्यात रमू नये हे सुचवत होते.

अरे देवा ... मी ओळखते की ह्यांच्या चित्रांना .. काहीसे जुने पुराने आठवून गेले.
अगदी फिकट बैज रंगाचा वॅश, त्यावर डोंगराच्या आकाराचे काहीतरी पुसटसे जणू धुक्यातील चित्र आणि एखादा पक्षी नुक्ताच त्यावरून आकाशात झेप घेतोय..
कुठेतरी पाण्याचे प्रतिबींब, कधी झाडाचे असतित्व ...कधी डोंगर जणू पाण्यात तरंगतोय...काल्पनिक ..रम्य.
पण हे सारे निसर्ग जीवन एक आभासच जणू. कुठेही भपकेपणा नाही का कुठेही मी पणाचे असतित्व नाही ...
सर्वत्र एकसंघीक शांततेचे समाधानाचे निर्मळ अस्तित्व .... अगदी अगदी त्यांच्या स्वभावासारखे.

मी वर्गात .. माफ करा .. हॉलमध्ये  कधीही उगवत असे. पाऊसाळी वातावरण असल्यामुळे मला ते वातावरण साद घलतय असे समजून उगाच एक फेरी मारून यायचा मोह आवरूच शकले नाही. आणि तसेही ते वातावरण म्हणजे आपल्या चित्रांसाठी एकप्रकारचे ग्लुकोज जणू.

सकाळी लवकर उठून एकटीच पंधरा मिनीटे चालत मंदीर, होळकरांचा राजवाडा आणि नर्मदा नदीकाठी फिरून येत असे. गल्लीतून येता येता हातमागाच्या साड्या दिसल्या की त्याच्या किमतींची विचारपूस करण्यात वेळ जातोच नै.  मग नाश्टा करून वर्गनामक हॉल मध्ये माझ्याआधी बाकीचे शातपणे शहाण्या मुलींप्रमाणे कामाला बसलेले पाहून काना डोळा करत दारातूनच प्रिया .. हर्षदाला हाक मारत ...त सर्वांची शांतता भंग करत व त्यातच प्रियाचा प्रेमळ टोंबणा ऐकत तिला साड्यांचे रंग ..किंमत हळूच कानात सांगायचे... व मग सकाळी सकाळी अनुभवलेले महेश्वर कॅनव्हासवर उमटवायला घेत असे.

मग अचानक हा उजवीकडचा कॅनव्हास दिसला आणि आपल्या अशा अल्लड वागण्यामुळे उजवीकडून ओरडा मिळायला नको म्हणून खबरदारी घेऊ लागले.
मग तिसर्या दिवशी माझा कॅनव्हासही वळवून ठेवला कारण ते उजवीकडचे चित्र इतके नितळ पारदर्शक वाटत होते की मी त्या चित्राच्या प्रेमात पडले. मग माझ्या चित्रातील काही त्यातल्या त्यात भडक पॅच चुकून आपले प्रतिबींब त्यावर टाकेल की काय अशी भिती वाटत असे. तर कधी माझ्या हातून रंगाचा शिंतोडा उडू नये ही भिती...
पारदर्शकपणा जपत ते रंग छटाही बदलत होते. कमी प्रतिकात्मक आकार पण किती किती साधेपणा आहे ह्यांच्या चित्रात... सर्व काही सकारात्मक. मग अशा वेळेस मी मी सकारात्मक ओरडत काही कलाकार भपकेपणाने भौतिक आयुष्य जपत आपले काम दाखवत फिरतात त्यांची अवर्जून आठवण येते. ही खरी सकारात्मकता.
हे रंग.. हे आकार उमटायला जे अनुभव गाठीशी बांधले असतील त्या सुखांची .. त्या जखमांची जाणिव ते चित्र करून देतात.
 कित्येक दिवस . महिने ते तरल आकार ..पण खोलवर ठसा उमटवणारे... रंग .. आकार ... मनात घर करून आहेत.
कलाकाराचे एकच काम खूप काही सांगून जाते. ते पुरेसे असते. मग त्यात मला काय सापडले ह्याचे काही आठवणींसकट येथे थोडक्यात वर्णन केले आहे.

शोभा घारेजी....
अतिशय बोलकी आहे तुमची चित्रशैली .. अगदी प्रेमात पाडणारी.
      ...... BhavnaSonawane.June2020